Bhagwant Mann-siddaramaiah Sarkarnama
देश

AAP Help To Congress Government कर्नाटकातील काँग्रेस सरकारच्या मदतीला धावले ‘आप’ सरकार; तांदूळ देणार, केंद्राचा असहकार

सरकारनामा ब्यूरो

Bangalore News : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने दिलेल्या पाच योजना जाहीर केल्या हेात्या. त्यातील अन्नभाग्य योजना राबविणे सिद्धरामय्या सरकारसाठी आव्हान बनले आहे. कारण, केंद्र सरकारने तांदळाचा पुरवठा करण्याबाबत असहकार दर्शविला आहे. पण, आता कर्नाटकातील काँग्रेस सरकारच्या मदतीला पंजाबचे आप सरकार धावून आले आहे. पंजाब सरकारने कर्नाटकाला तांदळाचा पुरवठा करण्याची तयारी दर्शविल आहे. (AAP government of Punjab will supply rice to the Congress government in Karnataka)

तांदळासाठी कर्नाटकातील (karnataka) काँग्रेस सरकारच्या (Congress) ‘अन्नभाग्य’ योजनेसाठी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये संघर्ष सुरु असतानाच पंजाब सरकार (Panjab) कर्नाटकला तांदूळ पुरवठा करण्यास तयार झाले आहे. आम आदमी पक्षाच्या (AAP) नेत्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्राने तसे कळविले आहे.

केंद्र सरकारने असहकार केल्यानंतरही अन्नभाग्य ही योजना राबविली जाणार असल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले. राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (एनसीसीएफ), राष्ट्रीय कृषी सहकारी पणन महासंघ (नाफेड) आणि सेंट्रल वेअरहाऊस यांच्याकडून तांदूळ मिळविण्यासाठी किंमत यादी मागविली आहे, असेही त्यांनी सांगितले.

सिद्धरामय्या म्हणाले की, ‘‘भारतीय अन्न परिषदेकडून (एफसीआय) ३४ रुपये दराने तांदूळ, २.६० रुपये वाहतूक खर्चासह प्रति किलो तांदळासाठी एकूण ३६.४० रुपये खर्च होतील. या तिन्ही संस्थांनी नमूद केलेली किंमत, पुरवठा केलेल्या प्रमाणाचा तपशील घेतला जाईल. निविदेद्वारे तांदूळ मिळविण्याबाबतही कार्यवाही करणार आहे. ‘अन्नभाग्य’ योजनेअंतर्गत १० किलो तांदूळ वितरीत करण्यासाठी दरमहा ८४० कोटी रुपये खर्च होतील. दहा हजार ९२ कोटी रुपये प्रति वर्ष खर्च करुन तांदूळ वाटप करण्याची सरकारची तयारी आहे. तांदळाचा साठा उपलब्ध असला तरी केंद्र सरकार तांदूळ देण्यास तयार नाही.’’

पंतप्रधानांना सहकार्याचे आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी वारंवार बोलत आहेत. आम्ही संघराज्य व्यवस्थेत आहोत. केंद्र सरकारला राज्यांकडून कर मिळत असल्याने पंतप्रधानांनी सहकार्य करावे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

आपचे मुख्यमंत्र्यांना पत्र

‘आप’चे कर्नाटकचे अध्यक्ष पृथ्वी रेड्डी यांनी सिद्धरामय्या यांना पत्र लिहिले की, पंजाबमधील ‘आप’ सरकार राज्याच्या अन्नभाग्य योजनेसाठी आवश्यक असलेला अतिरिक्त तांदूळ देण्यास तयार आहे. हे पत्र पृथ्वी रेड्डी यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहे.

आपने पत्रात म्हटले आहे की, ‘अतिरिक्त तांदूळ देण्यास भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने नकार दिला, ही आश्चर्याची आणि खेदाची बाब आहे. भाजप सरकारची गरीबविरोधी वृत्तीच नाही, तर बिगर भाजपशासित राज्यांबद्दलची सापत्नभावाची वृत्ती देखील दिसून येते. आम्ही अशा वर्तनाचा तीव्र निषेध करतो. राज्यातील लोकांचे हित लक्षात घेऊन पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याशी या विषयावर सविस्तर चर्चा केली आहे. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि गरज पडल्यास पंजाबमधून तांदूळ पुरवठा करण्याचे तत्वत: मान्य केले, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

पंजाब सरकारशी चर्चा

कर्नाटक सरकारच्या मुख्य सचिव वंदिता शर्मा यांनी पंजाबमधून तांदूळ खरेदीबाबत चर्चा केली. राज्याने अधिसूचित केलेल्या दराने तांदूळ देण्यासाठी पंजाब सरकारशी पुन्हा चर्चा केली जाईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT