Ambadas Danve News : अंबादास दानवे यांना बळ देत उद्धव ठाकरेंचा सूचक इशारा...

Uddhav Tahckeray And Chandrakant Khiare : शिवसेनेमध्ये नेतेपद हे मोठे मानाचे आणि प्रतिष्ठेचे मानले जाते. दानवे यांची शिवसेना नेतेपदी नियुक्ती झाल्यामुळे आता केवळ संभाजीनगर जिल्ह्यातीच नाही तर मराठवाड्यातील राजकारण बदलणार आहे.
Uddhav Tahckeray, Ambadas Danve
Uddhav Tahckeray, Ambadas DanveSarkarnama

Marathwada Politics : विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांची अचानक शिवसेना नेतेपदी नियुक्ती करत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा आणि संभाजीनगर जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणीची मोठी जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. कुणाच्याही ध्यानीमनी नसताना ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दानवे यांना बळ देत ठाकरेंनी त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांना सूचक इशारा दिल्याचे मानले जाते. Uddhav Thackeray Promote Ambadas Danve in Marathwada

गेल्या दोन महिन्यांपासून छत्रपती संभाजीनगरच्या लोकसभा उमेदवारीवरून शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे Chandrakant Khaire आणि अंबादास दानवे यांच्यात संघर्ष सुरू होता. हा संघर्ष थेट मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या समोरही घडला. यावरून या दोन नेत्यांमधील वादाचा फटका आधीच राज्यात कुमकुवत झालेल्या शिवसेनेला बसू नये याची खबरदारी घेत ठाकरे यांनी खैरे आणि दानवे या दोघांचाही सन्मान राखला. खैरे यांना लोकसभेची उमेदवारी देऊन तर दानवे यांना शिवसेना नेतेपदी बढती देत समन्वय साधला.

अंबादास दानवे Ambadas Danve यांनी 2014 आणि 2019 अशा दोन्ही लोकसभा निवडणुकीत पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. परंतु 2014 मध्ये विद्यमान खासदार असलेल्या खैरे यांना उमेदवारी टाळणे पक्षासाठी घातक ठरले असते. त्यामुळे दानवेंना सबुरीचा सल्ला देण्यात आला. नाराज झालेल्या अंबादास दानवे यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत खैरे यांच्याविरोधात काम केल्याचा आरोप त्यांच्या पराभावानंतर झाला.

खैरेंचा पराभव म्हणजे 2024 ची उमेदवारी पक्की, असा समज अंबादास दानवे व त्यांच्या समर्थकांनी करून घेतला होता. परंतु पक्षांतर्गत गटबाजी, शिवसेनेच्या माजी आमदाराने केलेली बंडखोरी, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची त्यांना झालेली छुपी मदत, अशा चोहोबाजूंनी संकटे असताना खैरे यांनी संभाजीनगरचा Chhatrapati Sambhajinagar किल्ला नेटाने लढवला. त्यांचा अवघ्या साडेचार हजार मतांनी पराभव झाला. हा पराभव उद्धव ठाकरेंच्याही जिव्हारी लागला होता. त्यामुळे 2024 मध्ये खैरे यांना संधी नाकारणे त्यांच्यावर अन्यायकारक ठरले असते. शिवाय शिवसेना पक्षात मोठी फूट पडल्यानंतर चंद्रकांत खैरे पक्षाशी एकनिष्ठ राहिले. त्यामुळे अंबादास दानवे यांचा दावा असतानाही ठाकरेंनी शिवसेनेत ज्येष्ठांचा सन्मान केला जातो, असा संदेश देत खैरे यांना सहाव्यांदा उमेदवारी दिली.

Uddhav Tahckeray, Ambadas Danve
Sushma Andhare News: अंधारेंनी राणेंना दिल्या शुभेच्छा; म्हणाल्या, 'चांगल्या डॉक्टरांना दाखवा, लवकर बरे व्हा...'

आता याचे राजकीय पडसाद दानवे यांच्या नाराजी नाट्यातून उमटले. अगदी शिवसेना शिंदे गटाकडून पक्षात येण्याच्या ऑफरची चर्चा आणि स्वतः दानवे यांनी तशी कबुली दिल्यामुळे वरिष्ठ नेत्यांनी याची तातडीने दखल घेतली. अंबादास दानवे यांच्यासारखा आक्रमक, संघटनेवर मजबूत पकड असलेला आणि विरोधकांवर तुटून पडणारा नेता पक्ष सोडून गेला तर लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात चुकीचा संदेश जाईल. तसेच पक्षाला हानी पोहोचेल हे लक्षात घेऊन तातडीने पावले उचलली गेली.

उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांच्या आदेशाने झालेल्या संघटनात्मक फेररचनेत अंबादास दानवे यांना थेट नेते पदावर बसवण्यात आले. शिवसेनेमध्ये नेतेपद हे मोठे मानाचे आणि प्रतिष्ठेचे मानले जाते. दानवे यांच्या या तातडीने करण्यात आलेल्या नियुक्तीमागे त्यांच्या पक्षांतराची चर्चा प्रमुख कारण असल्याचे बोलले जाते. दानवे यांची शिवसेना नेतेपदी नियुक्ती झाल्यामुळे आता केवळ संभाजीनगर जिल्ह्यातीच नाही तर मराठवाड्यातील राजकारण बदलणार आहे. आतापर्यंत शिवसेना नेता म्हणून चंद्रकांत खैरे यांच्या हाती जिल्ह्याची सूत्रे होती. ती आता पूर्णपणे अंबादास दानवे यांच्या हाती जातील.

Uddhav Tahckeray, Ambadas Danve
Constitution News : नवीन संविधानासाठी हवेत दोन तृतियांश खासदार! भाजप खासदार थांबेनात, पुन्हा वादग्रस्त विधान

चंद्रकांत खैरे हे शिवसेनेचे नेते आहेत. या नेतेपदाचा रुबाब आणि धाक ते कायम दाखवत आले आहेत. विशेषतः अंबादास दानवे आणि खैरे यांच्यात वादाची ठिणगी पडायची तेव्हा खैरे त्यांना आपल्या नेते पदाची आठवण करून द्यायचे. मात्र उद्धव ठाकरे यांनी आता हा फरकच ठेवला नाही. संभाजीनगर जिल्ह्यात दोन शिवसेना नेते झाल्यामुळे सत्तेचे आणि संघटनेचे विकेंद्रीकरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. खैरे-दानवे यांच्या वादामुळे जिल्ह्यातील शिवसेना दोन नेत्यांमध्ये विभागली गेलेली आहे. आता खैरे यांच्या सोबतच दानवे हेही नेते झाल्यामुळे हा वाद थांबणार की अधिक बळवणार? हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.

आता झालेल्या काही संघटनात्मक नियुक्त्यांवरून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी हे नाराज झाले होते. शहरात म्हणजेच त्यांच्या कार्यक्षेत्रात झालेल्या नियुक्त्या आपल्याला विश्वासात न घेता केल्याचा आरोप करत तनवाणी नाराज झाले होते. त्यांचा राग जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्यावर होता. राजू वैद्य यांची महानगर प्रमुख पदी झालेली निवड तनवाणी यांना खटकली. मात्र ठाकरेंनी आता दानवेंना शिवसेना नेतेपद बहाल करत जिल्ह्यातील प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्त्याला त्यांच्याच मार्गदर्शनाखाली काम करावे लागणार हे स्पष्ट केले. त्यामुळे आता किशनचंद तनवाणी नेमकी काय भूमिका घेतात याकडेही सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एकूणच अंबादास दानवे यांना शिवसेना नेतेपद देत उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर आपला असलेला विश्वास अधिक दृढ केला आहे. या नियुक्तीनंतर अंबादास दानवेंच्या पक्षांतराच्या चर्चाही बंद होतील. शिवाय लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांना निवडून आणण्यासाठी नेते म्हणून दानवे यांच्यावर आता मोठी जबाबदारी असणार आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Uddhav Tahckeray, Ambadas Danve
Lok Sabha Election 2024 : घटना बदलाच्या चर्चेवर दानवे म्हणतात, "सूर्य, चंद्र, तारे असेपर्यंत हा देश संविधानावर..."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com