sandipan bhumare narendra modi sarkarnama
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Lok Sabha Election 2024 : मोदींसाठी काम करावेच लागेल; नाराज भाजप कार्यकर्त्यांना बजावलं

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar News: महायुतीमध्ये संभाजीनगरची जागा शिवसेना शिंदे गटाला सुटल्यापासून भाजपची यंत्रणा पूर्णपणे ठप्प झाली आहे. शेवटपर्यंत मतदारसंघ आपल्याकडे घेण्यासाठी भाजपने जोर लावला. परंतु, शिंदे गटाने सरशी करत संभाजीनगरची जागा खेचून घेतली.

त्यामुळे गेल्या अडीच तीन वर्षांपासून संभाजीनगरात जोमाने कामाला लागलेल्या भाजपच्या तयारीवर पाणी फिरले. याचा परिणाम प्रचारात दिसू लागताच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मोदीजींसाठी काम करावेच लागेल, अशा शब्दांत सुनावत कोणत्याही परिस्थितीत महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे निवडून आले पाहिजेत, असे बजावले आहे.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड ( Bhagwat Karad ) उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज आहेत. त्यांच्या नाराजीचा फटका संदीपान भुमरे ( Sandipan Bhumare ) यांना बसू नये, याची काळजी आता राज्यस्तरावरूनच घेतली जात आहे. त्यामुळेच कराड यांना संभाजीनगर मतदारसंघापासून दूर ठेवत समन्वयाची जबाबदारी फडणवीस यांचे विश्वासू गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सावे यांचे वडील दिवंगत मोरेश्वर सावे यांनी संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचे दोन वेळा प्रतिनिधित्व केलेले आहे. या निवडणुकीत मुलगा म्हणून अतुल सावे यांचे मोठे योगदान प्रचार यंत्रणा राबवण्यात होते. वडील शिवसेनेत आणि मुलगा भाजपमध्ये अशी परिस्थिती असतानाही युती असल्यामुळे सावे स्वतंत्रपणे वडिलांची प्रचार यंत्रणा सांभाळत होते.

मोरेश्वर सावे हे मशाल चिन्हावर निवडून येणारे संभाजीनगरचे पहिले खासदार होते. अपक्ष म्हणून विजयी झाल्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. आता निरीक्षक म्हणून अतुल सावे पुन्हा एकदा महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांच्या प्रचाराची जबाबदारी स्वीकारणार आहेत.

भाजपमधील अंतर्गत नाराजी ओळखून युतीधर्म पाळत प्रत्येकाला कामाला लावण्याचे मोठे 'शिवधनुष्य' सावे यांना पेलावे लागणार आहे. दरम्यान, महायुतीत कुठलेही मतभेद किंवा नाराजी नाही आम्ही सगळे मिळून एकत्र प्रयत्न करू आणि संदीपान भुमरे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणू, असा विश्वास सावे यांनी समन्वयकपदाची जबाबदारी घेतल्यानंतर व्यक्त केला.

आजपासून भाजपकडून प्रचाराचा धडाका सुरू होणार आहे. एका विधानसभा मतदारसंघात 50 कॉर्नर बैठका असे नियोजन करण्यात आले आहे. संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात तब्बल 300 कॉर्नर बैठका घेण्यात येणार असल्याचे भाजप शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी सांगितले आहे.

( Edited By : Akshay Sabale )

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT