
पीठासनावर विराजमान असताना आणि दररोजच्या कार्यवाहीचे अवलोकन करताना इतर कोणाहीपेक्षा माझ्या लक्षात आले,की मसुदा समितीच्या सदस्यांनी आणि विशेषतः तिचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांची प्रकृती बरी नसतानासुद्धा किती अप्रतिम उत्साहाने आणि समर्पित वृत्तीने कार्य केले आहे.
आम्ही त्यांना मसुदा समितीवर निवडले आणि त्यांना तिचे अध्यक्ष केले यापेक्षा अचूक निर्णय आम्ही कधी केला नाही आणि कधी करणेही शक्य नव्हते. त्यांनी त्यांची निवड केवळ सार्थच केली नाही, तर त्यांनी केलेल्या कार्याला कीर्ती प्राप्त करून दिली आहे आणि त्यासाठी ते देशाच्या आभारास पात्र आहेत,’’ असे गौरवोद्गार भारताचे पहिले राष्ट्रपती आणि संविधान सभेचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र प्रसाद यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल काढलेले आहेत.
याचे कारण म्हणजे स्वातंत्र्यानंतर देशाचा कारभार सर्वसमावेशकपणे व एकसूत्री पद्धतीने चालण्यासाठी जी राज्यघटना तयार करण्यात आली, ती डॉ. आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली.स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्थापन केलेल्या मंत्रिमंडळात डॉ. आंबेडकर यांना निमंत्रित करून त्यांच्याकडे कायदे मंत्रिपद सोपविण्यात आले.
त्याचबरोबर २९ ऑगस्टला त्यांची मसुदा समितीच्या सदस्यपदी निवड करून दुसऱ्याच दिवशी ते समितीचे अध्यक्ष झाले. या समितीत डॉ. आंबेडकर यांच्यासह सात सदस्य होते. मात्र ते वगळता इतर बहुतेक सदस्य काही कारणाने समितीच्या कामात पूर्णवेळ भाग घेऊ शकले नाहीत. त्यामुळे राज्यघटना निर्मितीचे आव्हानात्मक काम त्यांच्या खांद्यावर आले.
डॉ.आंबेडकर यांनी सहा महिने दिवसरात्र मेहनत घेऊन ३१५ अनुच्छेद आणि आठ अनुसूची असलेला राज्यघटनेचा सर्वसमावेशक मसुदा तयार केला. भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार असलेल्या डॉ. आंबेडकर यांनी या दस्तऐवजात न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्वाची तत्त्वांकडे पुरेपूर लक्ष देऊन त्यावर आधारित बाबींचा समावेश केला.
त्यांनी केलेल्या मसुद्यातील अनुच्छेदांना संविधान सभेकडून मंजुरी घेताना सभागृहात विद्वत्तापूर्ण चर्चा झडल्या. चर्चांना उत्तर देताना डॉ. आंबेडकर यांनी भाषणे केली, ती घटनात्मक पांडित्याचा उत्कृष्ट नमुना म्हणून अजरामर झाली आहेत. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस व्हॉल्युम १३’ या ग्रंथांत आपणास हे सर्व वाचावयास मिळते. मात्र या खंडातील अतिमहत्त्वाच्या चर्चेचा भीमराव के. राऊत यांनी त्यांच्या ‘भारतीय संविधान निर्मितीत डॉ. बी. आर. आंबेडकरांचे योगदान’ या ग्रंथात समावेश केला आहे.
ग्रंथात पहिले प्रकरण ‘संविधान सभेची स्थापना आणि तिची पहिली बैठक’ असे आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर भारतीय स्वातंत्र्याचा मुद्दा प्रखर झाला होता. त्यानंतरच्या घटनांचा आढावा घेत संविधान सभेचा स्थापना, राज्यघटना निर्मितीच्या कार्यास चालना व पं. नेहरू यांनी मांडलेला ध्येय व उद्दिष्टांचा ठराव, दुरुस्तीवर डॉ. आंबेडकर यांचे अर्थपूर्ण भाषण व त्याचा अपेक्षित परिणाम साधल्यानंतर त्यांनी राज्यघटनेचा मसुदा तयार करून संविधान सभेच्या अध्यक्षांना लिहिलेले पत्र वाचायला मिळते. उद्देशपत्रिकेतील ‘सार्वभौम’ या शब्दाची उकल व त्याचबरोबर भारताचे वर्णन, विविध मुद्द्यांवरील डॉ. आंबेडकर यांनी त्यांची मते अध्यक्षांना कळविली.
