Kisanarao Bankhele Sarkarnama
ब्लॉग

Kisanarao Bankhele : केवढा साधा आमदार ना? बायको चक्क मजुरी करायची!

Kisanarao Bankhele Political Journey Sarkarnama Podcast : प्रामाणिक आणि सर्वसामान्यांचा नेते अशी किसनराव बाणखेले अण्णा यांची ओळख होती. एखादा नेता लोकसभा आणि विधानसभेत पायात स्लीपर घालून जायचा, हे आजच्या पिढीला पटणारच नाही, पण हे सत्य आहे.

Sachin Waghmare

Sarkarnama Podcast : घरखर्च भागवण्यासाठी एखाद्या आमदाराची पत्नी गोधड्या शिवते, मजुरांसोबत दुष्काळी कामावार जाते..! हे ऐकून धक्का बसला ना? आताचे आमदार पाहिले तर या गोष्टींवर कोणाचाही विश्वास बसणार नाही, हे खरे आहे. मात्र तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल. किसनराव बाणखेले अण्णा, नाव ऐकले नसेल तर आता इथून पुढे नक्की ऐकाच.

एखादा नेता लोकसभा आणि विधानसभेत पायात स्लीपर घालून जायचा, हे आजच्या पिढीला पटणारच नाही, पण हे सत्य आहे. डोक्यावर कडक टोपी. पांढरा शर्ट, धोतर, गळ्यात माळ आणि पायात स्लीपर... त्यांनी चांगली चप्पल किंवा बूट वापरावा, असे लोकांना वाटायचं, पण ते म्हणायचे, 'हे स्लीपरच चांगलं, कुठं हरवत नाही आणि कुठेही मिळतं.

पायात स्लीपर घालूनच ते विधानसभा आणि लोकसभेतही जायचे. प्रामाणिक आणि सर्वसामान्यांचा नेता अशी ओळख निर्माण केलेल्या या नेत्याला सर्व निवडणुका लढवण्यासाठी लोकांनी वर्गणी करून रक्कम दिली होती. असे उदाहरण विरळाच.

जुन्या काळात राजकारणाकडे पाहण्याचा नेत्यांचा दृष्टीकोण वेगळा होता, म्हणजे आजच्यासारखा नव्हता. नेत्यांमध्ये लोकांप्रति समर्पणाचा, सेवेचा भाव होता. किसनराव बाणखेले अण्णा हे अशाच पठडीतले नेते होते. प्रामाणिकपणाच्या बळावर अण्णांनी ट्रक क्लीनर, ड्रायव्हर ते आमदार, खासदार असा प्रवास केला. (Kisanarao Bankhele News)

प्रामाणिक आणि सर्वसामान्यांचा नेता, अशी त्यांची ओळख होती. खेड लोकसभा मतदारसंघात त्यांची एखादेवेळी लग्नाला हजेरी चुकायची, मात्र रक्षाविसर्जन आणि दशक्रिया विधीला ते आवर्जून उपस्थित राहायचे. 'सुखात सगळे जातात पण माणसाला दुःखात आधाराची गरज असते.' असं ते नेहमीच म्हणायचे. त्यांच्यावर दशपिंडी खासदार, अशी टीका केली जायची, मात्र टीकाकारांना महत्व न देता ते लोकांच्या दुःखात कायम सहभागी होत राहिले.

सुरुवातीच्या काळात किसनराव बाणखेले (Kisanarao Bankhele) अण्णा यांनी ट्रकवर क्लीनर, नंतर ड्रायव्हर म्हणून काम केलं. हा माणूस पुढे चालून एक दिवस आमदार, खासदार होईल, असं कोणालाही वाटत नव्हतं. मंचर या आपल्या छोट्याशा गावातून त्यांच्या राजकारणाची सुरवात झाली. ते मंचरचे सरपंच झाले आणि त्यानंतर मागं वळून पाहिलंच नाही.

सामान्य माणसाशी त्यांची नाळ घट्ट जोडलेली होती. ती त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत कायम ठेवली. अण्णा जरी कायम कोणत्याही एका पक्षात राहिले नसले तरी राजकारणाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात, राजकारणाच्या शैलीत त्यांनी कधीही फरक पडू दिला नाही. वयाच्या 25 व्या वर्षी 1962 मध्ये ते जिल्हा परिषदेचे सदस्य बनले.

