नवी दिल्ली : राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात ओळख असलेले दोन तरुण चेहरे आज काँग्रेसमध्ये दाखल होत आहेत. यात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा (CPI) नेता व जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार (Kanhaiya Kumar) तसेच, गुजरातमधील अपक्ष आमदार जिग्नेश मेवानी (Jignesh Mevani) यांचा समावेश आहे. दरम्यान, कन्हैयाने सीपीआय सोडण्याआधी पक्षाच्या कार्यालयात लावलेला एअर कंडिशनर (AC) काढून नेला आहे.
कन्हैया आज काँग्रेसवासी होत असला तरी त्याने सीपीआयच्या कार्यालयातील एसी काढून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. सीपीआयचे बिहार चिटणीस राम नरेश पांडे यांनी याबाबत माहिती दिली आहे. पांडे म्हणाले की, काही दिवसांपूर्वी कन्हैया हा पक्षाच्या राज्य कार्यालयात आला होता. त्याने कार्यालयात लावलेला एसी काढून नेला. त्याने स्वत:च्या पैशातून तो एसी लावलेला होता, त्यामुळे मी त्याला मंजुरी दिली.
कन्हैया हा काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय मागे घेईल, अशी आशा मला वाटत आहे. कन्हैयाची मानसिकता ही कम्युनिस्ट असून, अशा व्यक्ती आपल्या विचारसरणीबाबत कठोर असतात. त्यामुळे कन्हैया काँग्रेसमध्ये प्रवेश करणार नाही असे मला वाटते, असेही पांडे यांनी स्पष्ट केले.
महात्मा गांधी जयंतीदिनी कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवानी हे काँग्रेसमध्ये दाखल होणार होते. परंतु, हा पक्षप्रवेशाचा मुहूर्त अलिकडे आणण्यात आला आहे. हे दोघेही आज हुतात्मा भगतसिंग यांच्या जयंतीदिवशी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. दोघांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आज दुपारी होणार आहे. या दोघांच्या रुपाने राष्ट्रीय राजकारणात अतिशय आक्रमक आणि लोकप्रिय असलेले दोन तरुण चेहरे काँग्रेसला मिळणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
देशातील लोकप्रिय तरुण नेता कन्हैया
कन्हैया कुमार याने 2019 मध्ये भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री गिरीराजसिंह यांच्याविरोधात बिहारमधील बेगुसराई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. पण या निवडणुकीत कन्हैयाचा पराभव झाला होता. मागील तीन दशकांपासून बिहारमधील काँग्रेसच्या विधानसभेच्या जागा सातत्याने कमी होत आहेत. मागील निवडणुकीत काँग्रेसला निवडणूक लढवलेल्या 70 पैकी केवळ 19 जागा मिळाल्या.
कन्हैया व राहुल गांधी यांची आधी दोनदा भेट झाली आहे. काँग्रेसमध्ये येण्याबाबत वाटाघाटी सुरू असून त्या अंतिम टप्प्यात आहेत, असे बिहारमधील काँग्रेसच्या एका नेत्यानं काही दिवसांपूर्वीच सांगितलं होतं. कन्हैया कुमार हा मूळचा बिहारचा असल्यानं या राज्यात त्याच्यामागे कार्यकर्त्यांची फौज आहे. तसेच, काँग्रेसमध्ये येता डाव्या पक्षांती काही नेतेही त्याच्यासोबत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.