उड्डाणपुलांचे जाळे, खांबांवरून आणि जमिनीखालून वाट काढणारी मेट्रो, सीनएजीवर धावणाऱ्या बस, जागतिक दर्जाच्या सोयी-सुविधा असणारे स्टेडियम, विमानतळ, मोठमोठे हॉस्पिटल, वीज वितरणात मोठ्या सुधारणा...! दिल्लीत हे जे चित्र दिसतं, ते ना भाजपच्या सरकारांनी निर्माण केलं आहे, ना आम आदमी पक्षाच्या सरकारने. कुणी केला असेल हा विकास? होय, बरोबर ओळखलात, शीला दीक्षित! काँग्रेसच्या दिग्गज नेत्या आणि 1998 ते 2013 पर्यंत सलग 15 वर्षं मुख्यमंत्री राहिलेल्या शीला दीक्षित यांनी दिल्लीचा कायापालट केला. त्यामुळंच त्यांना दिल्लीच्या विकासाच्या शिल्पकार असं म्हटलं जातं.
काँग्रेसच्या नेत्या, दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी दिल्लीचा जसा विकास केला, आता भाजपनं तसा विकास करून दाखवावा, असं विधान काँग्रेसचे उत्तर प्रदेश प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी केलं आहे. नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला दणदणीत विजय मिळाला आणि अरविंद केजरीवाल यांच्या सत्ताधारी आपला पायउतार व्हावं लागलं. आता दिल्लीत आणि केंद्रातही भाजपचं सरकार आहे. त्यामुळं अजय राय यांनी शीला दीक्षित यांनी केलेल्या विकासकामांचा हवाला देत भाजपला एकप्रकारे आव्हानचं दिलं आहे.
शीला दीक्षित दिल्लीच्या सर्वाधिक काळ मुख्यमंत्री होत्या. त्यांनी 15 वर्षं मुख्यमंत्रिपद भूषवलं. या काळात त्यांनी दिल्लीचा चेहरामोहरा बदलला. दिल्लीत मेट्रो सेवा त्यांच्याच काळात सुरू झाली. त्यांनी 70 उड्डाणपुलांची उभारणी केली. अनियमित वसाहतींना त्यांनी कायद्याच्या चौकटीत बसवून घेतलं. असा वसाहतींत पाणीपुरवठा आणि ड्रेनेजची कामं मोठ्या प्रमाणात केली. आज जी विकसित, सुंदर दिल्ली दिसते, ती शीला दीक्षित यांनी केलेल्या कामांमुळंच.
शीला दीक्षित यांचा जन्म 31 मार्च 1938 रोजी पंजाबमधील कपूरथळा शहरात हिंदू खत्री कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचं नाय संजय कपूर. नंतर ते कुटुबीयांसह दिल्लीत आले. नवी दिल्लीतील कन्व्हेंट ऑफ जीझस अँड मेरी स्कूलमधून त्यांचं शालेय शिक्षण झालं. दिल्ली विद्यापीठातून त्यांनी इतिहास विषयात एमए केलं. स्वातंत्र्यसैनिक तथा पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल उमाशंकर दीक्षित यांचे पुत्र विनोद दीक्षित यांच्यासोबात त्यांचा विवाह झाला. विनोद दीक्षित हे आयएएस अधिकारी होते. संदीप दीक्षित आणि लतिका दीक्षित ही त्यांची अपत्ये. संदीप दीक्षित हे माजी खासदार आहेत.
नोकरी करणाऱ्या महिलांची सोय व्हावी, यासाठी शीला दीक्षित यांनी 1970 च्या सुरुवातीला दिल्लीत दोन वसतीगृहांच्या उभारणीत महत्वाची भूमिका बजावली होती. त्या कापड निर्यात संघाच्या सचिवही होत्या. 1984 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं त्यांना उत्तर प्रदेशातील कन्नौज मतदारसंघातून उमेदवारी दिली. त्यांनी लोकदलचे छोटेलाल यादव यांचा मोठ्या मताधिक्यानं पराभव केला. खासदार झाल्यानंतरच शीला दीक्षित यांनी त्यांच्या विकासाच्या दूरदृष्टीचा प्रत्यय दिला होता.
मतदारसंघातील हरदोईला कन्नौजशी जोडण्यासाठी त्यांनी गंगा नदीवर पुलाची उभारणी केली. दूरदर्शन प्रक्षेपण केंद्रालाही मंजुरी मिळवून घेतली होती. टेलिफोन एक्सेंज स्वयंचलित करवून घेतलं. पक्षी विहार, रुग्णालयांची उभारणी आदी लोकोपयोगी कामं त्यांनी खासदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये केली. राजीव गांधी पंतप्रधान बनल्यानंतर शीला दीक्षित यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली. संसदीय कामकाज राज्यमंत्री आणि नंतर पंतप्रधान कार्यलयात राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली.
1989 च्या लोकसभा निवडणुकीत मात्र शीला दीक्षित यांना पराभवाचा सामाना करावा लागला. छोटेलाल यादव यांनी त्यांचा पराभव केला. उत्तरप्रदेशात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात 1990 मध्ये आंदोलन करण्यात आलं होतं. शीला दीक्षित यांना त्या आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं. त्यामुळं राज्य सरकारनं त्यांना अटक केली. त्यानंतर शीला दिक्षित आणि त्यांच्या अनेक सहकाऱ्यांना 23 दिवस कारागृहात काढावे लागले होते. 1998 मध्ये त्यांची दिल्ली काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
त्याचवर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पूर्व दिल्ली मतदारसंघातून पराभव झाला. त्यामुळं त्या अडचणीत सापडल्या होत्या. मात्र त्याचवर्षी त्यांचं नशीब बदलणार होतं, त्यांच्या राजकीय कारकीर्दीचा महत्त्वाचा टप्पा येणार होता. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केलं. गोल मार्केट विधानसभा मतदारसंघातून त्यांनी भाजपचे कीर्ति आझाद यांचा पराभव केला. त्या निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळाल. मदनलाल खुराणा यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला पायउतार व्हावं लागलं होतं.
दिल्लीत काँग्रेसची सत्ता आली आणि 1998 मध्ये शीला दीक्षित मुख्यमंत्री बनल्या. त्यानंतर त्या 2013 पर्यंत सलग 15 वर्षं दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदावर राहिल्या. त्या तीनवेळा मुख्यमंत्री बनल्या. या कालावधीत त्यांनी विकासकामांद्वारे आपली छाप पाडली होती. या 15 वर्षांत त्यांनी दिल्लीचा अक्षरशः कायापालट करून दाखवला. कुशल राजकीय नेत्या असलेल्या शीला दीक्षित यांनी राजधानीच्या प्रशासनावर उत्क़ृष्ट पकड ठेवली होती. दिल्लीकरांचं जीवनमान उंचावण्यासाठी त्यांनी सातत्यानं प्रयत्न केले.
दिल्लीला जागतिक शहर अशी ओळख मिळवून देण्याचं स्वप्न शीला दीक्षित यांनी पाहिलं होतं. स्वप्न पाहून त्या थांबल्या नाहीत, त्यांनी त्या दिशेनं सातत्यानं प्रयत्न केले आणि त्यांना य़शही मिळालं. त्या मुख्यमंत्री असताना काही काळ केंद्रात विरोधकांची म्हणजे भाजपप्रणित एनडीएची सत्ता होती. तरीही त्यांनी विकासकामांत आडकाठी येऊ दिली नाही. उपराज्यपालांच्या सहकार्यांनं त्यांनी अनेक कामं पूर्ण करून घेतली. दिल्लीत मेट्रो सुरू झाली त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी केंद्र सरकारशी व्यवस्थित समन्वय राखून हे काम पूर्णत्वाला नेलं होतं. त्यामुळेच दिल्ली आज एक जागतिक दर्जाचं महानगर बनलं आहे.
भारतातर्फे 2010 मध्ये दिल्लीत राष्ट्रकुल स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. देशात अशी स्पर्धा होण्याची ही पहिलीत वेळ होती. या स्पर्धेच्या निमित्तानं शीला दीक्षित यांचं कौशल्य जगासमोर आलं. नियोजित वेळेत त्यांनी अनेक कामं पूर्ण केली होती. त्या कुशल प्रशासकच नव्हे, तर कुशल व्यवस्थापकही होत्या, हे या स्पर्धांच्या आयोजनातून दिसून आलं होतं. या स्पर्धेत भारतीय खेळडूंनी 38 सुवर्ण, 27 रौप्य आणि 36 कांस्यपदकं पटकावली होती. यशस्वी आयोजनामुळं खेळांच्या नाकाशावर दिल्लीचं स्थान जगभरात उंचावलं होतं.
दिल्लीत वाहतुकीची समस्या बिकट झाली होती. त्यावर उपाय म्हणून शीला दीक्षित यांनी उड्डाणपुलांचं जाळं विणलं. बस रॅपिड ट्रांझिट कॉरिडॉरसारखे प्रयोग केले. सिग्नेचर ब्रीजची संकल्पनाही त्यांचीच. त्यांनी दिल्लीत 70 उड्डाणपूल बांधले. यापैकी 22 उड्डाणपुलांची उभारणी राष्ट्रकुल स्पर्धेदरम्यान करण्यात आली. ज्या उड्डाणपुलांवर वाहतुकीची कोंडी व्हायची, तेथील सिग्नल बंद करण्यात आले. त्यामुळे दिल्लीच्या विविध भागांतील नागरिकांची वाहतुकीच्या कोंडीतून सुटका झाली.
दिल्लीत 2007 मध्ये ब्ल्यू लाइन बससेवा सुरू करण्यात आली होती, मात्र या बसच्या अपघातांचे प्रमाण वाढले होते. त्यामुळं या सेवेला किलर लाइन असं नाव पडलं होतं. त्याचवेळी 2010 मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेच्या निमित्तानं वातानुकूलित बसही रस्त्यावर आल्या. त्यावेळी अशा साडेसहा हजार बसची खरेदी करण्यात आली होती. दिल्लीत विजेचं संकटही निर्माण झालं होतं. त्यामुळं 2002 मध्ये खासगीकरणाचा निर्णय घेण्यात आला. वीज वितरणाचा ठेका खासगी कंपन्यांना देण्यात आला. 895 अनधिकृत वसाहतींना नियमित करण्यात आलं. या वसाहतींत सर्व नागरी सुविधा पुरवण्यात आल्या.
दिल्लीच्या सौंदर्यीकरणासाठी शीला दीक्षित यांनी विविध उपाययोजना केल्या. बगीचे, पार्क आणि हरित क्षेत्रांचा विस्तार करण्यात आला. जुन्या दिल्लीला नवं रूप देण्यात आलं. त्यांच्या मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ दिल्लीच्या सामाजिक आणि पर्यावरणीय विकासासाठी मैलाचा दगड ठरला. नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध करून त्यांचं जगणं सुकर करण्यात शीला दीक्षित यांनी महत्वाची भूमिका निभावली.
शीला दीक्षित यांच्या कौशल्याचा एका किस्सा रंजक आहे. 1998 च्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू होता. दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री, भाजपच्या नेत्या सुषमा स्वराज आणि शीला दीक्षित यांची एके ठिकाणी डीबेट आय़ोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना सुषमा स्वराज म्हणाल्या होत्या, मी रात्रभर लोकांसाठी जागी राहिन, प्रत्येक पोलिस ठाण्याला भेट देऊन पोलिस जागे आहेत की नाहीत हे पाहिन. याद्वारे दिल्लीकरांच्या सुरक्षेची काळजी मी घेईन.
दिल्लीचे पोलिस हे दिल्ली सरकारच्या अखत्यारित नाहीत. ते केंद्राच्या अखत्यारित असतात. सुषमा स्वराज यांना उत्तर देताना शीला दीक्षित यांनी हा मुद्दा उचलला. सुषमा स्वराज यांना उत्तर देताना त्या म्हणाल्या होत्या, दिल्लीचे पोलिस दिल्ली सरकारच्या नव्हे तर केंद्र सरकारच्या अधीन असतात, मग विनाकारण जागरण करून झोपमोड का करता? शीला दीक्षित यांच्या उत्तराला उपस्थितांनी दाद दिली होती. त्या निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळालं आणि दिल्लीच्या दुसऱ्या महिला मुख्यमंत्री बनण्याचा मान शीला दीक्षित यांना मिळाला होता.
महाविद्यालयात असतानाच त्यांची आणि विनोद दीक्षित यांची ओळख झाली. या ओळखीचं प्रेमात रुपांतर झालं. विनोद दीक्षित हे आयएएस (IAS) झाले. त्यानंतर शीला दीक्षित आणि विनोद दीक्षित यांचा 11 जुलै 1962 रोजी विवाह झाला. त्यांचे सासरे उमाशकंर दीक्षित हे स्वातंत्र्यसैनिक आणि काँग्रेसचे नेते होते. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू या विवाह सोहळ्याला उपस्थित राहू शकले नव्हते. त्यामुळं उमाशकंर दीक्षित यांनी नवदांपत्यांला पंडित नेहरू यांच्याकडं नेलं होतं. तेथे पंडित नेहरूंनी त्यांना आशीर्वाद दिला होता. स्वागत समारंभाला इंदिरा गांधी यांनी हजेरी लावली होती.
राजकारणात पाऊल ठेवल्यानंतर कन्नोजमधून लोकसभेची निवडणूक लढवत त्यांनी मोठी कामगिरी केली. 1967 ते 1984 पर्यंत या मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवार एकदाच विजयी झाला होता. शीला दीक्षित यांनी 1984 मध्ये या मतदारसंघातून विजय मिळवला. बाहेरच्या उमेदवार असूनही लोकांनी त्यांना स्वीकारलं होतं. पुढं दिल्ली काँग्रेसची जबाबदारी आली आणि शीला दीक्षित यांनी दिल्लीतून भाजपचा सफाया केला होता.
1998 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शीला दीक्षित यांच्यावर दिल्ली प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून त्यांनी सूक्ष्म नियोजन केलं होतं. त्या दर आठवड्याला बैठक घेऊन भाजप सरकारच्या विरोधात मुद्दे मांडू लागल्या. त्यामुळे सरकारची कोंडी व्हायची. काँग्रेसच्या विजयाचं बीजारोपण शीला दीक्षित यांनी अशा पद्धतीनं केलं होतं.
मुख्यमंत्री बनल्यानंतर शीला दीक्षित (Sheela Dixit) यांनी विरोधकांशी अत्यंत सौहार्दाचे संबंध ठेवले होते. त्यामुळं विकासकामांत विरोधकांनी आडकाठी न आणता सरकारला मदतच केली, 24 डिसेंबर 2002 रोजी मेट्रोचं उद्घाटन झालं. या सोहळ्यासा पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, गृहमंत्री लालकृष्ण अडवानी, नगरविकास मंत्री अनंत कुमार आदी एकाच व्यासपीठावर उपस्थित होते.
2013 च्या निवडणुकीत मात्र चित्र बदललं ते अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनामुळं. दिल्लीत विविध विकासकामं करूनही काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. आम आदमी पक्षाचं सरकार स्थापन झालं. अरविंद केजरीवाल यांनी शीला दीक्षित यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. मात्र सत्तेत आल्यानंतर त्यांना एकही आरोप सिद्ध करता आला नाही. 2014 मध्ये शीला दीक्षित यांना केरळचे राज्यपाल बनवण्यात आलं. दिल्ली विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून त्यांना 10 जानेवारी 2019 मध्ये काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद देण्यात आलं होतं. वयाच्या 81 व्या वर्षी 20 जुलै 2019 रोजी शीला दीक्षित यांचं हृदयविकारानं निधन झालं.
दिल्लीच्या विकासाची चर्चा शीला दीक्षित यांचं नाव घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही, म्हणूनच अजय राय म्हणतात, केंद्रात आणि दिल्लीतही आता भाजपची सत्ता आहे, त्यांनी शीला दीक्षित यांनी केला तसा विकास करून दाखवावा. अजय राय यांनी भाजपला हे एकप्रकारे आव्हानच दिलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.