New Delhi : लोकसभेत दारुण पराभव झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीआधी मोठा निर्णय घेतला. राज्यातील महिलांसाठ लाडकी बहीण योजन सुरू करत दरमहा 1500 रुपये देण्यास सुरूवात केली. त्याचा बंपर फायदा सरकारला झाला आणि निवडणुकीत महायुतीचा ऐतिहासिक विजय झाला. दिल्लीत अरविंद केजरीवाल यांनीही शिंदेंच्या पावलावर पाऊल टाकले आहे.
दिल्लीत जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात विधानसभेची निवडणूक आहे. त्यासाठी अद्याप किमान दोन महिन्यांचा कालावधी असतानाच आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक व दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राज्यात महिला सन्मान योजना जाहीर केली आहे. मुख्यमंत्री अतिशी यांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली आहे.
केजरीवालांच्या घोषणेनुसार, राज्यातील महिलांना दरमहा एक हजार रुपये दिले जाणार आहेत. तर निवडणुकीनंतर ही रक्कम 2100 रुपये केली जाणार आहे. या योजनेसाठी लगेचच नोंदणीची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. आपचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन महिलांची नोंदणी करून घेणार असल्याचे केजरीवालांनी स्पष्ट केले आहे.
दिल्लीतील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महिला सन्मान योजनेवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. ही योजना म्हणजे केजरीवालांचा मास्टरस्ट्रोक समजले जात आहे. कारण महाराष्ट्रात शिंदे सरकारने लाडकी बहीण योजना आणल्यानंतर त्याला मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्याचे पडसाद विधानसभेच्या निवडणुकीतही दिसले. लाडकी बहीण योजनेमुळेच बहुमत मिळाल्याचा दावा नेत्यांनी केला होता.
केजरीवालांनाही आता दिल्लीत ‘लाडकी बहीण’ तारणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे. भाजपने आप सरकारला भ्रष्टाचार, प्रदुषण, आरोग्य समस्या आदी मुद्यांवरून चांगलेच घेरले आहे. प्रामुख्याने मद्य धोरण घोटाळाप्रकरणात केजरीवालांसह पक्षाचे तीन नेते जेलमधून गेले होते. त्यानंतर केजरीवालांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामाही द्यावा लागला. त्यावरूनही भाजपने रान उठवले आहे. यातून बाहेर पडण्यासाठी महिला सन्मान योजना त्यांच्यासाठी संजीवनी ठरणार का, याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.