1989 च्या लोकसभा निवडणुकीत खेड मतदारसंघात त्यांनी जनता दलाकडून निवडणूक लढवली. त्यावेळी काँग्रेसचे (Congress) प्रा. रामकृष्ण मोरे यांचा त्यांनी पराभव केला. किसनरावांचे शिक्षण मॅट्रिकपर्यंतचे झालं होतं. सर्वसामान्यांमध्ये मिळून मिसळून राजगुरुनगर, आंबेगाव परिसरात त्यांनी स्वतःचं अढळ स्थान निर्माण केलं होतं.

1970 मध्ये अण्णा मंचरचे सरपंच झाले. त्यानंतर 1972 मध्ये अण्णांनी विधानसभेची निवडणूक जिंकली. निवडणूक लढवण्यासाठी सध्या पाण्यासारखा पैसा खर्च करावा लागतो. अण्णांचा काळ वेगळा होता. त्यांनी लढवलेल्या सर्वच निवडणुकांत लोकांनी वर्गणी करून त्यांना पेसे दिले. 1980 आणि 1985 ची विधानसभा निवडणूकही त्यांनी जिंकली.

जनता दलाच्या तिकीटावर 1989 मध्ये त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरून इतिहास घडवला. बोफोर्ससारख्या प्रकरणांमुळं काँग्रेसचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांची लोकप्रियता ओसरत असताना ही निवडणूक झाली. राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडून विश्वनाथ प्रताप सिंग यांनी उत्तरेकडील राज्यांत झंझावात निर्माण केला होता. त्याचा प्रभाव महाराष्ट्रात नव्हता. अशा स्थितीत अण्णांनी खेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराला पराभूत करून दिल्ली गाठली होती.

काँग्रेसचे दिग्गज नेते रामकृष्ण मोरे (Ramkrishn More) यांचा त्यांनी पराभव केला होता. लोकांनीच ती निवडणूक हातात घेतली होती. त्यांच्या कामाची पावती लोकांनी दिली होती. खेड लोकसभा मतदारसंघात त्यावेळी 'धोतर गेलं दिल्लीला' अशी एकच चर्चा होती.

अण्णा कायम विरोधी पक्षात असायचे. त्यामुळं त्यांना विकासकामं करताना अनेकदा आंदोलनं करावी लागली. रस्त्यावर उतरून त्यांनी लोकांचे अनेक प्रश्न मार्गी लावले. बँकेला मंजुरी मिळावी म्हणून त्यांनी उपोषण केलं. उपोषण केल्यावर त्यांना बँकेची मंजुरी मिळाली. त्यांचे राजकीय गुरू माजी खासदार संभाजीराव काकडे यांच्या नावाने सुरू असलेली बँक आजही प्रगतीपथावर आहे.

बाणखेले आण्णांच्या आठवणी आजही काहीजण सांगतात. ते 1972 मध्ये आंबेगावचे आमदार झाले. त्याअगोदर ते जिल्हा परिषद सदस्य आणि सरपंच होते. 1972 च्या दुष्काळात लोकांवर उपासमारीची वेळ आली. लोकांना काम मिळावं म्हणून त्यांनी दुष्काळी कामं सुरू केली होती. या कामावर गरजू लोकांसोबत आमदार बाणखेले यांचे कुटुंबीयही काम करायचे.

अण्णा आमदार असताना त्यांच्या पत्नी मथुराबाई मजुरीनं कामावर जायच्या, मात्र त्यात कोणाला विशेष असं काही वाटायचं नाही. आमदार झाल्यानंतरही अण्णांनी कधीही रुबाब दाखवला नाही. जसे अण्णा वेगळे वाटत नव्हते, तशा त्यांच्या पत्नी कामावर आहेत, यातही लोकांना आश्चर्य वाटत नव्हतं. मथुराबाई काम करत असताना अण्णा एकदा कामावर भेट द्यायला आले. त्यांनी पत्नीकडं पाहिलं, मात्र काहीही बोलले नाहीत.

थोडा वेळ थांबले. मस्टर कारकूनजवळ चौकशी केली आणि निघून गेले. असं साधं राहणीमान त्यांनी शेवटर्यंत जपलं. घरखर्च चालवायला त्यांच्या पत्नी गोधड्या शिवू लागल्या. ते आमदार होते. त्यांना जो पगार मिळत होता, तो त्यांनी कधीच घरी दिला नाही. त्या पैशांतून ते समाजकार्य करत राहिले.

