Killari Earthquake Thirty Years  Sarkarnama
ब्लॉग

Killari Earthquake Thirty Years : समस्या पाठ सोडत नव्हत्या; मदतकार्यात धो धो पावसाचा अडथळा; 'किल्लारी'ची 30 वर्षे...

Chetan Zadpe

Latur : किल्लारी - सास्तूर (जि. लातूर) परिसरात ता. ३० सप्टेंबर १९९३ रोजी महाप्रलयंकारी भूकंप झाला. राज्य सरकार तातडीने कामाला लागलं होतं. खुद्द मुख्यमंत्री शरद पवार हे अवघ्या काही तासांत मुंबईहून भूकंपस्थळी पोचले होते. सर्व सूत्रे हाती घेऊन प्रसंगी मातीच्या ढिगाऱ्यावर बसून, त्यांनी यंत्रणा कामाला लावली आणि अवघ्या काही दिवसांतच भूकंपग्रस्तांच्या नवीन घरांच्या बांधकामाचं भूमिपूजन केलं. प्रतिकूल परिस्थितीत झालेल्या त्या मदत व पुनर्वसन कामाची जगाने नोंद घेतली. (Latest Marathi News)

किल्लारी परिसरातील जवळपास ४० ते ५० गावे भूकंपामुळे उद्ध्वस्त झाली होती. किती जीवितहानी झाली आहे. याचा कुणालाही थांगपत्ता लागत नव्हता. संकटे थांबण्याचे नाव घेत नव्हती. भूकंपामुळे झालेले माती दगडाचे ढिगारे आणि त्यात धो धो कोसळणारा पाऊस यामुळे दुसऱ्या दिवशी परिस्थिती खूप बिकट झाली होती. किती गावांवर हे संकट आलेले आहे, किती लोक अडकले असतील, याचा अंदाज कोणीही लावू शकत नव्हतं.

जवळपास ४० ते ५० गावे उद्ध्वस्त झाली होती. परिस्थिती पाहून मुख्यमंत्री शरद पवार यांनी लष्कराला पाचारण केलं. संध्याकाळपर्यंत लष्कराची शेकडो वाहने किल्लारी परिसरात दाखल झाली होती. उमरगा-लातूर मार्गावरील बिरुदेव मंदिरासमोरील जागेवर लष्कराने तात्पुरत्या छावण्या उभारल्या होत्या. लष्कराचे जवान मदत कार्यासाठी गावोगावी पोचले होते. पुढील तीन ते चार दिवसांत मृतदेह काढण्याचं काम सुरू होतं. लष्कराच्या शिबिरात पेट्रोल पंपापासून हेलिपॅडपर्यंत सर्व सुविधा उभारण्यात आल्या होत्या.

राज्यमंत्र्यांचं रेल्वेतच हृदयविकाराने निधन -

अंत्यसंस्कारासाठी लाकडांचा तुटवडा भासू लागला होता. नागपूर आणि चंद्रपूर येथून लाकडं मागवण्यात आली. समस्या पाठ सोडायचे नाव घेत नव्हत्या. भूकंपाची माहिती मिळाल्यानंतर उमरग्याकडे निघालेले उमरग्याचे आमदार, राज्यमंत्री अब्दुल खालिकमियाँ काझी यांचं रेल्वेत हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. संबंध देशभरातून मदतीसाठी लोकं येत होते. या गर्दीमुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. वाहतूक नियोजनासाठी मुंबईतून पोलिसांना बोलावण्यात आले होते.

मोठंमोठे अधिकारी ओट्यावर, बैलगाडीत झोपायचे -

लष्कराने उभारलेल्या छावण्यांमध्ये सुरुवातीचे तीन दिवस भूकंपातून वाचलेल्या लोकांना काढावे लागले. तिसऱ्या दिवशी पाऊस बंद झाला. मुख्यमंत्री शरद पवार यांनी राज्याचे मुख्य सचिव ए. रघुनाथन यांच्यासह २० ते २५ उच्चस्तरीय अधिकाऱ्यांवर नियोजन सोपवलं होतं. उमरगा येथील शासकीय विश्रामगृहातून सूत्रं हलत होती. येथून मंत्रालय हॉट लाइनने जोडण्यात आलं होतं. उमरगा शहराला पोलिस छावणीचं स्वरूप आलं होतं. जिल्हाधिकाऱ्यांसारखे अधिकारीही ओटे किंवा मिळेल त्या मोकळ्या जागेत, एखाद्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत, बैलगाडीत रात्र काढत असत. परिस्थिती पूर्वपदावर आली पाहिजे, हाच सर्वांचा ध्यास होता.

