
Maharashtra Politics : राज्यातील सामाजिक परिस्थिती सुजाण नागरिकांना अस्वस्थ करणारी आहे. कोणताही वाद झाला, आक्षेपार्ह घटना घडली की त्याला जात, धर्माचा रंग दिला जात आहे. त्यामुळे मूळ प्रश्न बाजूला पडून भलतीच गुंतागुंत निर्माण होत आहे. जातीय, धार्मिक सलोखा संपुष्टात येतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
समाजासमाजांमधील समंजसपणा लोप पावत चालला आहे. साहित्यिक, बुद्धीजीवी वर्तुळातून याबाबत ब्र ही उच्चारला जात नाही. पुढच्या पिढीच्या पदरात आपण नको ती संकटे टाकत आहोत, याचे भान समाजाने ठेवायला हवे. मस्साजोग (ता. केज, जि. बीड) येथील सरपंच संतोष देशमुख (Sarpanch Deshmukh) यांच्या क्रूर हत्येनंतर वातावरण ढवळून निघाले आहे. विविध शहरांत आक्रोश मोर्चे काढले जात आहेत.
आमच्या समाजावर अन्याय झाला तर त्यांना घरात घुसून बाहेर काढावेच लागणार आहे, असा इशारा परभणी येथील आक्रोश मोर्चात मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता. त्यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या समर्थकांनी आंदोलन केले. त्यानंतर जरांगे पाटील यांच्यावर चार ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. प्रार्थनास्थळात घुसून मारणार, अशी धमकी एका राजकीय नेत्याने मुस्लिम समाजाला दिली होती. तो नेता आता मंत्री आहे, हे विशेष.
मी कोणत्याही समाजाच्या विरोधात बोललो नाही, गुंडांच्या विरोधात बोललो, असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. गुंडांच्या विरोधात बोलणे म्हणजे समाजाच्या विरोधात बोलणे कसे होऊ शकते, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. जे काही चालले आहे, त्याचे समर्थन करता येणार नाही. मुद्दा असा आहे, की मुस्लिम समाजात अशी जागरूकता का येत नाही?
काही कट्टर मुस्लिमांच्या कृत्यांचा दोष सर्व मुस्लिमांना कसा दिला जाऊ शकतो, असा प्रश्न विचारण्याचेही धाडस मुस्लिम समाजात राहिलेले नाही. सक्षम, अभ्यासू नेतृत्वाचा अभाव, हे त्याचे प्रमुख कारण आहे. शिक्षणाचा अभाव, ही मुस्लिम समाजाची सर्वात मोठी समस्या आहे. चौथी, सातवीनंतर शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. शाळा सोडून ही मुले पडेल ते काम करतात. शैक्षणिक चळवळीतील कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक स्थितीचा अभ्यास करून 'आमच्या शिक्षणाचं काय?' हे पुस्तक लिहिले आहे.
त्यांनी राज्यातील 20 जिल्ह्यांमध्ये फिरून शाळेची पायरी न चढलेल्या मुला-मुलींचे वास्तव या पुस्तकात मांडले आहे. मदरशात जाणाऱ्या मुलांची संख्या मोठी आहे. मदरशांत शिकवणाऱ्यांना तुटपुंजा पगार असतो. मदरशांत शिकणाऱ्या मुलांना नोकरी तरी कुठे मिळते? तलाकसारखी समस्या मुस्लिम (Muslim) समाजातही आहे. राज्यात 2011 च्या जनगणनेनुसार मुस्लिमांची लोकसंख्या 12 टक्क्यांच्या घरात आहे. या समाजात बालमजुरीचे प्रमाण मोठे आहे. या समाजातील बहुतांश लोक झोपडपट्ट्यांमध्ये राहतात.
राजकीय भानही हा समाज हरपून बसला आहे, अशा परिस्थितीत आरोप होतो, भारताला इस्लामिक राष्ट्र करण्याचा डाव आहे! हा आरोप हास्यास्पद असला तरी तो मुस्लिमांना अन्य समाजांपासून तोडणारा ठरला आहे, त्यांना मुख्य प्रवाहातून बाजूला सारणारा ठरला आहे. प्रार्थनास्थळात घुसून मारणार, काही मिनिटांसाठी पोलिसांना (Police) बाजूला सारा, मग दाखवून देऊ... अशा एक ना अनेक प्रकारच्या धमक्या दिल्या जातात.
अशा परिस्थितीत या समाजाची मानसिक स्थित कशी बनली असेल, याचा विचार सरकारने करायला हवा. देशात हिंदू समाजाची लोकसंख्या 80 टक्क्यांच्या घरात असताना देश इस्लामिक राष्ट्र कसा बनू शकतो, याचा विचार समाजाने करायला हवा. कट्टरतेला कट्टरता हे उत्तर असू शकत नाही, याचे भान दोन्ही समाजांनी ठेवायला हवे. काँग्रेसने मुस्लिमांचा अनुनय केला, हा मुस्लिम समाजावर सातत्याने होणारा आरोप.
काँग्रेसने अनुनय केला असता तर मुस्लिम समाज आज ज्या अवस्थेत आहे, त्या अवस्थेत राहिला असता का? याचाही विचार होताना दिसत नाही. राजकीय नेत्यांचे राजकारण होते, सत्ताकारण होते, समाज मात्र त्यात होरपळून निघत आहे. अनेक पिढ्यांपासून एकत्र राहिलेल्या या दोन्ही समाजांमध्ये राजकारणामुळे वितुष्ट निर्माण होत आहे. 12 टक्के लोकसंख्येला अडगळीत टाकून एखाद्या पक्षाला सत्ता मिळू शकेल, मात्र त्यामुळे शांततामय सहजीवन संपुष्टात येईल.
शेजाऱ्याच्या घराला लागलेली आग आपल्याही घराला घेरेल, हे दोन्ही समाजांतील कट्टर वर्गाला कळायला हवे. या सर्व बाबींमुळे मुस्लिम समाजात जागरूकतेचा अभाव आहे. प्रार्थनास्थळात, घरात घुसून मारण्याची भाषा का होते, याचे उत्तर या समाजाने सरकारला विचारायला हवे होते. समाजात ही मोठी समस्या असताना आता मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण होत आहे. गुंडांसाठी संपूर्ण समाजाला वेठीस धरू नये, ही भावना योग्यच आहे.
दुसरीकडे, मुस्लिमांना मात्र अनेक वर्षांपासून या परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. समाजात अभूतपूर्व अशी गुंतागुंत निर्माण झाली आहे. हा गुंता लवकर सुटणे, हे राज्यासाठी हितावह आहे, याचे भान राजकीय नेत्यांनी, दोन्ही समाजांनी ठेवायला हवे. शांततामय सहजीवनाला पर्याय नाही, हे सर्वांनीच लक्षात घेण्याची गरज आहे. राजकारण्यांनी लावलेल्या आगीत आपण होरपळून निघणार नाही, याची काळजीही समाजाने घेतली पाहिजे.
अन्यथा मतांच्या राजकारणासाठी, सत्ता मिळवण्यासाठी चिथावणीखोर नेत्यांचा वापर यापुढेही करून घेतला जाईल, अशा नेत्यांना मंत्रिपदे दिली जातील. त्यांचे सर्वकाही व्यवस्थित होत राहिल. मूलभूत समस्यांकडे लोकांचे दुर्लक्ष होईल, समाजात दरी निर्माण होईल आणि त्याचा त्रास कारण नसताना पुढच्या पिढीलाही सहन करावा लागेल. त्यामुळे राज्यात सलोखा कायम राहणे, अत्यंत गरजेचे झाले आहे.
Edited By Jagdish Patil
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.