खासदार, आमदार झाले तरी बाणखेले अण्णा घरी यायचे नाहीत. त्यामुळे ते राहायचे कुठे? असा प्रश्न आपल्याला पडला असेल. त्यांच्या मुक्कामाची गोष्ट थक्क करणारी आहे. मुंबईवरून उशिरा पुण्याला आलेले आमदार बाणखेले हे पुण्यात शिवाजीनगरच्या बसस्थानकावर धोतर पांघरून निवांत झोपलेले अनेक वाहकांनी पाहिलं आहे.

सकाळी वाहक, चालक त्यांना उठवायचे. चूळ भरायला पाणी द्यायचे. तिथंच चहा पिऊन अण्णा पुढच्या प्रवासाला जायचे. मंचरचं बसस्थानक तर त्यांचं कार्यालय असल्यासारखं होतं. उशिरा आल्यावर तिथंच त्यांचा मुक्काम असायचा. पिशवी उशाला घेऊन अण्णा झोपलेले असायचे. तिथं असलेल्या धर्मादाय रुग्णालयात बसून ते नागरिकांच्या भेटीगाठी घेत. त्यांचे प्रश्न लगेच सोडवत. त्यामुळं ते लोकप्रिय होत गेले.

अण्णा आंबेगाव मतदारसंघाचा दौरा सायकलवरून करायचे. त्यांचा मुक्काम कार्यकर्त्यांच्या घरी असायचा. बाजरीची भाकरी व चटणी खायला मिळाली तरी ते खूश राहत. खिशात एक छोटी वही. त्यात ते लोकांच्या अडचणी लिहून घ्यायचे. पायी, सायकल, स्कूटर, एसटी बस अशा मिळेल त्या वाहनानं ते प्रवास करायचे.

त्यांनी प्रपंच कधीच केला नाही. नेहमीच लोकांच्या अडचणीत ते धावून जायचे. ते राजकारणातील कर्मयोगी होते. ते एका कुटुंबाचे नव्हे, तर संपूर्ण मतदारसंघाचे कुटुंबप्रमुख होते. त्यांच्याकडे लोक सामाजिक कामे घेऊन यायचे. काही लोक पैसेही मागायला यायचे, पण अण्णांकडे पैसे नसायचे.

खासदार असताना अण्णा एकदा पाबळ परिसरात होते. पावसात भिजत रस्त्याने निघाले होते. पाठीमागून एसटी बस आली. त्यांनी बसला हात केला, पण चालक नवीन होता. त्याने गाडी थांबवली नाही. तोवर एका प्रवाशाने खासदारांना पाहिलं आणि बसची बेल ओढली.

बेल वाजल्याचं लक्षात आल्यावर वाहकानं मागं बघून विचारलं, "कोणी बेल ओढली?" प्रवासी म्हणाला, अहो अण्णा गाडीला हात करत हुते. त्यावर वाहकाचा प्रश्न, कोण अण्णा? हा संवाद चालू होता तोवर दार उघडून अण्णा आत आले. "आरं पोरांनु, मला पावसात भिजत ठेवता का?" असं ते म्हणाले, अगदी हसत हसत... गाडी न थांबवल्याचा त्यांना अजिबात राग आला नव्हता.

मुंबईतील आमदार निवासातील त्यांच्या खोलीत नेहमीच कार्यकर्त्याची गर्दी असे. खोलीचं दार उघडलं की आत बरेच लोक झोपलेले दिसायचे. जागा मिळेल तिथं लोक झोपलेले. कधी कधी त्यांनाच झोपण्यासाठी जागा राहत नस. ते कधी चिडले नाहीत.

धोतर अंथरून ते खाली झोपायचे. किसनराव खासदार होते, तेव्हा त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी सुद्धा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारी महाराष्ट्रातील 35 मुलं राहत होती. तिथही अण्णांची गैरसोय व्हायची, पण त्यांची तक्रार नसायची. आपण लोकांच्यामुळं इथंपर्यंत आलोय. हे लोकांचं आहे, हे असं ते नेहमीच म्हणायचे. आॅगस्ट 2014 मध्ये अण्णांचं निधन झालं आणि राजकारणातील एका पर्वाचा अस्त झाला.

SCROLL FOR NEXT