Aurangabad DCC Bank: औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी खासदार संदिपान भुमरे आणि आमदार अब्दुल सत्तार या दोन नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू होती. मात्र काल रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या बैठकांमधून अध्यक्षपदासाठी आमदार विलास भुमरे तर उपाध्यक्ष पदासाठी भाजपच्या रामूकाका शेळके यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.
आज प्रत्यक्षात निवडणूक कार्यक्रम घेण्यासाठी झालेल्या बैठकीत अध्यक्षपदासाठी विलास भुमरे यांचा तर रामू काका शेळके यांचा उपाध्यक्ष पदासाठी एकमेव अर्ज आल्याने दोघांचीही निवड बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी समृद्ध जाधव यांनी जाहीर केले. जिल्हा बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत महायुतीने २० पैकी १९ जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली.
नऊ जागांसह शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरल्यामुळे अध्यक्षपदावर त्यांचा दावा प्रबळ मानला जात होता. जिल्हा बँकेच्या निवडणुकीची सगळी सूत्र व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार संदिपान भुमरे यांच्याकडे दिली होती. भुमरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे नऊ संचालक निवडून आले. त्यापैकी पाच संचालक हे बिनविरोध निवडून आले होते. यामध्ये मंत्री संजय शिरसाट आमदार विलास भुमरे, रमेश बोरणारे, समीर सत्तार यांचा समावेश होता.
तर उर्वरित १२ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांची एकमेव जागा सोडता सर्व ११ जागा महायुतीने जिंकल्या. जिल्हा बँकेचा अध्यक्ष कोण होणार यावर दोन आठवड्यांपासून चर्चा सुरू होती. मंत्री अतुल सावे यांचेही नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत होते. मात्र छत्रपती संभाजीनगर- जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांचे नगराध्यक्ष पुत्र समीर सत्तार यांनी बंडखोरी करत दाखल केलेली उमेदवारी परत घेतली होती.
या माघारीच्या बदल्यात शिवसेनेला जिल्हा बँकेचे अध्यक्षपद देण्याचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. तो शब्द भाजपने पूर्ण केला परंतु अब्दुल सत्तार यांना आपल्या मुलाला अध्यक्षपदावर बसवण्याचे स्वप्न मात्र पूर्ण करता आले नाही. शिवसेनेत अध्यक्षपदावरून भुमरे विरुद्ध सत्तार अशी रस्सीखेच सुरू होती. मात्र अशाच वादात महापालिका आणि त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेला विरोधी पक्षात बसावे लागले होते. हा मागचा अनुभव लक्षात घेता अध्यक्षपदावरून शिवसेनेत वाद नको अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतली होती.
सर्वानुमते नाव ठरवा आणि ते कळवा अशा सूचना स्थानिक नेत्यांना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार काल रात्री उशिरा मंत्री अतुल सावे यांच्या निवासस्थानी पालकमंत्री संजय शिरसाठ खासदार संदिपान भुमरे व इतर नेत्यांची बैठक पार पडली आणि त्यात अध्यक्षपदासाठी आमदार विलास भुमरे व उपाध्यक्ष पदासाठी रामूकाका शेळके यांचे नाव वरिष्ठ नेत्यांकडे पाठवण्याचे ठरले.
त्यानुसार सोमवारी सकाळी ११ वाजता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचे निवडीसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र दोन्ही पदासाठी प्रत्येकी एक- एक अर्ज आल्यामुळे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर करण्यात आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.