Amit Shah and Amarinder Singh
Amit Shah and Amarinder Singh  File Photo
ताज्या बातम्या

अमरिंदरसिंग आज भाजपमध्ये? अमित शहांची दिल्लीत घेणार भेट

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : पंजाबमध्ये (Punjab) मुख्यमंत्री (Chief Minister) अमरिंदरसिंग यांना हटवून त्यांच्या जागी चरणजितसिंग चन्नी (Charanjit Singh Channi) यांना आणण्यात आले आहे. आता अमरिंदरसिंग हे काँग्रेसला धक्का देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे. आज ते दिल्लीत भाजपचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर आज सायंकाळीच त्यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरिंदरसिंग आज दुपारी अमृतसरहून दिल्लीला रवाना होणार आहेत. दिल्लीत ते भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. यानंतर अमरिंदरसिंग यांच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम होईल. दरम्यान, अमरिंदरसिंग यांनी पक्षात प्रवेशास नकार दिल्यास भाजप त्यांना नवा पक्ष सुरू करण्यास मदत करू शकतो. काँग्रेसला रोखण्यासाठी अमरिंदरसिंगांचा वापर करुन घेण्याची भाजपची रणनीती आहे.

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अमरिंदरसिंग यांनी मनातील खदखद व्यक्त करीत भविष्यात वेगळा निर्णय घेण्याचे संकेत दिले होते. अमरिंदरसिंग म्हणाले होते की, पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केल्यानंतर मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकारे आमदारांची बैठक बोलावून माझा अपमान करण्याची ही तिसरी वेळ आहे. ते त्यांच्या विश्वासातील व्यक्तीला आता मुख्यमंत्री नेमू शकतात. काँग्रेस अध्यक्षा जो निर्णय घेतील तो चांगला असेल. मी सध्या तरी काँग्रेससोबत आहे. मी समर्थकांशी चर्चा करुन भविष्यातील निर्णय घेईन.

चरणजितसिंग चन्नी यांनी नुकतीच पंजाब मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हेही या शपथविधीला उपस्थित होते. त्यांनी चन्नी यांची निवड करत दोन गटांमध्ये विभागलेल्या पंजाब काँग्रेसमधील मतभेदांवर जालीम उपाय केल्याचे बोलले जात आहे. परंतु शपथविधीला अमरिंदरसिंग यांची दांडी मारली होती. त्यामुळे पंजाब काँग्रेसमधील मतभेद चव्हाट्यावर आले होते. यामुळे अमरिंदरसिंग हे काँग्रेस सोडतील, अशी चर्चा सुरू झाली होती.

पंजाब काँग्रेसमध्ये प्रदीर्घ काळ वाद सुरू होता. अमरिंदरससिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात संघर्ष सुरू होता. यामुळे पक्ष दोन गटांत विभागला गेला. सिद्धू हे प्रदेशाध्यक्ष झाल्याने अमरिंदरसिंग यांना शह बसण्यास सुरवात झाली. यातून त्यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्याच्या दिशेने पावले टाकण्यास सुरवात झाली, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT