Mahayuti News : मुख्यमंत्रिपदापेक्षा महायुतीच्या यशाला प्राधान्य!

BJP on CM Post : भाजपने आता मुख्यमंत्रिपदासारख्या वादग्रस्त विषयांना फाटे फोडण्यापेक्षा महायुतीला बहुमत मिळवून देण्यावर भर दिला आहे.
Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mahayuti and VidhanSabha Election : महाविकास आघाडी आणि महायुतीने निवडणुकीसाठी कंबर कसण्यास सुरवात केली आहे. निवडणुकीचे पडघम सुरू होताच मुख्यमंत्रिपदासाठी विविध पक्षनेत्यांकडून आपापल्या पक्षाच्या नेत्याचे नाव पुढे करण्यात येत आहे. महायुतीतही एकनाथ शिंदेंची शिवसेना, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपदाचे दावे करण्यात येत आहेत. मात्र, भाजपने आता मुख्यमंत्रिपदासारख्या वादग्रस्त विषयांना फाटे फोडण्यापेक्षा महायुतीला बहुमत मिळवून देण्यावर भर दिला आहे.

महाविकास आघाडीतील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरावा, असा आग्रह उद्धव ठाकरे यांनी धरला. पण काँग्रेस व शरद पवार(Sharad Pawar) यांनी ही मागणी थेट फेटाळून लावून हा मुद्दा निकाली काढला. महायुतीमध्ये या मुद्द्याने आता उचल खाल्ली आहे. शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत त्यांचे समर्थक जाहीर वक्तव्य करत आहेत. पण महायुतीत प्रमुख पक्षाची भूमिका बजावणाऱ्या भाजपने मात्र, वादग्रस्त विषयांना तोंड फोडण्यापेक्षा महायुतीला बहुमत मिळवून देणे यावरच भर दिला आहे. एकंदरीत भाजपने जाहीर बोलण्यापुरते तरी ‘महायुती प्रथम, मुख्यमंत्रिपद दुय्यम’ अशी रणनीती आखली आहे.

Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे कळमेश्वरमधून सुरू करणार विदर्भातील निवडणुकीची रणधुमाळी!

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे पडघम ऐकू येत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा(Amit Shah) यांनी गणेशोत्सवात लालबागच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी म्हणून दोन दिवसाचा मुंबई दौरा केला. महायुतीमध्ये जागावाटपाच्या चर्चेला सुरवात झालेली असून, लवकरच १०० जागांचे वाटप जाहीर केले जाणार असल्याचे बोलले जात आहे. पण त्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांचा मुंबई दौरा झाल्याने त्यास विशेष महत्त्व प्राप्त झाले. पुण्यात झालेल्या भाजपच्या प्रदेश अधिवेशनात ‘आगामी विधानसभा महायुती जिंकेल आणि भाजपच्या नेतृत्वात सत्ता स्थापन होईल’ असे सांगत अमित शहा यांनी अप्रत्यक्षपणे ‘भाजपचाच मुख्यमंत्री होईल,’ असे जाहीर केले होते.

अप्रत्यक्ष स्पर्धा -

शहा यांच्या दौऱ्यात अजित पवार(Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्रिपदासाठी स्वतःचे नाव समोर केल्याच्या वृत्तामुळे खळबळ उडाली. पवारांनी हा दावा नाकारला असला तरी महायुतीमधील मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारीची चर्चा थांबण्याचे नाव घेत नाही. मंत्री शंभूराज देसाई हे पुण्यात गणेश दर्शनसाठी आलेले असताना ‘एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, अशी गणरायाकडे प्रार्थना केली आहे’ असे त्यांनी सांगितले.

मुंबई दौऱ्यात शहा यांनी ‘भाजप आणि घटक पक्षांनी मतभेद होतील अशा विषयांवर जाहीर वक्तव्य करून नुकसान करून घेऊ नका,’ अशा सूचना दिल्या असल्या तरी काही फरक पडलेला नाही. त्यातच एकनाथ खडसे यांनी ‘देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजनांमुळे भाजप प्रवेश होऊ शकला नाही,’ अशी जाहीर टीका केली. खडसे यांनी शरद पवारांसोबतच राहण्याचा निर्णय घेतल्याने उत्तर महाराष्ट्रात भाजपला याचा फटका बसू शकतो.

Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Girish Mahajan News : कट्टर विरोधक असलेल्या खडसेंना गिरीश महाजनांनी दिला 'हा' मोलाचा सल्ला

काँग्रेसला घेरले -

‘भाजप आरक्षण रद्द करणार’ या मुद्द्याचा काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत आक्रमकपणे प्रचार केल्याने हा मुद्दा भाजपला चांगलाच महागात पडला. आता त्याच सापळ्यात काँग्रेसला अडकविण्याचा भाजप प्रयत्न करत आहे. अमेरिका दौऱ्यावर राहुल गांधी यांनी एका मुलाखतीमध्ये आरक्षण रद्द करण्यासंदर्भात वक्तव्य केले.

त्यावरून भाजपने काँग्रेसला घेरले आहे. ‘लोकसभा निवडणुकीआधी जातीय जनगणना, आदिवासी, दलित जनतेबद्दल कळवळा दाखवणाऱ्या काँग्रेसची सामाजिक न्यायासंदर्भातील भूमिका दुटप्पी असल्याचे गांधी यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झाले,’ असा आरोप करत भाजपने एकाच दिवशी राज्यभर आंदोलन केले. बदलापूर बालिका अत्याचार प्रकरण, सिंधुदूर्ग जिल्ह्यात राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळणे इत्यादी गोष्टींवरून भाजपच्या अडचणी वाढलेल्या असताना या आंदोलनातून भाजपने काँग्रेसची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.

समितीत सामाजिक समतोल -

विधानसभा निवडणूक जवळ येत असताना विविध संस्था, वृत्त वाहिन्यांचे सर्वेक्षण समोर येत आहेत. त्यामध्ये भाजपला विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात दणका बसण्याची शक्यता वर्तवली आहे. त्याच वेळी भाजपमध्ये महत्त्वाची घडामोड घडली. मोदी-शहांचे विश्वासू, माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपद सोपविले. राज्यात मराठा समाजाचे आंदोलन सुरू असताना मराठा असलेल्या दानवेंकडे निवडणुकीच्या व्यवस्थापनाचे नेतृत्व दिले आहे.

त्यांच्या सोबतीला १९ जणांचा चमू आहे. त्यामध्ये अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय (ओबीसी), ब्राह्मण, आदिवासी, मराठा समाजाच्या नेत्यांना सामावून घेऊन सामाजिक समतोल राखण्यात आला आहे. सामाजिक महिला संपर्क, कृषी संपर्क, लाभार्थी संपर्क, युवा, सहकार क्षेत्र, अनुसूचित जाती, जमाती यांच्याशी संपर्क यासह अन्य क्षेत्राशी संपर्क ठेवण्यासाठी नेत्यांवर जबाबदारी टाकली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com