Ambadas Danve News Sarkarnama
छत्रपती संभाजीनगर

Ambadas Danve News: '' किराडपुरातील राड्यामागं भाजप अन् एमआयएम..''; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप

Kiradpura Dangal : जनतेच्या मनात विष पेरण्याचा प्रयत्न सुरु...

सरकारनामा ब्यूरो

Chhatrapati SambhajiNagar News : छत्रपती संभाजीनगरच्या किराडपुरा भागात रामनवमीच्या आदल्या दिवशी दोन गटांत बाचाबाची झाली. त्याचं रुपांतर तुफान राड्यामध्ये झालं. यानंतर हाणामारी, दगडफेकीसह पोलिसांच्या आणि खासगी मिळून अशा एकूण 13 गाड्या जाळण्यात आल्याची धक्कादायक घटनाही समोर आली आहे. यावरुन तणाव निर्माण झाला असतानाच आता राजकीय वातावरण देखील तापण्यास सुरुवात झाली आहे.

ठाकरे गटाचे आमदार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी गुरुवारी (दि.३०) सकाळी शहरातील दंगलग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी भाजप आणि एमआयएमवर गंभीर आरोप केले आहेत.

दानवे म्हणाले, छत्रपती संभाजीनगर शहरातील किराडपुरा परिसरात काल रात्री झालेला राडा कुणी घडवला, हे शोधून काढायला हवं. शहरातल्या लोकांच्या मनात विष पेरण्यासाठी भाजप आणि एमआयएम जबाबदार आहे. शहरात त्यांना दंगल पाहिजे, मतांसाठी हे राजकारण सुरु आहे असा खळबळजनक दावा केला आहे.

दानवे म्हणाले, शहराच्या नामांतरानंतर एमआयएमसारखी संघटना मुस्लिमांच्या बाजूने १०-१० दिवस आंदोलन करते. पोलीस अधिकाऱ्यांवर हात उचलण्याची हिंमत कशी होते. मात्र, या घटनेमागे एमआयएम आणि भाजप आहे. त्यांना शहरात दंगल पाहिजे. त्यांचा जनाधार कमी होतोय. म्हणून मुस्लिम समाजाला उचकवणं, सुजाण जनता निमूटपणे बघतेय. मात्र, या लोकांवर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे अशी मागणीही दानवे यांनी केली.

जनतेच्या मनात विष पेरण्याचा प्रयत्न सुरु...

गेल्या महिनाभरापासून औरंगाबाद शहराचं छत्रपती संभाजीनगर नामांतरावरून सुरु असलेल्या आंदोलनामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप त्यांनी केला. माध्यमांशी बोलताना अंबादास दानवे म्हणाले, हे का घडलं, घडवणारे कोण यामागे जाण्याची आवश्यकता आहे. मागच्या महिनाभरापासून आम्ही आवाहन करत आहोत. शहराचं वातावरण अशांत करून जनतेच्या मनात विष पेरण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोपही दानवे यांनी केला आहे.

संदीपान भुमरे काय म्हणाले?

संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनीदेखील आज सकाळी घटनास्थळाची पाहणी केली. किराडपुऱ्यात दंगल घडवणाऱ्या समाजकंटकांना थारा मिळणार नाही. यातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं. मात्र विरोधी पक्षाचे नेते विनाकारण यावरून राजकारण करत आहेत, असा आरोप भुमरे यांनी केलाय.

कायदा मोडणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई ...

पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी छत्रपती संभाजीनगर शहरातील किराडपुरा परिसराची पाहणी केली. यानंतर गुप्ता म्हणाले, किराडपुरा परिसरात काही समाजकंटकांनी राडा घातला असल्याचं समोर आलं आहे. मात्र, सध्या सर्व परिस्थिती नियंत्रणात असून, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी केलं आहे. तसेच पोलिसांकडून कायदा मोडणाऱ्या व्यक्तींविरोधात कठोर कारवाई केली जाणार असल्याचंही आयुक्त म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT