Raj Thackeray: ठाकरे बंधुंची आज ठाण्यात सभा पार पडली, यावेळी राज ठाकरेंनी यंदाच्या निवडणुकीत सुरु असलेल्या पैशांच्या ऑफर आणि मतदारांना भुलवण्याच्या प्रकारांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. तसंच ज्यांना कोट्यवधींची मिळालेली ऑफर नाकारली त्या लोकांना राज ठाकरेंनी थेट व्यासपीठावरच बोलावलं.
राज ठाकरे म्हणाले, "आज घराघरात पाच पाच हजार रुपये वाटत आहेत मला हे कळत नाही की एका बाजुला हे म्हणतात की आम्ही विकास केला आणि दुसरीकडं पैसे वाटत आहेत आणि म्हणतात आम्हाला मतदान करा. मग विकास काय केला? मला पैसे घेणाऱ्यांची चिंता आहे देणाऱ्यांची नाही. आपण पाच पाच हजार रुपयांत मत विकतो. आपण आपल्या मुलांना काय सांगणार माझे आई-वडिलांनी पैशांसाठी मत विकलं"
पूर्वी गुलामांचा बाजार असायचा तसा या कल्याण डोंबिवलीत गुलामांचा बाजार मांडला होता. इथं ६६ ठिकाणी पैसे देऊन उमेदवारांना अर्ज मागे घ्यायला लावले आणि निवडणुका बिनविरोध केल्या. पोलीस हताश, कोर्टाकडं तर बघायलाच नको. हे कोणतं राज्य आहे? बिनधास्त सगळ्या गोष्टी सुरु आहेत. ठाण्यात एका प्रभागात एकाच कुटुंबातील तिघेजण उभे आहेत. शैलेश धात्रक, मनिषा धात्रक आणि पूजा धात्रक यांना उमेदवारी मागे घेण्यासाठी किती पैशांची ऑफर झाली असेल? तुम्ही कल्पना पण नाही करु शकत. म्हणजे काय लेवलचा बाजार मांडला आहे या लोकांनी. या तीन लोकांना एका घरात मिळून १५ कोटी रुपयांची ऑफर दिली. यांना मुद्दाम मला इकडे बोलवायचं होतं पण ते प्रचार व्यस्त असल्यानं शक्य झालं नाही. यांनी १५ कोटींची ऑफर नाकारुन ते निवडणुकीला उभे राहिले आहेत. १५ कोटी रुपयांची ऑफर नाकारणारे कुठे? आणि ५ हजार रुपयांना मत विकणारे कुठे?
तसंच दुसरी मुलगी राजश्री नाईक हीला ५ कोटी रुपयांची ऑफर झाली. ही ऑफर त्यांनी नाकारली, हे महाराष्ट्राचं स्वाभिमानी रक्त आहे असं संबोधताना त्यांना थेट व्यासपीठावर त्यांनी हजर केलं. सुशील आवटे यांना १ कोटी रुपयांची ऑफर झाली होती पण त्यांनी नाकारले त्यांनाही राज ठाकरेंनी व्यासपीठावर उपस्थित केलं. त्याचबरोबर अजूनही बरेच जण आहेत, ज्यांनी अशी आमिष नाकारली. इतका कुठून येतो हा पैसा काय चाललंय. किती पैसे वाटायचे, यांनी महाराष्ट्रभर पैसे वाटले. कोणाला ५ कोटी, कोणाला १० कोटी कोणाला १५ कोटी रुपये! ही कोणती महाराष्ट्राची निवडणूक आहे? इतकी वर्षे आम्ही निवडणुका बघतोय, अशी निवडणूक नाही पाहिली, असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.