
Vanjari community state-level meet : बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरण गाजलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड आणि त्याची टोळी या हत्येची सूत्रधार निघाली. वाल्मिकमुळे धनंजय मुंडे यांच्याभोवती संशयाचे जाळे उभं राहिलं. यातच कृषि विभागातील घोटाळ्याचे आरोप झाले.
परंतु संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे मराठाविरुद्ध वंजारी, असा संघर्ष उभा राहिला. या जातीय संघर्षाचा फटका किती अन् कसा बसला, याचे किती खोलवर परिणाम झाले, हे धनंजय मुंडेंनी ठाणे इथल्या वंजारी समाजाचे राज्यस्तरीय अधिवेशन आणि विचारमंथन मेळाव्यात एका वाक्यात सांगितलं.
'मी राजकारण आणि समाजकारणात आहे. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) चुकला, तर त्याला माफ करू नये. माझ्यासोबत काहीही झाले, तरी स्वीकारेल. पण तो विषय धनंजय मुंडे पर्यंत हवा. धनंजय मुंडेच्या जातीपर्यंत, जिल्हा, आई-वडिल, मुला-बाळापर्यंत नसावा', असे सांगून धनंजय मुंडे यांनी समाजातील जात संघर्षावर मार्मिक भाष्य केले. धनंजय मुंडे यांनी ठाण्यातील वंजारी समाज राज्यस्तरीय अधिवेशन आणि विचारमंथन मेळाव्यात केलेली भाषण आणि त्यातील विधानं, जातीय संघर्षांच्या परिणामांवर बरचं काही सांगून गेली
'जगाच्या पाठिवर कोणत्याही घटनेची, व्यक्तीची, जिल्ह्याची, जातीची बदनामी 200 दिवस मीडिया (Media) ट्रायलद्वारे झाली नसेल. ती मीडिया ट्रायल मी सहन केली आहे. त्या दोनशे दिवसांत दोन वेळा मरता-मरता वाचलो. ती गोष्ट फक्त डाॅ. तात्याराव लहाने यांना माहिती आहे', असा दावा धनंजय मुंडे यांनी केला.
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराडबरोबर धनंजय मुंडे 'टार्गेट' झाले. थेट संबंध जोडण्यात आले. परंतु धनंजय मुंडे यांनी संतोष देशमुख यांचे हत्यारे कोणीही असून देत, त्यात मी देखील असेल, तर शिक्षा करा. पण त्यांची ही प्रतिक्रियेची कुणी दखल घेतली नाही. यातच संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी राज्यभर मोर्चे निघाले, यातून मुंडे अधिकच 'टार्गेट' झाले. भाजपचे आमदार सुरेश धस आणि विरोधकांनी मुंडेंचा पुरता समाचार घेतला. विरोधकांच्या सूचक विधानांनी मुंडेंभोवती संशयाचे वातावरण निर्माण झाले. मुंडे मात्र न्यायावर विश्वास ठेवून होते. वारंवार सांगत होते, आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे.
यातच मुंडेंकडे असलेल्या पूर्वीच्या कृषि विभागातील घोटाळ्यांचे प्रकरण पुढे आले. हे काय कमी होते म्हणून करुणा मुंडे-शर्मा यांच्या कौटुंबिक वाद उफळला. जिथं मदत मागायला जावं तिथं, वाद उफाळून यायचा, तसे अनुभव देखील धनंजय मुंडेंना आले. संतोष देशमुख हत्याप्रकरणाने चौहू बाजने मुंडेंची कोंडी झाली होती. यातून मराठाविरुद्ध वंजारी हा संघर्ष अधिकच उफळला. हा जातीय संघर्ष आता वेगळ्याच वळणावर येऊन ठेपल्याने चिंता वाढणारा आहे, असा काहीसा सूर धनंजय मुंडेंचा होता.
भाजप महायुती सरकारमध्ये मिळाले मंत्रिपदाला सोडावे लागले. आमदारकी देखील धोक्यात आली. हाच संघर्षाचा काळ सांगताना धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांचा संघर्ष देखील वंजारी अधिवेशनात अधोरेखित केला आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या सोबत संघर्षाच्या काळात सावली सारखा होतो. त्यांचा संघर्ष मी पाहिला आहे. त्या संघर्षांतून ते जिथपर्यंत पोचले तो देखील पाहिला. साहेबांची इतकी दूरदृष्टी होती की, त्यावेळी मला बाजूला केले नसते, तर एकाच मंत्रिमंडळात बहीण आणि भाऊ मंत्री झाले नसते, असेही धनंजय मुंडे यांनी आवर्जुन सांगितले.
या संघर्षाच्या दोनशे दिवसात बरच काही शिकल्याचं धनंजय मुंडे यांनी सांगितले. या दिवसांशी कधी बोलावे अन् कधी बोलू नये हे मात्र शिकवलं. जीवनात मोठं संकट आलं असताना, समाज माझ्या मागे उभ राहिला. बदनामी झाली, तरी समाज उभ राहिला. समाजाची बदनामी प्रवृत्ती होते, आणि हे जवळून अनुभवले. या दोनशे दिवसांत सर्व बोलत होते, त्यावेळी मात्र मी बोलत नव्हतो. कारण मी काही केलेच नव्हते. त्याची प्रतिक्रिया का द्यावी, असा प्रश्न करून धनंजय मुंडे यांनी अप्रत्यक्षपणे संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणावर प्रतिक्रिया दिली.
या प्रकरणावर मी छोटी किंवा इतर कोणतीही प्रतिक्रिया दिली असती, तर त्या उत्तरातून हजार प्रश्न अनेकांना विचारले गेले असते. माझ्यावर कृषी मंत्री असताना आरोप केले. पण न्यायव्यवस्थेने न्याय दिला. आपण वंचितमधील किंचीत आहोत. पण इतक्या मोठ्या पदावर जाताना बऱ्याच जणांना किंचीत राग येईल, म्हणून त्रास होणारच. म्हणून कोणी आमच्या गुणवत्तेवर, आम्ही मिळविलेल्या नोकरीवर बोट दाखवायचे आता सहन करणार नाही, असाही इशारा धनंजय मुंडे यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.