Chitra Wagh and Kishori Pednekar
Chitra Wagh and Kishori Pednekar File Photo
ताज्या बातम्या

खोटं रडून दाखवणाऱ्या भाजपच्या ताई आज गप्प का?

सरकारनामा ब्युरो

मुंबई : भाजप (BJP) नगरसेविकेच्या कार्यालयात महिलेचा विनयभंग (Molestation) झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भाजप कार्यकर्त्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. यावर आता शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत भाजपला लक्ष्य केले आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी या प्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांना थेट सवाल केला आहे.

याबाबत बोलताना पेडणेकर म्हणाल्या की, या प्रकरणी भाजपच्या महिला आता गप्प का आहेत. दिव्याखालीच अंधार आहे. भाजपकडून नेहमीच महाराष्ट्राला बदमान करण्याचा प्रयत्न असतो. भाजपशासित राज्यात महिलांवर अत्याचाराच्या घटना खूप घडत आहेत. भाजपच्या ताई खोटे रडून दाखवता. आता ताईगिरी कुठे गेली? फोन बंद का? मी स्वत: बोरिवलीच्या प्रकरणात लक्ष घालणार आहे.

महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम भाजपकडून होत आहे. भाजपच्या ताई पब्लिक स्टंटसाठी पुढे येतात पण आता गप्प बसणार. महिलांच्या विषयावर धाय मोकलून रडणाऱ्या भाजपच्या ताईंचा फोन सकाळपासूनच बंद आहे, त्यांच्या पक्षातील कुणीच याबाबत बोलण्यास तयार नाही. कोणत्याही पक्षाची महिला असो, अन्याय होत असेल तर भूमिका घ्यायला हवी. मी असते तर थोबाड फोडले असते, असाही टोला पेडणेकर यांनी लगावला.

भाजपा नगरसेविका अंजली खेडेकर यांच्या कार्यालयात हा प्रकार घडला आहे. भाजप कार्यकर्त्याने महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही महिला समाजसेविका आहे. विनयभंगाची तक्रार आमदार आणि खासदार यांच्याकडे केली म्हणून नगरसेविका आणि सहकाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोपही संबंधित महिलेने केला आहे. या विरोधात महिनाभरापूर्वी तक्रार करूनही गुन्हा दाखल झाला नव्हता. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडे दाद मागितल्यावर बोरीवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पीडित महिला मागील वर्षी नगरसेविका खेडेकर यांच्या संपर्क कार्यालयात आली होती. तिथे तिची प्रतिक साळवी याच्याशी भेट झाली. त्यांनी एकमेकांचे मोबाईल क्रमांक घेतले होते. साळवीने या महिलेला 14 ऑगस्टला सायंकाळी साडेसहाच्या सुमारास खेडेकर यांच्या वझिरा नाका येथील कार्यालयात बोलवले . ती महिला कार्यालयात आल्यानंतर त्याने तिचा विनयभंग केला. याची तक्रार तिने स्थानिक खासदार आणि आमदार यांच्याकडे केली होती.

यानंतर नगरसेविका खेडेकर यांनी त्या महिलेला फोन करून कार्यालयात बोलावून घेतले. तक्रार का केली? अशी विचारणा त्यांना तिला केली. साळवीने केलेला प्रकार त्या महिलेने खेडेकर आणि तिथे उपस्थित असलेल्यांना सांगितला. त्यावेळी तिला मारहाण करीत ऑफिस बाहेर हाकण्यात आले, असा आरोपही पीडित महिलेने केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT