Rahul Gandhi and Amarinder Singh  (File Photo)
ताज्या बातम्या

सिद्धूंच्या राजीनाम्याने अडचणीत आलेल्या काँग्रेसवर कॅप्टन टाकणार डाव?

पंजाबमध्ये नवज्योतसिंग सिद्धू यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप झाला आहे. याचा फायदा माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग घेण्याची शक्यता आहे.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : पंजाब (Punjab) काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनी पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर पक्षात एकच खळबळ उडाली आहे. सिध्दूंपाठोपाठ एका कॅबिनेट मंत्र्यांसह चार पदाधिकाऱ्यांनीही त्यांच्या समर्थनार्थ राजीनामे दिले आहेत. यामुळे माजी मुख्यमंत्री (Chief Minister) अमरिंदरसिंग (Amarinder Singh) यांच्या कमबॅकची चर्चा सुरू झाली आहे.

सिध्दू यांच्या राजीनाम्यानंतर प्रदेश सरचिटणीस योगिंदर धिंग्रा यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्याआधी कॅबिनेट मंत्री रजिया सुलताना, खजिनदार गुलजार इंदर चहल व प्रशिक्षण विभागाचे सरचिटणीस गौतम सेठ यांनीही पदाचा राजीनामा दिला आहे. सिध्दू यांच्या समर्थनार्थ या नेत्यांनी राजीनामे दिल्यानं काँग्रेसची डोकेदुखी वाढत चालली आहे. सिध्दू यांना पाठिंबा देण्यासाठी आणखी काही नेते राजीनामे देऊ शकतात, अशी चर्चा आहे.

कॅप्टन अमरिंदरसिंग हे कालच (ता.28) दिल्लीत दाखल झाले आहेत. सिद्धूंच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस अडचणीत आली आहे. सिद्धूंच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमध्ये राजीनामासत्र सुरू झाले आहे. यातच आता कॅप्टन समर्थक आमदार बहुमत सिद्ध करण्याची मागणी करू लागले आहेत. त्यांनी दिल्लीत असलेल्या कॅप्टन यांच्याकडे यासाठी आग्रह धरण्यास सुरवात केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

नवखा मुख्यमंत्री आणि सिद्धूंचा राजीनामा यामुळे काँग्रेस राज्यात दिशाहीन बनली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी काँग्रेस अनुभव, मुरब्बी राजकारण्याची आवश्यकता आहे. काँग्रेसची सध्याची स्थिती पाहता कॅप्टनच नेतृत्व करण्यास योग्य राहतील, असे एका गटाचे मानणे आहे. सरकारचे बहुमत सिद्ध करायचे झाल्यास ते वाचवण्यासाठी कॅप्टन यांच्याशिवाय सध्या तरी पर्याय नाही, असे या गटाचे नेते म्हणत आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अमरिंदरसिंग यांनी मनातील खदखद व्यक्त करीत भविष्यात वेगळा निर्णय घेण्याचे संकेत दिले होते. अमरिंदरसिंग म्हणाले होते की, पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केल्यानंतर मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकारे आमदारांची बैठक बोलावून माझा अपमान करण्याची ही तिसरी वेळ आहे. ते त्यांच्या विश्वासातील व्यक्तीला आता मुख्यमंत्री नेमू शकतात. काँग्रेस अध्यक्षा जो निर्णय घेतील तो चांगला असेल. मी सध्या तरी काँग्रेससोबत आहे. मी समर्थकांशी चर्चा करुन भविष्यातील निर्णय घेईन.

अमरिंदरसिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर चरणजितसिंग चन्नी यांनी नुकतीच पंजाब मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हेही या शपथविधीला उपस्थित होते. त्यांनी चन्नी यांची निवड करत दोन गटांमध्ये विभागलेल्या पंजाब काँग्रेसमधील मतभेदांवर जालीम उपाय केल्याचे बोलले जात आहे. परंतु शपथविधीला अमरिंदरसिंग यांची दांडी मारली होती. त्यामुळे पंजाब काँग्रेसमधील मतभेद चव्हाट्यावर आले होते. यामुळे अमरिंदरसिंग हे काँग्रेस सोडतील, अशी चर्चा सुरू झाली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT