राहुल क्षीरसागर
Thane News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यापासून दोन्ही गट एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत. नेहमीच एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जातात. त्यामुळे विशेषतः जितेंद्र आव्हाडांना अजित पवार गटाकडून लक्ष्य केले जात आहे. पक्षकार्यासाठीच्या गाडीबरोबर ड्रायव्हर द्या, दोन बरोबर लोकही द्या, यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर जिल्हाध्यक्ष कुठे पळणार नाहीत, आमदार कुठे पळणार नाहीत, अशी टीका डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. त्या टीकेला ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
पक्षकार्यासाठी यापूर्वीही गाड्या देण्यात आलेल्या आहेत, डॉ. जितेंद्र आव्हाड हे ही याचे लाभार्थी आहेत. आव्हाड हे टीआरपीसाठी अजितदादांवर टीका करतात. निधीवाटपाबाबत जयंत पाटील, राजेश टोपे यांनी तक्रार केलेली नाही. यामुळे निधीवाटपाबाबत आव्हाड यांच्या टीकेवर त्यांच्याच पक्षात कोणी बोलत नाही. यावरुन आव्हाड यांना पक्षातच कोणी सिरियसली घेत नाही हे दिसून येते. ठाणे व पालघर जिल्ह्यातून महायुतीचे चारही लोकसभा उमेदवार निवडून आणणार, असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे (Anand Paranjpe) यांनी व्यक्त केला.
प्रदेश कार्यालयामध्ये दोन गाड्या दाखविण्यासाठी आणल्या होत्या अजुन जिल्हाध्यक्षांना गाड्या द्यायचा कुठलाही निर्णय झालेला नाही. पण जिल्हाध्यक्षांना गाड्या देण्याची ही काही पहिलीच वेळ नाही, यापूर्वीदेखील जिल्हाध्यक्षांना गाड्या दिल्या जात होत्या. २००८ - ०९ या वर्षात देखील महाराष्ट्रातील जिल्हाध्यक्षांना स्कॉर्पिओ गाड्या देण्यात आल्या होत्या. खासकरुन ग्रामीण भागातील जे जिल्हाध्यक्ष येतात त्यांना जिल्हा फिरताना तिथे पुरेशी ट्रान्सपोर्टेशनची साधने नसतात आणि म्हणून पक्ष कार्य करण्यासाठी ती गाडी पक्षाकडून त्यांना दिली जाते.
डाॅ. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awahad) विसरले असतील की ते ही कधी ठाणे शहर जिल्ह्याचे अध्यक्ष होते आणि २००८-०९ साली, तत्कालीन अध्यक्ष अशोक राऊळ यांना जेव्हा पक्षकार्यासाठी गाडी दिली गेली होती. ती गाडी काही काळानंतर जिल्हाध्यक्ष म्हणून डाॅ. जितेंद्र आव्हाड हे वापरत होते. पण माणसाला विस्मृतीची देणगी देवाने दिली आहे. डाॅ. जितेंद्र आव्हाड यांना अनेकदा स्वतःबद्दलच्या गोष्टी आठवत नाहीत म्हणुन बहुतेक त्यांनी गाड्यांबद्दल वक्तव्य केले असावे.
जिल्ह्यामध्ये पक्षाचा प्रचार-प्रसार करण्यासाठी यापूर्वीदेखील गाड्या दिल्या गेल्या आहेत. पुढे जाऊन ते हे देखील म्हणाले की, गाडीबरोबर ड्रायव्हर द्या, दोन बरोबर लोकही द्या, यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर जिल्हाध्यक्ष कुठे पळणार नाहीत, आमदार कुठे पळणार नाहीत, पण असे स्वप्न आव्हाड यांनी पाहू नये, कारण असे काहीही घडणार नाही, ठाण्यातील पदाधिकारी तर तुमच्या डोळ्यात डोळे घालून, तुमच्या देखत सर्व अजितदादांबरोबर गेले, आम्ही कोणीही घाबरलेलो नाही, तुमचा स्वीय सहाय्यक गेला, तुमच्या कार्यालयात काम करणारा तुमचा सहकारी गेला. त्यामुळे आम्हाला कोणालाही घाबरुन कोठे जायची, निवडणूक आल्यात म्हणून कोठे जाण्याची गरज नाही.
आम्ही अजितदादा पवारांचे निष्ठावान आहोत. आम्हाला दोन माणसे गाडी बरोबर द्यावी, अशाप्रकारची कूठलीही परिस्थिती येणार नाही. पण जशा निवडणूका येतील तसतसे तुमच्या आजुबाजुची लोक टिकतील ना, हे तुम्ही आवर्जून तपासून बघावे, असा हल्लाबोल प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी केला.
सध्या डाॅ. जितेंद्र आव्हाड यांना सवयच लागली आहे की, काहीही घडले की, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करायची. कारण त्यांच्यावर टीका केल्याशिवाय आपल्याला टीआरपी मिळणार नाही, हे आव्हाड यांना कळून चुकलेले आहे.
कार्यकर्त्यांना कामाला लागायच्या सूचना
पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच तिसऱ्यांदा अधिकाधिक खासदारांची संख्या घेऊन कसे विजयी होतील. महाराष्ट्रातून ४५ पेक्षा जास्त जागा महायुती कशी लढेल आणि जिंकेल, हा संकल्प घेऊन आम्हा सर्व कार्यकर्त्यांना कामाला लागायच्या सूचना वरिष्ठांनी दिलेल्या आहेत. जो कोणी महायुतीचा उमेदवार असेल त्याचे आम्ही जोरात काम करु आणि ठाणे व पालघर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार विजयी करु, असे मत प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी शेवटी व्यक्त केले.