Pratap Sarnaik
Pratap Sarnaik Sarkarnama
ठाणे

शिवसेनेतील वाद शिगेला : प्रताप सरनाईकांनी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या रद्द

सरकारनामा ब्यूरो

भाईंदर : मिरा-भाईंदर शहरातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. या नियुक्त्या बेकायदेशीर असल्याचे घोषित करून शिवसेना संपर्क प्रमुख, आमदार प्रताप सरनाईक यांनी त्या रद्द केल्याने वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. या निमित्ताने शिवसेनेत स्थानिक पातळीवर सुरू असलेली धुसफूसही चव्हाट्यावर आली आहे. (MLA Pratap Saranaik canceled appointments of ShivSena office bearers)

शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या सर्व अधिकृत नियुक्त्या सामना या मुखपत्रातून प्रसिद्ध होत असतात. परंतु मिरा-भाईंदरमध्ये गेल्या काही दिवसांपासून झालेल्या नियुक्त्या स्थानिक पातळीवर परस्पर करण्यात आल्या होत्या. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची वरिष्ठ नेत्यांसोबत काढलेली छायाचित्रेही समाज माध्यमांत झळकू लागली आहेत. त्यानंतर स्थानिक पातळीवर शिवसेना पदाधिकाऱ्‍यांमध्ये चांगलीच अस्वस्थता निर्माण झाली आहेत. अनेक विभागप्रमुखांना विश्वासात न घेता त्यांच्या परिसरात परस्पर नियुक्त्या केल्या जात होत्या आणि यासंदर्भात ज्या वरिष्ठ नेत्यांसोबत छायाचित्रे काढण्यात येत होती, त्यांनाही अंधारात ठेवण्यात येत होते, अशी माहिती शिवसेनेच्या सूत्रांनी दिली.

यासंदर्भात संपर्कप्रमुख म्हणून आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्यांनी याची गंभीर दखल घेत करण्यात आलेल्या सर्व नियुक्त्या रद्द केल्या आहेत.

स्थानिक पातळीवरील शिवसेना जिल्हाप्रमुख आणि जिल्हा महिला संघटक या दोघांनाही पत्र लिहून प्रताप सरनाईक यांनी नाराजी व्यक्त केली आहे. बेकायदेशीर नियुक्त्यांमुळे संघटनेत वादविवाद सुरू झाले आहेत आणि हे पक्षाच्या शिस्तीत न बसणारे आहे. तसेच, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाचा भंग करणारे आहे. त्यामुळे या सर्व बेकायदेशीर नियुक्त्या रद्द करण्यात येत आहेत. यासंदर्भातील अहवाल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात येणार आहे, असे सरनाईक यांनी या पत्रात नमूद केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT