नशिबाने भरभरून दिल्यानंतर माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते (Subodh Mohite) यांचा नशिबानेच घात केला. त्यावेळी विमान चुकले नसते तर आज त्यांचा काँग्रेसच्या बड्या नेत्यांच्या यादीत समावेश असता. मात्र, आता त्यांच्यावर या पक्षातून त्या पक्षात उड्या मारून आपल्या राजकीय अस्तित्वासाठी धडपड करण्याची वेळ ओढावली आहे.
सुबोध मोहिते राज्य सरकारचे अधिकारी होते. राज्यात 1995 मध्ये शिवसेना-भाजप युतीच्या सरकारमधील तत्कालीन अर्थमंत्री महादेवराव शिवणकर यांचे ते स्वीय सहायक होते. या दरम्यान त्यांचा राजकारणाशी प्रत्यक्ष संबंध आला. त्यावेळी शिवणकरांचे भाजपच्या नेत्यांसोबत खटकले होते. ते बंड करण्याच्या तयारीत होते. मात्र, मोहिते यांच्या टीपमुळे हे बंड फसल्याचे बोलले जाते. या घडामोडींनंतर मोहिते यांनी सरकारी नोकरी सोडली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सांगण्यावरून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेऊन ते रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या (Ramtek Lok Sabha Constituency News)आखाड्यात उतरले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
शिवसेना-भाजप युती आणि काही काँग्रेस नेत्यांच्या बंडखोरीमुळे मोहिते पहिल्याच प्रयत्नात खासदार झाले. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यासोबत त्यांची खास सलगी झाली होती. याचा फायदा त्यांना असा झाला की, बाळासाहेब ठाकरे यांनाही त्यांनी विश्वासात घेतले. त्यावेळी केंद्रातही भाजपची सत्ता होती. मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या वेळी मोहिते यांनी या संबंधांचा वापर केला. केंद्रीय अवजड उद्योगमंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. त्यांची गाडी सुसाट होती. एनटीपीसीचा ऊर्जा प्रकल्प त्यांनी रामटेक लोकसभा मतदारसंघातील मौदा येथे खेचून आणला. पंचवार्षिक योजनेत समावेश नसतानाही मोहिते यांच्या प्रयत्नांमुळे हा प्रकल्प नागपूर जिल्ह्यात आला.
मोहिते यांची धडाडी आणि राजकीय महत्त्वाकांक्षा अनेकांना खटकली होती. यातूनच शिवसेनेच्या नेत्यांसोबत त्यांचे वाद टोकाला गेले होते. त्यामुळे त्यांनी अचानक मंत्रिपद आणि खासदारकीचा राजीनामा दिला. त्यावेळी नारायण राणे यांनीसुद्धा शिवसेना सोडली होती. त्यांच्याच नेतृत्वाखाली मोहिते यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. लोकसभेच्या पोटनिवडणुकीत मात्र शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष प्रकाश जाधव यांनी त्यांना पराभूत केले. हा सर्वांसाठीच मोठा धक्का होता. त्यावेळी मोहिते यांच्या प्रचारासाठी नारायण राणे यांच्यासह काँग्रेसचे सर्वच बडे नेते रामटेकला येऊन गेले होते. ही पोटनिवडणूक त्यावेळी चांगलीच गाजली होती.
त्यानंतर रामटेक लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. त्यामुळे मोहिते यांनी रामटेक विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडे उमेदवारी मागितली. ती त्यांना देण्यातही आली होती. मात्र, शिवसेनेने त्यांच्या माथ्यावर लावलेला ‘गद्दार' हा ठपका त्यांना पुसून काढता आला नाही. काही हजार मतांच्या फरकाने त्यांचा पराभव झाला. पराभवासाठी त्यांचा अतिआत्मविश्वासही नडला. महाराष्ट्रातील युतीचे सरकार गेल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने सरकार स्थापन केले. विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. मोहिते शांत बसणाऱ्यांपैकी नव्हते. राजकीय पुनर्वसनासाठी ते धडपडत होते.
विधान परिषदेच्या रिक्त जागेच्या माध्यमातून मोहिते यांना पुन्हा संधी चालून आली. विधान परिषदेची उमेदवारी भरण्याचा तो शेवटचा दिवस होता. आदल्या दिवशी मोहिते मुंबईतच ठाण मांडून बसले होते. मात्र, उमेदवारी मिळणे अवघड असल्याचा निरोप त्यांना देण्यात आला होता. त्यामुळे ते रात्रीच्या विमानाने नागपूरला परतले. सकाळी मात्र त्यांना तुमची उमेदवारी निश्चित झाल्याचा निरोप देण्यात आला. ताबडतोब मुंबईला बोलावण्यात आले. दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ होती. त्यावेळी नागपूर ते मुंबई थेट विमान उपलब्ध नव्हते. त्यामुळे मोहिते यांनी पुण्याला विमानाने जाण्याचा निर्णय घेतला. तेथून टॅक्सीने तीनच्या आत पोहोचण्याचे नियोजन त्यांनी केले होते. मात्र, त्यांचे दुर्दैव आड आले. त्यावेळी तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील पुण्यात होत्या. त्यांना दिल्लीला परत जायचे होते. त्यावेळी सुरक्षेच्या कारणावरून कुठलेच विमान पुण्याच्या विमानतळावर उतरू देण्यात आले नाही. मोहिते यांचे विमान आकाशातच घिरट्या घालत राहिले. पुणे विमानतळावर त्यांचे विमान उतरले तेव्हा उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ निघून गेली होती. तेव्हापासून मोहिते यांचे रुसलेले नशीब अद्याप फळफळले नाही.
