Lok Sabha Election 2024: दक्षिणेचं द्वार कुणासाठी खुलं होणार? YSRC चा फिरता पंखा पाहून भाजप-काँग्रेसला गिरकी?

BJP-Congress South Political News: 2024 च्या लोकसभा निवडणुकीतही भाजप आणि काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी मित्रपक्षांच्या मदतीनं दक्षिण दरवाजा उघडण्याचा पुन्हा एकदा घाट घातलाय. दक्षिणेकडील सर्व राज्यांतील मतदानाचे टप्पे पूर्ण झाले आहेत. आता निकाल येणं तेवढं बाकी आहे. 'दक्षिणेचं द्वार कुणासाठी खुलं होणार?'
BJP-Congress South Political News
BJP-Congress South Political NewsSarkarnama
Published on
Updated on

Andhra Pradesh Lok Sabha Election 2024: गेली दोन लोकसभा निवडणुकांचा निकाल पाहिल्यास आंध्रप्रदेशात (Andhra Pradesh) भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही राष्ट्रीय पक्ष असून नसल्यासारखे आहेत. 2019 मध्ये तर या दोन्ही पक्षांना भोपळा देखील फोडता आला नव्हता. तरी देखील काँग्रेसनं यावेळी 25 पैकी 23 जागा लढवण्याची हिंमत दाखवली तर भाजपनं मात्र हात आखडता घेत 6 जागांवर लढण्यात समाधान मानलं. आता वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांच्या 'पंख्या'च्या वाऱ्यानं भाजप-काँग्रेस उडून जाणार की तग धरणार हे पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

आंध्रात भाजपचा स्कोअर कधी 3 तर कधी भोपळा!

2014 मध्ये भाजपनं (BJP) 3 जागा जिंकल्या होत्या तर 2019 मध्ये 24 जागा लढून खातंही उघडता आलं नव्हतं. यावेळी मात्र भाजपनं सावध पवित्रा घेत NDA मधील आपला घटक पक्ष तेलुगू देसम पक्षाला (TDP) 17 जागा तर अभिनेते पवन कल्याण यांच्या जन सेना पक्षाला (JSP) 02 जागा दिल्या. भाजपची भिस्त आता माजी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू (N. Chandrababu Naidu) यांच्या टीडीपी (TDP) वर अवलंबून आहे. आंध्र प्रदेशातील सत्तेचा दरवाजा उघडला जावा यासाठी भाजपनं टीडीपी (TDP) ची चावी फिरवण्याचा प्रयत्न केलाय खरा पण 2019 मध्ये टीडीपी (TDP) नं स्वत: त्या चावीच्या साहयानं सत्तेचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करूनही तो उघडला गेला नव्हता हे भाजप नक्कीच विसरलेला नसेल.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तेलंगणाची निर्मिती झाली, काँग्रेस आंध्रात घसरली!

काँग्रेसची (Congress) गत पण भाजपसारखीच. 2014 मध्ये 2 जागा जिंकल्या खऱ्या पण 2019 मध्ये सर्वच्या सर्व जागा लढूनही हाती भोपळाच आला. 2014 मध्ये तेलंगणाची निर्मिती झाली नि काँग्रेसची आंध्रात घसरण सुरू झाली. त्यावर उपाय म्हणून यावेळी काँग्रेसनं भलतीच खेळी खेळली. वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांच्या बहिणीलाच म्हणजे वाय. एस. शर्मिला यांना आंध्रप्रदेश काँग्रेस समितीची अध्यक्ष बनवत निवडणूक रिंगणातही उतरवलं. त्यांच्या प्रभावाचा आपल्या पक्षाला लाभ होईल आणि जास्तीत जास्त जागा जिंकून आणता येतील या हेतूनं काँग्रेसनं यावेळी 25 पैकी 23 जागा एकट्यानं लढवण्याची हिंमत राखली. आपल्या मित्रपक्षांच्या वाट्याला 2 जागा देत CPI आणि CPI (M) यांना प्रत्येकी एक जागा वाटून टाकली.

'पंख्या' समोर भाजप-काँग्रेस टिकणार का?

2014 मध्ये आंध्र प्रदेशचं विभाजन होऊन तेलंगणा राज्याची निर्मिती झाली आणि 175 जागांचं राज्य म्हणून आंध्र प्रदेशला मान्यता मिळाली. राज्यातील सर्वांत मोठा पक्ष म्हणून 102 जागा मिळालेल्या टीडीपी (TDP) चे सर्वेसर्वा एन. चंद्राबाबू नायडू तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले. वाय. एस. जगन मोहन रेड्डी (Y. S. Jagan Mohan Reddy) यांच्या YSRC पक्षाला 67 जागा मिळाल्या तर भाजपला अवघी एक. असदुद्दीन ओवेसी यांच्या AIMIM यांच्या पक्षाला 7 जागा मिळाल्या. तिकडं 63 जागा मिळवत तेलंगणा राष्ट्रीय समिती म्हणजेच TRS पक्षाचे के. सी. राव हे नव्या तेलंगणा राज्याचे पहिले मुख्यमंत्री बनले.

BJP-Congress South Political News
Lok Sabha Election 2024: दक्षिणेचं द्वार कुणासाठी खुलं होणार? भाजप-काँग्रेसची दमछाक!

2014 ते 2019 या काळात आंध्र प्रदेशात काही राजकीय घडामोडी घडल्या. वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांना झालेली अटक, त्या दरम्यान त्यांची बहीण वाय. एस. शर्मिला यांनी त्यांच्या सुटकेसाठी उभारलेलं जन आंदोलन, त्यानंतर वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांची झालेली सुटका आणि त्यांना मिळालेली प्रचंड लोकप्रियता; या साऱ्या घडामोडी त्यांच्या पक्षाच्या पथ्यावर पडल्या. त्यातच विधानसभा निवडणूक लागली आणि वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांच्या YSRC पक्षानं 175 पैकी 151 जागांवर विजय मिळवला.

BJP-Congress South Political News
Lok Sabha Election 2024: दक्षिणेचं द्वार कुणासाठी खुलं होणार? भाजप-काँग्रेसची दमछाक!

YSRC पक्षाच्या झंझावातात 23 जागा मिळवत टीडीपी (TDP) नं थोडाफार तरी तग धरला पण भाजप आणि काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांचा अक्षरश: पालापाचोळा झाला. YSRC पक्षाच्या 'पंख्या'च्या वाऱ्यात हे दोन्ही पक्ष उडून गेले. भाजपनं 173 तर काँग्रेसनं 174 जागा लढवल्या पण दोघांच्याही हाती काय आला तर भोपळा! एकूणच काय तर आंध्रात गेल्याच वर्षी विधानसभेला सपाटून मार खाल्लेले भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष लोकसभेला तोंडावर आपटले नाहीत म्हणजे मिळवली.

(मालिकेच्या पुढील भागात... केरळ)

(Edited By Jagdish Patil)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com