
अवकाळी आलेल्या पावसाने मुंबईची पार दैना झाली. या पावसानंतर सत्तेबाहेरच्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने सत्तेतल्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला रिंगणात ओढले. सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या विरोधात सत्तेत नसलेल्या शिवसेनेने बोलत राहायचे, हे आता पक्के झाले आहे. शिवसेना ठाकरे पक्षासाठी विरोधक भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षदेखील आहेत. तरीही ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर शिंदेंचा शिवसेना शिंदे पक्षच आहे.
पाहुण्यांनी ठरवलेल्या तारखेच्या पंधरा दिवस अगोदर न कळवता मुंबईतल्या १८० चौरस फुटांच्या घरात आगमन केल्यावर काय तारांबळ उडते, याची गिरणगावातल्या मुंबईकरांना चांगलीच कल्पना आहे. राज्यात ऐन उन्हाळ्यातच मेमध्ये हजेरी लावलेल्या ‘अवकाळी’ने सत्ताधाऱ्यांची अगदी अशीच काहीशी भंबेरी उडवली. कुठे नद्यांना पूर, तर कुठे बंधारे फुटले, कुठे आंब्याचा शेवटचा बार काढण्यापूर्वीच त्याला पावसाने गाठले, तर कुठे शेतीची भाजणी सुरू असतानाच निखाऱ्यांवर पाणी पडलं, तर अनेकांचे कांदे चाळ लावण्यापूर्वीच पाण्यासोबत मातीमोल झाले.
शहरांची तऱ्हा त्याहून निराळी. मंत्रालयात पहिल्यांदाच पाणी शिरले आणि ‘केम्स कॉर्नर’ येथे रस्ता खचला. रस्त्यांची कामे र्धवट तर अनेक ठिकाणी नाल्यातून गाळ काढलाच गेलेला नाही. जिथे गाळ काढला गेला तिथेही नाल्याच्या बाहेर तोंडावरच काढून ठेवला होता. पर्यायाने मुंबई-पुण्यात नाल्यांनाही पूर आले. पावसाळ्यापूर्वी पाणी वाहून जाण्यासाठीची यंत्रणाच सुरू करण्यात आली नव्हती. त्यामुळे पंधरा दिवसांपूर्वी सुरू झालेल्या भुयारी ‘मेट्रो’ची एक भिंत पाण्याच्या लोंढ्याने कोसळली.
नव्या नवलाईचे भूमिगत वरळीचे ‘मेट्रो’ स्थानक माती-गाळाने भरून गेले. घामांच्या धारांनी हैराण झालेले मुंबईकर या अवकाळी ‘ओल्या उन्हाळ्या’ने अचंबित तर झालेच पण त्याहूनही जास्त खिळखिळ्या झालेल्या पायाभूत सुविधांमुळे झाले. मुंबईची पार दैना झाली. याला जबाबदार कोण? अवकाळीनंतर आजूबाजूला पसरली होती ती आरोप प्रत्यारोपांची दलदल. सत्तेबाहेरच्या शिवसेनेने सत्तेतल्या शिवसेनेला वादाच्या रिंगणात ओढले. भाजपने तर शिवसेना मुंबईत सत्तेत असतानाच्या काळातील प्रकल्पांची श्वेतपत्रिकेची मागणी केली
२०१९ पासून नगरविकास विभागाचे मंत्री असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शहरांतील पायाभूत सुविधांचे पितळ उघडे पडल्याने ‘बॅकफूट’वर आले. बांधकामांच्या निकृष्ट कामांची जबाबदारी कोणाची यावर चर्चा सुरू झाली आहे. सुमार कामांचे आयुष्य छोटे असते. जे अवकाळी पावसाच्या शिडकाव्याच्या ओलाव्यानेही वाहून जाते. मुंबईतील पहिल्या भुयारी ‘मेट्रो’चे उद्घाटन काही दिवसांपूर्वीच झाले होते. त्या भुयारी ‘मेट्रो’ची भिंत कोसळून त्यातून पाणी घुसले. त्यानंतर वरळी ‘मेट्रो’च्या त्या स्थानकाची झालेली वाताहत सर्वांनीच पाहिली.
या निकृष्ट कामाची जबाबदारी उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंची जितकी आहे तितकीच ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव आणि ‘एमएमआरसी’च्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांचीही आहे. पण या प्रकरणात फडणवीस आणि त्यांचे सहकारी नामानिराळे राहिले, सर्व खापर शिंदेंवर फोडले गेले. शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी तर शिंदेंना ‘भ्रष्टनाथ’ ही पदवीच देऊन टाकली.
‘मान्सून’च्या सुरुवातीलाच शिवसेना शिंदे पक्षाला पोहोचलेली ही झळ काही थांबली नाही. विधिमंडळाची अंदाज समिती धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना तेथील विश्रामगृहातील एका खोलीमध्ये एक कोटी ८५ लाखांची रोकड आढळली. या समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर आहेत. ज्या खोलीत रोकड आढळून आली ती खोली खोतकर यांच्या स्वीय सहायकाच्या नावावर आरक्षित होती.
ही रक्कम समितीतील सदस्यांना देण्यासाठी विश्रामगृहात ठेवल्याचा आरोप केला जात आहे. खोतकर हे शिंदेंच्या शिवसनेचे आमदार आहेत. ही रोकड विश्रामगृहातील खोलीत असल्याची पक्की खबर ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार अनिल गोटे यांना लागली. गोटे ही संधी कशी सोडणार होते. गोटेंनी संपूर्ण रात्र या खोलीच्या बाहेर ठिय्या धरला अन् ती रोकड जप्त करायला पोलिसांना भाग पाडलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. संबधित सचिवाला निलंबित करण्यात आलं. शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांना पत्र लिहून या घटनेची उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली. महाराष्ट्राच्या संसदीय परंपरेला आणि विधिमंडळाच्या पावित्र्याला कलंकित करणारी ही घटना आहे.
विधिमंडळ हे जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी असलेल सर्वोच्च व्यासपीठ आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांकडून त्याचा वापर एका ‘डील’च्या माध्यमासारखा करण्यात येतोय, ही गोष्ट अत्यंत निंदनीय आहे. या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी होणे अत्यावश्यक आहे. \
कोणत्याही आमदाराने, समिती सदस्याने किंवा शासकीय कर्मचाऱ्याने अशा प्रकारच्या गैरप्रकारात सहभाग घेतला असेल, तर त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी करत शिवसेना शिंदे पक्षाच्या आमदाराची कोंडी केली. हे प्रकरण दडपले जाऊ नये यासाठी भाजपकडूनही हातभार लावला जातोय. एरवी आमदारांसाठी ढाल बनून पुढे येणारे एकनाथ शिंदे या प्रकरणापासून मात्र लांब राहिले. हे प्रकरण संबंधित स्वीय सचीव कुणाल पाटीलपर्यंतच थांबेल, यासाठी ते प्रयत्नरत आहेत.
मंत्री संजय शिरसाटांसाठी यंदाचा मे चांगलाच स्मरणात राहणारा असेल. एकाच पंधरवड्यात ‘पुत्रप्रेमा’ने त्यांना दोनदा अडचणीत आणले. एका विवाहित महिलेने त्यांच्या मुलावर लैंगिक शोषणाचे केलेले आरोप अन् दुसरे लिलावातील हॉटेलच्या खरेदी प्रकरणी त्यांच्या मुलावर आरोप आहेत. औरंगाबाद येथील ‘व्हिट्स’ हॉटेलच्या वादग्रस्त खरेदी प्रक्रियेतून शिरसाट यांना माघार घ्यावी लागली. अंदाजे ११० कोटींचे हॉटेल ६८ कोटी रुपयांत खरेदी करत असल्याचा आरोप शिरसाट यांच्यावर शिवसेना शिंदे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी करत शिरसाटांना चांगलेच घेरले.
या प्रकरणाची कागदपत्रांसह तक्रार दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. ‘रेडीरेकनर’नुसार या हॉटेलची किंमत ११० कोटी, तर बाजारभावाचे मूल्य यापेक्षा अधिक असल्याचा दावा अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात केला होता. ११० कोटींच्या हॅाटेलची किंमत जवळवास ५० टक्यांनी कमी कशी झाली? शिरसाटांच्या मुलाचे सहभागीदार कोण? कोणत्या बॅंकेचे कर्ज घेतले? असे नाना प्रश्न उपस्थित करत दानवेंनी शिरसाटांची कोंडी केली. त्यामुळे या प्रक्रियेतून माघार घेण्याची वेळ शिरसाटांवर आली.
हॉटेल खरेदी प्रकरणाला तोंड फुटण्यापूर्वीच सात-आठ दिवस अगोदरच शिरसाटांच्या मुलगा सिद्धांत शिरसाट यांचे एक कथित प्रकरण बाहेर आले होते. सिद्धांत शिरसाट यांच्यावर एका विवाहित महिलेने शारीरिक छळ केल्याचा आरोप केला होता. तसेच मारहाण आणि जबरदस्तीने गर्भपात करायला लावल्याची तक्रार करत अॅड. ठोंबरे यांच्यामार्फत नोटीस पाठवली होती. पण शिरसाट यांनी सगळी शक्ती पणाला लावली. संबंधित महिलेला तक्रार मागे घ्यायला लावून हे प्रकरण थांबविण्याचा प्रयत्न केला.
हे प्रकरण निस्तरत असतानाच छत्रपती संभाजीनगरमधील रेल्वे स्थानकाजवळील ‘व्हिट्स हॉटेल’ खरेदी प्रकरणावरून शिवसेना ठाकरे पक्षाने त्यांना घेरले. हे हॉटेल खरेदी करण्यासाठी संजय शिरसाट यांनी पैसा कुठून आणला? असा सवाल करत ५० खोक्यांच्या पैशातून हे हॉटेल खरेदी केले आहे का? या शब्दात विरोधकांनी सुनवायला सुरुवात केली. सत्तेत असताना देखील हॉटेल खरेदी प्रकरणातून संजय शिरसाटांनी माघार घ्यावी असा सल्ला त्यांचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना दिल्याचे समजते. या प्रकरणात शिरसाटांना घेरण्यासाठी दानवे यांचा वापर भाजपने केल्याचे बोलले जाते. भाजपचे ‘चाणक्य’च या प्रकरणी महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे लक्षात आल्याने शिंदेंनी शिरसाट यांना या लिलावातून माघार घेण्याचे सल्ला दिल्याची चर्चा आहे. या दोन्ही प्रकरणांतून शिरसाटांनी दगडाखालून शिताफीने हात काढून घ्यावा लागलेला आहे. पण ही दोन्ही प्रकरणे इतक्यातच थांबणारी नाहीत. पावसाळी अधिवेशन तोंडावर असल्याने विरोधकांच्या हाताला ही प्रकरणे लागलेली आहेत.
शिंदेंच्या शिवसेनेची कोंडी करण्यासाठी अन्य कोणाची गरज अनेकदा पडत नाही. त्यासाठी त्यांचेच नेते सक्षम आहेत. या पक्षाचेच मंत्री प्रताप सरनाईक. त्यांचा मीरा-भाईंदर हा हिंदी भाषिकांचा विधानसभा मतदारसंघ असल्याने त्यांनी हिंदी हीच मुंबईची बोलीभाषा असल्याचे जाहीर करून टाकले आहे. त्यावरून त्यांनी सारवासारव केली असली तरी मुंबईची भाषा ही गुजराती नव्हे तर मराठीच रहावी, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा तत्कालीन शिवसेनेने दिलेला लढा हे यांच्या गावीही नसावे ही चिंतेची बाब आहे. विशेष म्हणजे शिवसेनेच्या आमदाराचे हे वक्तव्य आहे. शिवसेना ठाकरे पक्षानेही याकडे फार लक्ष दिलेले नाही. अलीकडे हिंदी, गुजराती भाषिक ही ‘व्होट बॅंक’ जपण्याचा प्रयत्न शिवसेना ठाकरे पक्षही करू लागला आहे.
सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या विरोधात सत्तेत नसलेल्या शिवसेनेने बोलत राह्यचे हे आता पक्के झाले आहे. शिवसेना ठाकरे पक्षासाठी विरोधक भाजप आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेसही आहे. एकाच सत्तेत असूनही ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर शिंदेंची शिवसेनाच आहे. उदाहरणार्थ- मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) महत्त्वाकांक्षी असा गायमुख, ठाणे-फाऊंटन हॉटेल नाका, वसई दुहेरी बोगदा आणि फाऊंटन हॉटेल नाका, वसई-भाईंदर उन्नत रस्ता प्रकल्पाची अंदाजे १५ हजार कोटी रुपयांची निविदा सर्वोच्च न्यायालयात प्रकरण गेल्यावर रद्द केली.
सरकार म्हणून या प्रकरणाची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निश्चित व्हायला हवी. मात्र, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणात एकनाथ शिंदे यांच्या चौकशीची मागणी फडणवीस यांच्याकडे करून, फडणविसांना अलगद बाजूला ठेवले. ठाकरेंच्या शिवसेनेला त्यांचा विरोधक हा भाजपसह शिंदेंची शिवसेना आहे की केवळ शिंदेंच्या शिवसेनेसोबतच त्यांना दोन हात करून भाजपसोबत कधीही जाण्यासाठी दरवाजे मोकळे ठेवायचे आहेत, हे ठरवावे लागेल. कारण ठाकरे पक्षाच्या प्रतिकारामध्ये अजून त्यांचा विरोधक निश्चित होत नसल्याने धरसोडपणाच दिसून येत आहे. त्यामुळे अधिवेशनाच्या तोंडावर विरोधकांच्या हातात दारूगोळा असूनही ते त्यामुळेच निःशस्त्र वाटत आहेत.
Edited by: Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.