Raj Thackeray-Uddhav Thackeray
Raj Thackeray-Uddhav Thackeray Sarkarnama
ब्लॉग

खरा हिंदू जननायक कोण, याचा निकाल उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतर लागणार..

सरकारनामा ब्यूरो

राज्याच्या राजकारणात सध्या एक शब्द प्रचलित झाला आहे. तो म्हणजे हिंदू जननायक! (Hindu Jannayak) मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांना ही उपाधी त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिली. मनसेने आपला हिंदुत्वाचा मुद्दा घेतल्याचे लक्षात आल्यानंतर शिवसेनाही आता आपला हिंदुत्वाचा बाणा दाखविण्यासाठी सज्ज झाली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे सुद्धा हिंदुत्वाची पालखी वाहणारे आहेत, असे शिवसेनेकडून सांगितले जाऊ लागले आहे. एवढेच नाहीतर सेना नेत्यांनी उद्धव ठाकरे यांनाही हिंदू जननायक पदवी दिली आहे. ही पदवी देणारे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी या शब्दावर कोणाची मालकी नसल्याचे सांगत या पदवीवरून सेना आणि मनसेत संघर्ष होणार असल्याचे अप्रत्यक्षरित्या सांगितले आहे. आता खरा हिंदू जननायक कोण, याचा फैसला उद्धव ठाकरे यांच्याच मुंबईतील 14 मे रोजी होणाऱ्या सभेनंतर होण्याची शक्यता आहे.

दादागिरी मोडून कशी काढायची हे देखील आम्हाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी शिकवलेले आहे... असा इशारा मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेची कोंडी करणार्या भाजप आणि मनसेला देत उद्याची सभा ठाकरेंच्या टोकदार वकृत्वाने विरोधकांना घायाळ करणारी ठरणार असल्याचे संकेत दिले आहेत

एकदाचा काय तो सोक्षमोक्ष लावूनच टाकूया... १४ मे च्या सभेत मास्क काढून बोलणार असल्याची वक्तव्य करत उध्दव ठाकरेंनी या सभेविषयीची उत्सुकता यापुर्वीच वाढवली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या या सभेनंतर दुसर्‍याच दिवशी १५ मे रोजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार असून ते या सभेतून ठाकरेंना उत्तर देतील.

शनिवारी बीकेसी येथील एमएमआरडीए मैदानावर आयोजित शिवसेनेच्या मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भाजप आणि मनसे यांनी केलेल्या आरोपांना काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने प्रथमच एमएमआरडीए मैदानावर भव्य राजकीय सभा आयोजित केली आहे. गेल्या दोन वर्षात कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची कोणतीही जाहीर राजकीय सभा झाली नव्हती, हे विशेष.

मशिदींवरील भोंगे उतरवण्यावरून राज्य सरकारला अल्टीमेटम देत कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार्‍या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यात गेले महिनाभर तणावाचे वातावरण निर्माण केले. राज ठाकरेंनी शिवसेनेतून बाहेर पडून मनसेची स्थापना केल्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे सार्वजनिक व्यासपीठावर एकमेकांना टाळून वक्तव्य करत असंत. मात्र महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे विराजमान झाल्यानंतर राज ठाकरेंनी उद्वव यांना कोंडीत पकड्याची एकही संधी सोडली नाही. भोंगे, हनुमान चालिसावरुन शिवसेनेच्या हिंदुत्वाला राज ठाकरेंनी आव्हान दिले. त्यातच चारच दिवसांपूर्वी मनसेच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांच्या सुरू असलेल्या कारवायांवरून राज ठाकरेंनी 'सत्ता येत - जात असते. कोणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उध्दव ठाकरे तुम्हीही नाही...' अशा शब्दात मुख्यमंत्र्यांना फटकारले होते. याचा समाचार उद्धव थेटपणे घेण्याची शक्यता आहे. शिवाय फडणवीस यांनी १ मे च्या सभेत उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला उद्देशून' तुम्ही म्हणजे मराठी माणूस नाही, तुम्ही म्हणजे मुंबई नाही' असे बोलून शिवसेनेला डिवचले आहे. फडणवीस यांचाही यानिमित्ताने समाचार उद्धव ठाकरे घेतील अशी शक्यता आहे.

शिवसेनेने हिंदुत्व सोडल्याचा आरोप भाजप, मनसेसोबत अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती, बडनेऱ्याचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी २३ एप्रिल रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ बंगल्यावर जाऊन हनुमान चालिसाचे जाहीर पठण करणार असल्याची घोषणा केली होती. परंतु शहरातील कायद्या सुव्यवस्था बिघडवल्याच्या कारणावरून राणा दांपत्याला अटक करण्यात आली होती. १४ दिवसांच्या कोठडीनंतर ६ मे रोजी राणा दांपत्याला कोर्टाकडून जामीन मिळाला. मात्र या दरम्यानच्या काळात ठाकरे यांची मानहानी करणारी वक्तव्य राणा दांम्पत्याकडून वारंवार करण्यात आली. याविषयी यापूर्वी उध्दव ठाकरे काही बोलले नसले तरी उद्याच्या सभेत या घटनेचा ते उल्लेख करण्याची शक्यता आहे. शिवसेना नेते, राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे या सभेच्या आयोजनाची जबाबदारी देण्यात आली आहे. एमएमआरडीए मैदानात दीड लाख लोक बसू शकतात, एवढी क्षमता आहे. शिवाय शिवसेनेने मुंबई शहर आणि परिसरातील शिवसैनिकांना या सभेला येण्याचे आवाहन केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT