Ashok Chavan News : समोरच्या विषयी संशय निर्माण करणे आणि त्याला त्यात गुंतवून ठेवणे, असे प्रयोग राजकारणात होत असतात. क्रिकेटमध्ये जसा गोलंदाज गुगली टाकून फलंदाजाला गुंतवून ठेवतो, त्याच पद्धतीने भाजपने (BJP) आणि आता शिवसेनेही (शिंदे गट) हे सुरु केले आहे. गेल्या काही दिवसांपासून विविध राजकीय पक्ष, संघटना, संस्थामध्ये काम करणाऱ्या व लोकांमध्ये ज्यांचे नाव आहे, अशा नेत्यांविषयी संशय निर्माण करण्याचा प्रयत्न करुन त्यांच्या निष्ठेविषयी शंका उत्पन्न करणे, असा नवा डाव भाजपने टाकला आहे.
यामध्ये काँग्रेसचे (Congress) नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan), माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित देशमुख आणि इतरही नेते आहेत. त्याच पद्धतीने शिवसेना शिंदे गटाच्यावतीनेही उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिलेल्या आमदार, खासदार आणि नेत्यांविषयी नियमीत विधाने करुन त्यांच्यावरही संशय निर्माण केला जात आहे. त्या नेत्यांच्या निष्ठेविषयी भाष्य करुन त्यांच्याबाबत समाजामध्ये, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा कुटील डाव आखला जात, असल्याची चर्चा काँग्रेसच्या वर्तुळात आहे.
महाविकास आघाडीची रविवारी छत्रपती संभाजीनगर येथे सभा झाली. त्या सभेनंतर शिंदे गटाचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु झाली आहे. शिरसाट म्हणाले, काँग्रेस नेते अशोक चव्हाण हे लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपमध्ये जातील, असे वक्तव्य त्यांनी केले. त्यामुळे पुन्हा अशोक चव्हाण यांच्या विषयी चर्चा सुरु झाली आहे.
दरम्यान, या आधीही काँग्रेस नेते राहुल गांधी यांची 'भारत जोडो यात्रा' नांदेडमध्ये प्रारंभ होणार होती, त्यापूर्वीच विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीत अनुपस्थित राहिल्याचे कारण दाखवत चव्हाण भाजपमध्ये येणार अशी चर्चा सुरू करण्यात आली होती. खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी चव्हाण भाजपमध्ये आले तर त्यांचे स्वागतच होईल, असे म्हटले होते. त्यामुळे केवळ नांदेड जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रात चव्हाण भाजपमध्ये जाणार का? अशी चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर चव्हाण यांची खुलासे करताना दमछाक झाली.
माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख (Amit Deshmukh) यांचे पुत्र अमित देशमुख यांनाही सतत या संबंधात खुलासे करावे लागत आहेत. आतापर्यंत दोन-तीन वेळा त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरु करण्यात आली आहे. माजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले होते, अमित देशमुख, धीरज देशमुख हे प्रिन्स आहेत. आम्हाला असे प्रिन्स नकोत, या वक्तव्यामुळे अमित देखमुख आणि धीरज देखमुख भाजपमध्ये जाणार का? अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र, त्यांना आम्ही भाजपमध्ये घेणार नाही, असेही त्यांनी सांगितले होते. तर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विविध पक्षातील मातब्बर मंडळी भाजपमध्ये येतील असे सांगितले होते.
फेब्रुवारीमध्ये 'सरकारनामा'ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये अशोक चव्हाण यांच्या भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांवर प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर चव्हाण म्हणाले होते, आपले हितशत्रू अशी चर्चा घडवून आणतात. भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच येत नाही. चर्चा घडवून आणाऱ्यांना त्यातच आनंद वाटतो, असे त्यांनी स्पष्ट केले होते.
तर अमित देशमुख यांनीही बाभळगावचा वाडा शाबूत आहे. कितीही वादळे, वारे आले तरी त्याला काही फरक पडणार नाही. आपण आहोत तिथे बरे आहोत कुठेही जाणार नाही, असा खुलासा करावा लागला होता. मात्र, अशोक चव्हाण, देशमुख आणि ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी खुलासे करुनही कार्यकर्त्यांमध्ये कुजबुज सुरु राहतेच.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.