Thane Lok Sabha Election 2024: महायुतीमध्ये पहिल्यापासूनच ठाण्याच्या (Thane) जागेवरून मतभेद असल्याचं पाहायला मिळत आहे. या मतदारसंघातील तिढा सुटल्याचं वाटत असतानाच उमेदवारीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुकांमधील स्पर्धा दिवसेंदिवस वाढल्याची पाहायला मिळत आहे.
ठाणे मतदारसंघ (Thane Constituency) सोडण्यास भाजप आणि शिंदे गटातील इच्छुक उमेदवार तयार नाहीत. अशातच आता नवीन इच्छुकांच्या एंट्रीमुळे जुन्या इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. त्यामुळेच ठाण्यात रोज उमेदवारी निश्चित झाल्याची चर्चा घडवून आणली जात आहे.
ठाणे जिल्ह्यातील कल्याण व ठाणे लोकसभा मतदारसंघांसाठी महायुतीत सुरुवातीपासूनच रस्सीखेच सुरू होती. दोन्ही मतदारसंघांवर भाजप व शिवसेना (Shivsena) शिंदे गटाने दावा केला होता. मात्र, कल्याणची उमेदवारी विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना दिल्याची घोषणा खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली. त्यामुळे ठाणे मतदारसंघ पुन्हा भाजपकडे येणार, अशी चर्चा रंगून दोन्ही पक्षांच्या इच्छुक उमेदवारांना तयारीला लागण्याचे आदेश देण्यात आले होते. अशातच आता माजी खासदार संजीव नाईक आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या नावाची चर्चा सुरू असून, या दोन्ही नावांना भाजपश्रेष्ठींची देखील पसंती होती. (MP Sanjeev Naik and MLA Pratap Sarnaik)
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सरनाईक यांनी ठाणे लोकसभा लढवणार असल्याचे सांगत पोलिस आयुक्तालयांकडून क्रिमिनल रेकॉर्डही मागवला, तर दुसरीकडे संजीव नाईकांनी थेट प्रचारालाच सुरुवात केली. भाजप आणि शिवसेनेत या मतदारसंघावर दावा केलेला असतानाच काही उमेदवारांनी दावा केल्यामुळे हा तिढा आणखी वाढला. महिनाभरापासून केवळ हा मतदारसंघ कुणाला मिळणार आणि कोण निवडणूक लढवणार, याबाबतच्या चर्चा सुरू आहेत.
आता शिंदे गटाने दावा केलेली रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा भाजपला (BJP) गेल्यामुळे ठाण्याचे चित्र स्पष्ट होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी महायुतीतील जागावाटपाच्या चर्चेत ठाणे शिंदे गटाला सोडण्यास भाजप तयार झाल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. मात्र, सर्व इच्छुकांच्या नावांवर फुली मारत नवीन उमेदवारांना रिंगणात उतरवण्याची चर्चाही झाली असल्याचे समजत आहे. या नवीन उमेदवारांच्या नावाची चर्चा सुरू असून ठाण्याचा उमेदवार नेमका कोण असणार? याचा निकाल दोन दिवसांत लागण्याची अपेक्षा आहे.
R
आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी गेल्याच महिन्यात क्रिमिनल रेकॉर्डचे पत्र पोलिस आयुक्तालयांना पाठवले होते. इच्छुकांच्या गर्दीत नवीन नाव येताच ते महिनाभरानंतर व्हायरल झाले. यामध्ये ते ठाणे लोकसभा निवडणूक लढवणार, असे लिहिल्यामुळे आपल्या नावाची चर्चा घडवून आणण्याची सरनाईकांची खेळी यशस्वी झाल्याचं पाहायला मिळत आहे.
(Edited By Jagdish Patil)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.