दक्षिणेकडील राज्यं म्हणजे तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ आणि तेलंगणा. लोकसभा जागांच्या बाबतीत बोलायचं झालं तर या 5 राज्यांत मिळून एकूण 129 जागा आहेत. भाजप (BJP) आणि कॉंग्रेस हे दोन्ही राष्ट्रीय पक्ष आजही या राज्यात सत्ता मिळवण्यासाठी झगडत आहेत. 2019 मध्ये भाजप 92 जागा लढला होता. त्यापैकी 29 जागांवर यश मिळालं होतं तर कॉंग्रेसनं 88 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी 27 जागा जिंकता आल्या होत्या. 2024 मध्ये भाजपनं 87 तर कॉंग्रेसनं (CONGRESS) 93 जागा लढवल्या आहेत.
तामिळनाडू हे दक्षिणेतील सर्वांत मोठं राज्य. तमिळनाडूमध्ये लोकसभेच्या 39 जागा आहेत. तामिळनाडूत डीएमके (DMK) आणि एआयएडीएमके (AIADMK) या दोन प्रादेशिक पक्षांचं प्राबल्य आहे. 2024 च्या लोकसभेसाठी भाजप पुन्हा एकदा एनडीए (NDA) मधील आपल्या घटक पक्षांसोबत निवडणूक रिंगणात उतरला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 05 जागा लढून भोपळाही फोडता न आलेल्या भाजपनं यावेळी तब्बल 23 उमेदवार उभे केले. खरं तर हे भाजपचं धाडसच म्हणावं लागेल.
भाजपनं यावेळी तीन मित्र पक्ष आणि एक अपक्ष सोबत घेत तामिळनाडूत सत्ता मिळवण्यासाठी चंग बांधला. PMK च्या वाट्याला 10 तर TMC(M) आणि AMMK या दोन पक्षांच्या वाट्याला अनुक्रमे 03 आणि 02 जागा आल्या. शिवाय एका अपक्ष उमेदवाराचीही त्यांना साथ लाभली. 2019 च्या निवडणुकीतही PMK आणि TMC(M) हे दोन्ही पक्ष (NDA) चे घटक पक्ष राहिले.
यावेळी AMMK हा नवा घटक पक्ष (NDA) च्या गोटात सामील झाला मात्र भाजपसाठी ही लढाई म्हणावी तितकी सोपी नव्हती. कारण यावेळी भाजपची लढाई होती ती कॉंग्रेससह विरोधात उभा ठाकलेला INDIA आघाडीतील घटक पक्ष डीएमके (DMK) आणि 2019 मध्ये सोबत असलेल्या पण यावेळी एनडीए (NDA) मधून बाहेर पडत स्वतंत्र आघाडी करून लढलेल्या एआयएडीएमके (AIADMK) विरुद्ध! भाजप आणि कॉंग्रेसमध्ये केवळ 06 लढती झाल्या पण 34 जागांवर लढलेल्या एआयएडीएमके (AIADMK) विरुद्ध भाजपच्या 19 लढती पाहायला मिळाल्या.
डीएमके (DMK) विरुद्ध भाजप 12 जागांवर लढली. एआयएडीएमके (AIADMK) शी आघाडी केलेल्या DMDK पक्षाच्या वाट्याला 05 जागा आल्या. 2019 मध्ये भाजपसोबत एनडीए (NDA) तून 21 जागांवर लढलेल्या (AIADMK) ला अवघी 01 जागा जिंकता आली होती.
2019 प्रमाणं कॉंग्रेस यावेळीही आपल्या जुन्या मित्रपक्षांना सोबत घेऊन मैदानात उतरला होता. (DMK) तून बाहेर पडत नवीन पक्ष स्थापन केलेल्या वायको यांनी यावेळी आपला MDMK पक्ष INDIA आघाडीत सामील करून घेतला.
MDMK च्या वाट्याला 01 जागा आली. कॉंग्रेसनं एकूण 09 जागा लढवल्या तर तामिळनाडूचे विद्यमान मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या DMK पक्षानं 22 जागा लढल्या. CPI, CPI(M) आणि VCK या तीन पक्षांनी प्रत्येकी 02 तर IUML पक्षानं 01 जागा लढवली. 2019 च्या निवडणुकीत (UPA) ला घवघवीत यश मिळालं होतं. लढवलेल्या 38 जागांपैकी (UPA) नं 37 जागा पटकावल्या होत्या तर लढवलेल्या 38 जागांपैकी (NDA) ला फक्त 01 जागा जिंकता आली होती. भाजपला 05 पैकी एकही जागा जिंकता आली नव्हती तर कॉंग्रेसनं लढवलेल्या 09 जागांपैकी 08 जागा जिंकल्या होत्या. (DMK) नं मात्र लढवलेल्या 23 पैकी 23 जागा जिंकल्या होत्या.
2016 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं एकूण 232 जागांपैकी 188 जागा लढल्या होत्या पण भोपळाही फोडता आला नाही. कॉंग्रेसनं 41 जागा लढवल्या होत्या. निदान त्यातल्या 08 जागा तरी कॉंग्रेसला जिंकता आल्या. 2016 मध्ये 136 जागा मिळवत (AIADMK) सर्वांत मोठा पक्ष ठरला आणि सत्तेत जाऊन बसला.
आधी ओ. पनीरसेल्वम व त्यानंतर पलानीस्वामी मुख्यमंत्री बनले. अखेर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला आपली ताकद समजली आणि थेट 188 वरून खाली उतरत अवघ्या 20 जागा लढवल्या. या निवडणुकीत मात्र भाजपनं आपलं खातं उघडलं आणि 04 जागांवर विजय मिळवला. कॉंग्रेसलाही चांगलं यश मिळालं. लढवलेल्या 25 जागांपैकी 18 जागा जिंकल्या. 2021 मध्ये तामिळनाडूत सत्ता बदल झाला. (AIADMK) सरकार जाऊन (DMK) चं सरकार बनलं. (DMK) नं 133 जागा मिळवल्या आणि एम. के. स्टॅलिन मुख्यमंत्री बनले.
एकूणच काय तर 2019 च्या लोकसभेत भोपळाही फोडता न आलेल्या भाजपनं 2024 मध्ये 23 जागांवर लढाई लढली. कॉंग्रेसनं मात्र सावध पवित्रा घेत 2019 इतक्या म्हणजेच 09 जागांवर लढाई लढली परंतु या दोघांनाही प्रत्येकवेळी खरी लढाई लढावी लागतेय ती इथल्या प्रादेशिक पक्षांविरुद्ध! स्टॅलिन यांचा (DMK) पक्ष जरी सोबत होता तरी कॉंग्रेससमोर (AIADMK) चं आव्हान होतंच शिवाय भाजपसह (NDA) च्या घटक पक्षांनाही तोंड द्यावं लागलं.
भाजपचीही परिस्थिती काही वेगळी नव्हती. भाजपला तर यावेळी कॉंग्रेससह (DMK) आणि (AIADMK) या दोन्ही पक्षांना अंगावर घ्यावं लागलं. थोडक्यात, तामिळनाडूत प्रादेशिक पक्षांविरुद्धच्या लढाईत भाजप - कॉंग्रेसची पुरती दमछाक झाली हे नक्की!
भाजप असो वा कॉंग्रेस; अनेकदा धडका मारूनही दक्षिणेकडील सत्तेचं द्वार काही त्यांच्यासाठी उघडलं जात नाही. कारण या दरवाजाची चावीच मुळात त्यांच्या हाती नाही. ही चावी आहे तेथील प्रादेशिक पक्षांच्या हाती! त्यामुळं त्यातील काही पक्षांना अंजारून-गोंजारून, त्यांना आपला मित्रपक्ष बनवून त्यांच्या मदतीनं सत्तेचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केल्यानंतर कुठं तरी या दोन्ही पक्षांना त्या दरवाजाच्या आत चंचूप्रवेश करता आलाय.
(पुढील भागात... कर्नाटक)
Edited by: Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.