काँग्रेसच्या काही बड्या नेत्यांनी त्यावेळी त्यांचा 'गेम' केला होता, अशी चर्चा आजही आहे. राष्ट्रपतींचे विमान रोखण्यात कोणाचा हात होता, हे अद्याप उघड झाले नाही. मोहिते यांच्यासह अद्याप कोणीही यावर भाष्य केलेले नाही. या घटनेने मोहिते यांचा भ्रमनिरास झाला. नंतर त्यांनी काँग्रेस सोडली. राष्ट्रवादी कॉंग्रेस, विनायक मेटे यांचा शिवसंग्राम, शिवसेना नंतर पुन्हा काँग्रेस असा प्रवास त्यांचा आजही सुरू आहे. सध्या ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. कधी वर्धा लोकसभा तर कधी काटोल विधानसभा मतदारसंघात ते लढणार आहेत, असे त्यांचे समर्थक सांगतात. मात्र, अद्याप त्यांनी कोणतीही निवडणूक लढवलेली नाहीत. अद्यापही त्यांचे तळ्यात-मळ्यात सुरूच आहे.
सुबोध मोहिते कुठून लढणार, हे आजतरी कुणालाच सांगता येत नाही. अनेक वर्षांचे अंतर पडल्यामुळे त्यांच्याकडे कार्यकर्ते व समर्थकसुद्धा शिल्लक राहिलेले नाहीत. राजकीय कार्यक्रमांनाही ते फारशी हजेरी लावत नाहीत. मध्यंतरी नागपूरमध्ये शरद पवार यांच्यासोबत ते झळकले होते. अजित पवार बाहेर पडल्यानंतर एक -दोन कार्यक्रमांचा अपवाद वगळता ते कोणालाही फारसे दिसले नाहीत. निष्क्रियतेमुळे आता तर त्यांचे नावही संभाव्य उमेदवार म्हणून कुणी घेत नाही. जितक्या झपाट्याने त्यांचा राजकीय आलेख उंचावला होता, त्यापेक्षा दुप्पट वेगाने तो खाली आला आहे. आता सुबोध मोहिते यांचे नशीब केव्हा फळफळते, याबाबत उत्सुकता आहे.
सुबोध मोहिते यांनी नागपूर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदारसंघातून 2004 मध्ये निवडणूक लढवली होती. या दरम्यान ते एक वर्ष केंद्रीय अवजड उद्योग मंत्री होते. शिवसेनेच्या नेत्यांसोबत बिनसल्याने 2007 मध्ये त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. ते काँग्रेसमध्ये सहभागी झाले होते. 2007 मध्ये रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख प्रकाश जाधव यांनी त्यांचा पराभव केला. मात्र, यानंतर मतदारसंघाच्या पुनर्रचनेत रामटेक लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. त्यानंतर मोहिते यांनी 2009 रामटेक विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. ते काँग्रेसचे उमेदवार होते. त्यावेळी शिवसेनेचे आशिष जयस्वाल यांनी मोहिते यांचा पराभव केला. मोहिते यांना 46,576 तर आशिष जयस्वाल यांना 49,937 मते मिळाली होती. विशेष म्हणजे याच निवडणुकीत गोंडवाना गणतंत्र पार्टीचे उमेदवार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी तब्बल 34,304 मते घेऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. ते नंतर भाजपमध्ये गेले.
सलग दोन पराभवांमुळे हिरमोड झालेले मोहिते राजकारणापासून अलिप्त राहिले. कालांतराने अमरावती जिल्ह्यातील मोर्शी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. यासाठी त्यांनी विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षात प्रवेश केला. मध्यंतरी शेकापमध्येही ते जाऊन आले. मात्र, त्यांना दोन्ही पक्षांकडून उमेदवारी मिळाली नाही. ते पुन्हा काँग्रेसमध्ये परतले. पक्षाने त्यांना प्रदेश प्रवक्ते केले. यानंतर ते सक्रिय होतील, अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र प्रवक्ते असताना कधीच त्यांनी पक्षाची बाजू मांडली नाही आणि माध्यमांसमोरही आले नाहीत.
काँग्रेसमधील भाऊगर्दी आणि उमेदवारी मिळण्याची शक्यता दिसत नसल्याने त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना गाठले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या दरम्यान त्यांनी वर्धा लोकसभा मतदारसंघाची चाचपणी सुरू केली. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार 40 आमदार घेऊन बाहेर पडले, तेव्हा मोहिते त्यांच्यासोबत गेले. सध्या ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. अजित पवार महायुतीत सहभागी झाले आहेत. वर्धा लोकसभा मतदारसंघात भाजपचे रामदास तडस खासदार आहेत. ते दोन वेळा निवडून आले आहेत. हे पाहता भाजप आपला मतदारसंघ अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसाठी सोडण्याची शक्यता फारच धूसर आहे. त्यामुळे सुबोध मोहिते यांची पुन्हा अडचण होणार असल्याचे दिसून येते.
मूळचे काटोल जिल्ह्यातील असलेले मोहिते काटोल-नरखेड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागू शकतात. हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या आमदार आहेत. ते शरद पवार यांच्यासोबत आहेत. या मतदारसंघावर अजित पवार यांची राष्ट्रवादी दावा करू शकते. मात्र, भाजप यासाठी सहजासहजी तयार होईल, असे दिसत नाही. याशिवाय मोहिते येथे सक्रियसुद्धा नाहीत.
Edited by: Mangesh Mahale
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.