devnadara Fadnvis program  Sarkarnama
अकोला

Akola PDKV : अकोल्यात फडणवीस स्टेजवर अन् उडाला गोंधळ; काय घडलं ...

Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या गोंधळामुळे धावाधाव

जयेश विनायकराव गावंडे

Panjabrao Deshmukh : डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त अकोला येथील कार्यक्रमात त्यावेळी मोठी खळबळ उडाली, ज्यावेळी प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका शेतकऱ्याने कार्यक्रमात आक्रमक रूप धारण केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात या कार्यक्रमाचे बुधवारी (ता. 27) आयोजन करण्यात आले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्यासह मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

नियोजित वेळेपेक्षा या कार्यक्रमाला बराच विलंब झाला. त्यामुळे पोलिस व विद्यापीठाच्या सुरक्षा रक्षकांनी परिसरात आयोजित केलेल्या अॅग्रोटेक प्रदर्शनाचा परिसर लोखंडी कठडे लावत बंद केला होता. शेतकऱ्यांसाठी असलेल्या या प्रदर्शनात शेतकऱ्यांनाच जाता येत नव्हते. त्यामुळे अनेकांनी संताप व्यक्त करीत प्रदर्शनातून काढता पाय घेतला.

दुपारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कार्यक्रमस्थळी दाखल झाले. यावेळी अकोला पूर्वचे भाजप आमदार रणधीर सावरकर हे भाषणासाठी व्यासपीठावर आले. आपल्या भाषणात सावरकर यांनी शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान मिळाल्याचा उल्लेख केला. सावरकर यांनी हे सांगताच प्रेक्षकांमधून एक शेतकरी उभा झाला. त्याने आम्हाला कोणतीही रक्कम मिळाली नसल्याचे सांगत आक्रमक रूप धारण केले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे भाजपचे कार्यकर्ते शेतकऱ्याच्या अंगाावर धावले. त्यामुळे पोलिसही लगेचच पुढे सरसावले.

कार्यकर्ते व पोलिसांनी या शेतकऱ्याला तत्काळ ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची चौकशी सुरू करण्यात आली. सभेत विघ्न आणणारा हा व्यक्ती राजकीय पक्षाशी संबंधित आहे काय, याची माहिती घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली. आम्ही तूर्तास संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी करण्यात येत आहे. अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्याबाबत निर्णय झालेला नाही, असे कार्यक्रमस्थळी बंदोबस्तासाठी तैनात पोलिसांनी सांगितले.

या गोंधळानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाषणासाठी व्यासपीठावरील माइकजवळ आले. फडणवीस यांचे भाषण सुरू असतानाच कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी प्रज्वलित करण्यात आलेला दिवा अचानक भडकला. स्टेजच्या मधोमध असलेला दिवा भडकल्याचे लक्षात येतातच कृषी विद्यापीठाचे अधिकारी व कर्मचारी पुढे सरसावले. त्यांनी दिवा बाजूला नेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र ज्वाळांमुळे हा दिवा चांगलाच तापलेला होता. त्यामुळे त्यांना तो सहजासहजी बाजूला करता येत नव्हता.

‘असू द्या.. काही होत नाही त्याने..’

अशात फडणवीस यांनीच मध्यस्थी करीत ‘असू द्या.. काही होत नाही त्याने..’ असे सांगत दिव्याजवळ असलेल्या कर्मचाऱ्यांना जाण्यास सांगितले. त्यानंतर फडणवीस यांनी पुन्हा कार्यक्रमस्थळी उपस्थित शेतकरी व कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांना संबोधित करण्यास सुरुवात केली. अचानक घडलेल्या या दोन्ही प्रकारांची चर्चा मात्र कृषी विद्यापीठाच्या परिसरात चांगलीच रंगली होती.

SCROLL FOR NEXT