Sharad Pawar, Uddhav Thackeray, Mallikarjun Kharge News Sarkarnama
देश

Opposition Meet : विरोधक भाजपची डोकेदुखी वाढवणार; संयुक्त उमेदवारावर रणनीती ठरणार? शरद पवार, उद्धव ठाकरेंची हजेरी

Amol Jaybhaye

Opposition Parties Meet In Patna : पाटणामध्ये शुक्रवारी विरोधी पक्षाची बैठक होणार आहे. भाजपविरोधी महाआघाडीच्या बैठकीमध्ये जातनिहाय जनगणना आणि उमेदवार या दोन प्रमुख मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. या बैठकीमध्ये किमान समान कार्यक्रम जाहीर केला जाऊ शकतो. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांचा अजेंडा तयार करण्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे दिली जाऊ शकते. शुक्रवारी होणाऱ्या बैठकीला शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) उपस्थित राहणार आहेत.

भाजपाच्या (BJP) राजकारणावर मात करायची असेल तर राज्या-राज्यात जातीनिहाय जनगणनेचा आग्रह धरला पाहिजे, हा विचार बहुतांश विरोधी पक्षांनी मांडला आहे. बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या सरकारने जातिनिहाय जनगणना केली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने हा अहवाल प्रसिद्ध करण्यास मनाई केली. माकप आणि भाकप या डाव्या पक्षांनीदेखील जातिनिहाय जनगणनेची मागणी केली होती. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंनी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून जातिनिहाय जनगणनेची मागणी केली आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी विरोधकांच्या एकजुटीसाठी पुढाकार घेतला आहे. त्यांनी अनेक राज्यांमध्ये जाऊन नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. त्यांनी सुचवलेल्या एकास एक उमेदवार या जागा वाटपच्या सूत्राबाबत अनेक पक्षांमध्ये मतभेद आहेत. लोकसभा निवडणुकीत प्रत्येक राज्यामध्ये भाजपविरोधात विरोधी पक्षांनी एकच उमेदवार दिल्यास मतविभागणी टळेल, असा दावा नितीशकुमार यांनी केला आहे. हे सूत्र काँग्रेसने (Congress) मान्य केले तरच ते वास्तवात येण्याची शक्याता आहे.

हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, जम्मू-काश्मीर, पंजाब, महाराष्ट्र, दिल्ली, पश्चिम बंगाल, आसामसह ईशान्येकडील राज्ये अशा अनेक राज्यांमध्ये काँग्रेसला माघार घ्यावी लागेल. आम आदमी पक्ष, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष छोटे प्रादेशिक पक्षांसोबत तडजोड कराव लागेल. मात्र, काँग्रेस प्रादेशिक पक्षांसाठी त्याग करण्यास किती तयार होईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच या बैठकीमध्ये आधी केंद्र सरकारने काढलेल्या अध्यादेशावर चर्चा व्हावी, अशी मागणी दिल्लीचे मुख्ममंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना-ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत पाटण्याला जाणार आहे. तसेच मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी (Rahul Gandhi), के. सी. वेणुगोपाल, जयराम रमेश तसेच तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी, द्रमुकचे प्रमुख स्टॅलिन, राष्ट्रीय जनता दलाचे नेते व बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, 'आप' चे प्रमुख अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, फारुक अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती, माकप चे महासचिव सीताराम येचुरी, भाकपचे महासचिव डी. राजा असे 18 हून अधिक विरोधी पक्षांचे प्रमुख व नेते उपस्थित राहणार असल्याचे तेजस्वी यादव यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT