Mahavikas Aaghadi CM News : कोण असेल मविआचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा, ठाकरे, पटोले की पाटील?

Maharashtra Politics : कोण असेल महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा? पुन्हा एकदा उद्धव ठाकरे की नाना पटोले की जयंत पाटील? का इतर कुणी? हा प्रश्न जसा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना पडलाय ना तसाच तो महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनाही पडलाय.
Nana Patole, Sharad Pawar, Uddhav Thackeray
Nana Patole, Sharad Pawar, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवण्यात यावा, असं काही दिवसांपूर्वीच संजय राऊतांनी म्हटलं होतं. बिनचेहऱ्याचं सरकार अजिबात चालणार नाही, अशी भूमिका देखील त्यांनी मांडली होती. अर्थात, त्यांच्या मनात उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील, हे ओळखायला कुण्या ज्योतिषाची गरज नाही.

मविआ सरकारचे पहिले मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली होती. विशेष म्हणजे कोरोना काळात त्यांनी महाराष्ट्रातली परिस्थिती चांगल्याप्रकारे हाताळली होती. पक्षफुटीनंतरही पक्षाला लोकसभेत चांगलं यश मिळवून देणारे उद्धव ठाकरे पुन्हा कसे मुख्यमंत्री होतील यासाठी शिवसैनिक यंदाच्या विधानसभेला आणखी जोर लावणार हे नक्की!

नाना पटोलेंना 'रिटर्न गिफ्ट' मिळणार का?

मागच्या लोकसभेत महाराष्ट्रातला एकमेव खासदार असलेल्या काँग्रेसला यंदाच्या लोकसभेनं 13 खासदार मिळवून दिले. त्यामुळं विधानसभेलाही आपला पक्ष किमया करून दाखवेल, असा विश्वास काँग्रेसची नेतेमंडळी व्यक्त करत आहेत. बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, नाना पटोले ही नेतेमंडळी सत्ताधाऱ्यांवर तुटून पडत आपली ताकद दाखवून देत आहेत. कधी नव्हे ते काँग्रेसचे हे नेते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत.

लोकसभेला मिळालेला बूस्टर डोस विधानसभेला कामी पडेल, याची खात्री बाळगून हे नेते विधानसभेच्या मैदानात उतरण्यास सज्ज झाले आहेत. लोकसभेपूर्वी नाना पटोले यांच्याविषयी स्वपक्षातील नेत्यांनी अनेक तक्रारी करूनही पक्षाच्या हायकमांडनं त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि दिल्लीत 13 खासदार पाठवून नानांनी तो सार्थही ठरवला. त्यामुळं लोकसभेपाठोपाठ विधानसभाही जिंकून दिल्यास हायकमांड नाना पटोलेंना 'रिटर्न गिफ्ट' म्हणून मुख्यमंत्रिपद देऊ शकते.

जयंत पाटलांसाठी शरद पवार जोर लावणार का?

आता थोडं महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीविषयी बोलू... महाराष्ट्रातील जनतेवर शरद पवार नावाचं गारुड आजही कायम आहे हे लोकसभेला दिसून आलंय. महाराष्ट्राचे 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या शरद पवारांना विधानसभा निवडणूक काही नवीन नाही. यंदाच्या निवडणुकीत आपल्या पक्षाचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्यासाठी ते प्रयत्नांची पराकाष्ठा करणार हे नक्की! त्यामुळं पक्षफुटीनंतरही पक्षाशी आणि शरद पवारांशी एकनिष्ठ राहिलेले जयंत पाटील (Jayant Patil) मुख्यमंत्रिपदाचे दावेदार ठरू शकतात.

Nana Patole, Sharad Pawar, Uddhav Thackeray
Manoj Jarange Patil : मोठी बातमी! मनोज जरांगे-पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट; काय आहे प्रकरण?

जो पक्ष जास्त जागा जिंकेल त्याचा मुख्यमंत्री!

मात्र, आताच्या विधानसभा निवडणुकीपूर्वीची राजकीय परिस्थिती वेगळी आहे. त्यात नुकत्याच लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ती आणखी बदलली आहे. मविआनं 21-17-10 असा फॉर्म्युला ठरवत लोकसभा लढवली आणि 48 पैकी 30 जागा जिंकून आणण्यात यशस्वी देखील झाली.

या निकालानं शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट या तिन्ही पक्षांचा आत्मविश्वास कमालीचा दुणावलाय पण ती होती लोकसभा आणि ही आहे विधानसभा! या निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वांत मोठा पक्ष ठरण्यासाठी जो तो सर्वांत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी धडपडतोय.

ठाकरे गटानं एकट्या मुंबईतील 36 पैकी 25 जागांवर गळ टाकून ठेवलाय तर लोकसभेला महाराष्ट्रात सर्वांत मोठा पक्ष ठरलेल्या काँगेसनं यंदाच्या विधानसभेसाठी सर्वच्या सर्व म्हणजे 288 जागांवर आपला सर्व्हे सुरू केलाय. तिकडं पक्षात फूट पडूनही लोकसभेला 10 जागांपैकी 8 जागा जिंकून आणणारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट देखील पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रातील जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी दावा करणार हे सांगायला नको.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com