दुसऱ्या प्रकरणात राज्यघटनेच्या मसुद्याचे पहिले वाचन येते. चार नोव्हेंबर १९४८ रोजी भारतीय संविधान सभेची बैठक नवी दिल्लीत झाली. त्यावेळी डॉ. आंबेडकर यांनी राज्यघटनेचा मसुदा सादर सादर केला. त्यांनी अतिशय सुगम आणि विद्वत्तापूर्ण भाषणातून राज्यघटनेच्या वैशिष्ट्यांचे स्पष्टीकरण केले. अध्यक्षीय व संसदीय अशा दोन्ही शासन पद्धतीमधील वेगळेपणही डॉ. आंबेडकर यांनी विस्तृतपणे दाखवून दिले आहे.
राज्यघटनेचा मसुदा संविधान सभेने मंजूर करण्यापूर्वी अनेक सदस्यांनी मसुदा राज्यघटनेवर आणि डॉ. आंबेडकर यांच्या भाषणावर प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्यातील निवडक प्रतिक्रिया प्रकरण तीनमध्ये वाचायला मिळतात. त्यात कृष्णचंद्र शर्मा, टी. टी. कृष्णमचारी, विश्वनाथ दास, लोकनाथ मिश्रा, काझी सय्यद करीमुद्दीन पी. एस. देशमुख, जोसेफ अल्बान डिसूझा आदी अनेक सदस्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या सुबोध भाषेबद्दल त्यांचे कौतुक करून समितीने परिश्रमपूर्वक, मेहनतीने तयार केलेल्या मसुद्याबद्दल अभिनंदन केले.
चौथ्या प्रकरणात राज्यघटनेच्या मसुद्याचे दुसरे वाचन म्हणजे राज्यघटनेवर अनुच्छेदानुसार चर्चा दिली आहे. दुसऱ्या वाचनास १५ नोव्हेंबर १९४८ रोजी सुरुवात झाली आणि ती १७ ऑक्टोबर १९४९ पर्यंत चालली. मसुद्यातील प्रत्येक अनुच्छेदावर चर्चा करून सदस्यांनी मांडलेल्या दुरुस्त्या विचारात घेतल्या आहेत. हे प्रकरण म्हणजे या ग्रंथाचा गाभा असल्याचे लेखक म्हणतात. या भागात डॉ. आंबेडकर यांनी चर्चेचे जे नेतृत्व केले,
संविधान सभेला जे मार्गदर्शन केले आणि राज्यघटनेच्या ज्या मूलभूत कल्पना सभासदांना स्पष्ट करून सांगितल्या त्यामुळेच त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार संबोधण्यात येते. त्यांनी ज्या नवीन कल्पनांचा समावेश राज्यघटनेत केला, त्या या प्रकरणात समजते. प्रकरण पाच हे राज्यघटनेचे तिसरे वाचन आणि डॉ. आंबेडकरांच्या कार्याचा गौरव करणारी भाषणांचे आहे.
समारोपाचे भाषण राज्यघटनेच्या तिसऱ्या वाचनात सदस्यांच्या भाषणांना उत्तर आणि समारोपाचे भाषण डॉ. आंबेडकर यांनी २५ नोव्हेंबर १९४९ रोजी केले. ते भाषण प्रकरण सहामध्ये आहे. संविधान सभेच्या पहिल्या बैठकीपासून दोन वर्षे ११ महिने १७ दिवसांचा आढावा घेत डॉ. आंबेडकर यांनी दुरुस्त्यांचा उल्लेख करीत वस्तुस्थिती विशद केली आहे. सदस्यांनी केलेल्या कौतुकाबद्दल ते म्हणतात, मला देण्यात आलेले श्रेय खरेतर माझे नाही. अंशतः ते संविधान सभेचे संविधानिक सल्लागार सर बी.एन.राव यांचे आहे. कारण त्यांनी मसुदा समितीच्या विचारार्थ राज्यघटनेचा एक कच्चा मसुदा तयार केला होता. काही श्रेय मसुदा समितीच्या सदस्यांनाही त्यांनी दिले आहे. राज्यघटनेच्या निषेधावरही त्यांनी भाष्य केले आहे. राज्यघटनेच्या ठरावाला मंजुरी आणि संविधान सभेच्या अध्यक्षांचे भाषण प्रकरण सातमध्ये आहे.
पुस्तक - भारतीय संविधान निर्मितीत डॉ. बी. आर. आंबेडकरांचे योगदान
लेखक - भीमराव के. राऊत
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.