शरद पवारांचे धीराचे शब्द -

सगळं काही गमावलेल्या लोकांना मानसिक आधार देण्याचे काम मुख्यमंत्री शरद पवार हे त्यांच्याशी बोलून करायचे. दररोज गावागावांत फिरून लोकांशी ते आपुलकीने संवाद साधायचे. त्यांचं दुःख वाटून घेतलं, एवढ्या मोठ्या दुःखातून लोकांना बाहेर पडण्यासाठी मदत केली. एखाद्या गावात गेल्यानंतर पवार हे मिळेल त्या जागेवर बसायचे. बांधावर बसून लोकांशी संवाद साधायचे. ‘तुम्ही घाबरू नका, मी तुमच्या सोबत आहे, जोपर्यंत तुमच्या घरांचं भूमिपूजन होणार नाही, तोपर्यंत मी येथून जाणार नाही.

सर्व गावकऱ्यांनी विचारविनिमय करून पुनर्वसनासाठी जमीन द्यावी, बाजार भावाप्रमाणे त्या जमिनीला मोबदला देऊ. येत्या दिवाळीपर्यंत तुम्हाला नवीन घरं देण्याचा प्रयत्न करत आहे. दुःख हे सगळीकडं आहे. तुमच्या घरामधील व्यक्ती गेली, म्हणजे संबंध महाराष्ट्राला असे वाटत आहे की आमच्याच घरामधील व्यक्ती गेली. तुम्ही घाबरू नका. महाराष्ट्रातील इतर कामं मी बाजूला ठेवेन, परंतु आधी तुमच्या गावांचं पुनर्वसन करून घेईन,’ अशा शब्दांत ते भूकंपातून वाचलेल्या लोकांना धीर द्यायचे.

पत्रकार परिषदेत लोकप्रतिनिधींना धरले धारेवर -

मुख्य सचिव ए. रघुनाथन हे उमरगा येथे राहायचे. दिवसभर स्वतः गावोगावी फिरत होते आणि पीडितांची विचारपूस करत होते. लहानात लहान, गरीब, श्रीमंत कोणीही असो त्यांना मदत करा, अशा सूचना ते अधिकाऱ्यांना द्यायचे. पत्रकारांना बातम्या पाठविण्यासाठी टेलिकॉम विभागातर्फे मोफत फॅक्स सेवा देण्यात आलेली होती. त्यावेळी उमरगा येथे नगरपालिकेसमोर सहाव्या किंवा सातव्या दिवशी पत्रकार परिषद घेण्यात आली. लोकसभेचे अध्यक्ष शिवराज पाटील चाकूरकर, राज्याचे पाटबंधारे मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी पत्रकार परिषदेला उपस्थित होते. त्यावेळी पत्रकारांनी प्रश्न विचारून लोकप्रतिनिधींना चांगलेच धारेवर धरले होते.

भूकंपानंतर अवघ्या २४ व्या दिवशी घरांचं भूमिपूजन -

भूकंपानंतर २४ व्या दिवशी पाच गावांतील घरांच्या बांधकामाचं भूमिपूजन करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री शरद पवार हे गावकऱ्यांना आपल्या भाषणांमधून काही सूचना द्यायचे. ‘भूकंप झाल्यामुळे सुविधा मिळाल्या, आता आपल्याला काम करायची गरज नाही, असे समजू नका. आपल्याला काम करावेच लागेल. प्रत्येकास घर मिळेल. दोन भाऊ असतील, तर दोघांना दोन घरे मिळतील. गावात ग्रामपंचायत, सेवा संस्थेचे कार्यालय, मंदिर, समाज मंदिर, शाळेची उभारणी आम्ही करणार आहोत,’ असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. भूमिपूजन कार्यक्रमासाठी राज्यपाल पी. सी. अलेक्झांडरही आले होते. मुख्यमंत्री पवारांनी भूकंपग्रस्तांसाठी केलेल्या कामाचं त्यांनीही कौतुक केलं.

गावचं गावपण हरवलं -

आज भूकंप होऊन तीन दशकं पूर्ण होत आहेत. त्यावेळी आजच्यासारखी काहीही यंत्रणा नसताना एवढं मोठं काम पूर्ण झालं, हासुद्धा एक इतिहासच म्हणावा लागेल. आज सर्व भूकंपग्रस्तांना घरे मिळालेली आहेत. सर्वजण दुःख विसरून जगत आहेत. जाणकार म्हणतात, की भूकंप झाला, राहण्यासाठी टुमदार घरे मिळाली, परंतु गावांचे गावपण हरवले. असे असले तरी त्यावेळी झालेलं काम मोठं होतं, ऐतिहासिक होतं.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT