Eknath Shinde Sarkarnama
ठाणे

‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून झळकले एकनाथ शिंदेंचे बॅनर!

अशा प्रकारचे बॅनर विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीनंतर लागले होते

सरकारनामा ब्यूरो

ठाणे : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा ‘भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख असलेले बॅनर ठाणे शहरात आज झळकले आहेत. या बॅनरवर शिंदे यांच्याबरोबरच त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचाही फोटो आहे. अशा प्रकारचे बॅनर विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीनंतर लागले होते, त्यानंतर पुन्हा तोच उल्लेख असलेले बॅनर लागल्याने राज्यभर चर्चेला उधाण आले आहे. (Eknath Shinde's banner was erected in Thane mentioning the future Chief Minister)

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा ९ फेब्रुवारी रोजी वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठाणे शहरात त्यांना शुभेच्छा देणारे बॅनर लावले आहेत. मात्र, शहरातील वागळे इस्टेट चेक नाका परिसरात लागलेले फ्लेक्स चर्चेत आले आहेत. कारण, या फ्लेक्सवर नगरविकास मंत्री शिंदे यांचा उल्लेख ‘भावी मुख्यमंत्री’ असा करण्यात आलेला आहे.

दरम्यान, विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीनंतरही असे बॅनर लावण्यात आलेले होते. महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर शिंदे यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आले होते. उद्धव ठाकरे यांनीही भाजपशी काडीमोड घेताना माझा शिवसैनिक मला मुख्यमंत्रीपदावर बसवायचा आहे, असे सांगितले हेाते. पण, त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नावाचा आग्रह काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आग्रह धरला आणि शिंदे यांचे नाव मागे पडले. त्यानंतर शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुन्हा भावी मुख्यमंत्री असे बॅनर ठाण्यात लागले आहेत.

एकनाथ शिंदे यांच्यावर आमचे प्रेम आहे. आम्हाला मनापासून वाटतंय की त्यांनी मुख्यमंत्री व्हावं, तीच भावना आम्ही बॅनरद्वारे व्यक्त केली आहे. आम्ही शिवसैनिक असून ठाणे हा शिवसेनेचा गड आहे. आम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कामावर खूष आहेत. पण, आमच्या स्वप्नातील आणि मनातील इच्छा आम्ही प्रकट केली आहे. एकनाथ शिंदे यांनी एकदा मुख्यमंत्री व्हावे, अशी आमची इच्छा आहे. ही पोस्टरद्वारे व्यक्त केलेली प्रेमाची गोष्ट आहे. ती आम्ही प्रकट केलेली आहे. न्याय मिळेल अथवा मिळणार नाही, हा राजकीय विषय आहे. आम्ही कोणावरही नाराज नाही. एकनाथ शिंदेंना एक वर्षासाठी का होईना मुख्यमंत्री म्हणून काम करू द्यावे, अशी आमची भावना होती, असे बॅनर लावणाऱ्या शिवसैनिकांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT