डोंबिवली : "गेल्यावर्षी श्रेय घेण्यासाठी तिसऱ्यांदा लावलेले बॅनर फाटले पण, तरीसुद्धा आमच्या डोंबिवली एमआयडीसी विभागातील रस्ते अजून तसेच आहेत. कामे लवकर चालू करा, तुमच्या अभिनंदनाचे बॅनर आम्ही लावू" असा जाहीर टोला आणि आव्हान मनसेचे राज्यातील एकमेव आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी शिवसेनेला दिले आहे. त्याबाबत त्यांनी ट्विट केले असून ते उद्योगमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) व पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनाही टॅग केले आहे. तसेच मनसेकडून या आशयाचे पत्र स्वरुपात बॅनर देखील डोंबिवलीमध्ये लावले आहेत.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरातील विविध विकास कामांसाठी निधी मंजूर करुन आणल्याचे सांगत सत्ताधारी नगरसेवकांनी मोठमोठे बॅनर लावण्याचा सपाटाच लावला आहे. यात शहरातील रस्त्यांच्या कामाला मिळालेली मंजुरी आणि त्यासाठी मंजूर झालेल्या निधीचे बॅनर देखील शहरभरात झळकले आहेत. मात्र रस्त्यांच्या कामासाठी हा निधी मंजुर होऊन ५ ते ६ महिन्याचा कालावधी उलटला तरी प्रत्यक्षात कामास सुरुवात झालेली नाही असा आरोप करत मनसेने पुन्हा एकदा सत्ताधारी शिवसेनेवर टीकेची झोड उठवली आहे.
आमदार राजू पाटील यांनी नुकतेच एक ट्विट करत याकडे सर्वांचे लक्ष वेधले. "गेल्यावर्षी श्रेय घेण्यासाठी तिसऱ्यांदा लावलेले बॅनर फाटले पण, तरीसुद्धा आमच्या डोंबिवली एमआयडीसी विभागातील रस्ते अजून तसेच आहेत. कामं लवकर चालू करा, तुमच्या अभिनंदनाचे बॅनर आम्ही लावू" पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनाही त्यांनी हे ट्विट टॅग केले आहे.
आमदार पाटील यांनी ट्विट केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना डोंबिवली शहर यांच्यावतीने एमआयडीसी परिसरात लावण्यात आलेले बॅनर सर्व कल्याण डोंबिवलीकरांचे लक्ष वेधून घेत आहेत.
पत्र लेखनच्या स्वरुपात हे बॅनर लावण्यात आले असून यावर 'श्री 'श्रेय'स निधी मंजुरकर यांस, कोपरापासून हात जोडून सप्रेम नमस्कार ! सालाबादप्रमाणे एमआयडीसी येथील रस्त्यांसाठी निधी मंजुर झाल्याचे होर्डींग, ब्यानर दाखवलेत 'कधीतरी तयार झालेला रस्ता सुद्धा दाखवा' आपले कृपाभिलाषी, त्रासलेले डोंबिवलीकर. तसेच होर्डींग आणि ब्यानरबाज मित्र मंडळी, डोंबिवली परिसर असेही बॅनरवर लिहिण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.