Manish Sisodia, Atishi Sarkarnama
देश

Atishi Oath Ceremony : त्या जिंकल्या...आता इतिहास घडवणार! सिसोदियांचे ते शब्द 21 तारखेला खरे ठरणार

Rajanand More

New Delhi : दिल्लीतील 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी आतिशी यांच्या आडनावावरून जातीचा मुद्दा भाजपने उपस्थित केला होता. त्यावेळी आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया प्रत्युत्तर देताना म्हणाले होते, सावध राहा, त्या जिंकतील आणि इतिहास घडवतील..! सिसोदिया यांचे हे शब्द 21 सप्टेंबरला खरे ठरणार आहेत.

दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून आतिशी या 21 सप्टेंबरला शपथ घेणार आहेत. आपमधील काही नेतेही त्यांच्यासोबत मंत्रिपदाची शपथ घेतील. दिल्लीच्या त्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री ठरतील. जेलमधून बाहेर आल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर पक्षाने आतिशी यांच्या खांद्यावर ही जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यात पुढील वर्षी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात विधानसभेची निवडणूक होऊ शकते. तोपर्यंत आतिशी मुख्यमंत्री असतील. त्यामुळे त्या सुषमा स्वराज यांचाही रेकॉर्ड मोडून शीला दीक्षित यांच्यानंतर सर्वाधिक काळ महिला मुख्यमंत्री म्हणून आतिशी यांचे नाव इतिहासात कोरले जाईल.

काय झालं होतं 2019 मध्ये?

कार्ल मार्क्स आणि लेनिन यांच्या आद्याक्षरांवरून आतिशी यांना आईवडिलांनी मार्लेना हे आडनाव दिले होते. मात्र, 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी त्यांनी आडनाव काढून टाकले. त्यावेळी त्यांच्या बहिणीचे नाव रोझा बसंती होते. त्यावरून भाजपने आतिशी यांच्या जातीचा मुद्दा उपस्थित केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना मनीष सिसोदिया म्हणाले होते, आतिशी सिंह असे त्यांचे पूर्ण नाव आहे. त्या राजपूत असून पक्क्या क्षत्रिय आहेत. सावध राहा, त्या जिंकतील आणि इतिहासही घडवतील.

आतिशी यांचा लोकसभेच्या निवडणुकीत पराभव झाला. पण त्यानंतर काही महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्या विजयी झाल्या. 2023 मध्ये सिसोदियांच्या राजीनाम्यानंतर आतिशी यांना मंत्रिपद मिळाले. सध्या त्यांच्याकडे शिक्षण, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम यांसह अनेक महत्वाची खाती आहे. आता त्या २१ सप्टेंबरला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन इतिहास घडवतील.   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT