Pune Khed News : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (कात्रज डेअरी) संचालक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण चांभारे यांचे संचालकपद पुतण्या थकबाकीदार असल्याचे कारण देऊन रद्द करण्यात आले आहे. चांभारे यांचा पुतण्या हा जिल्हा दूध संघाचा थकबाकीदार आहे, त्यामुळे त्यांच्यावर सहकारी संस्थांच्या दुग्ध विभागाचे विभागीय उपनिबंधक डॉ. महेश कदम यांनी ही अपात्रतेची कारवाई केली आहे. (NCP's Arun Chambare's directorship of Katraj Dairy canceled due to nephew's arrears)
यासंदर्भात संचालक चांभारे यांनी स्पष्टीकरण दिले आहे, ते म्हणाले की, मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) पुतण्या या कुटुंबाचा घटक नाही, त्यामुळे मला विजयी घोषित करण्यात आले आहे. विभागीय उपनिबंधकांचा हा निर्णय उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विसंगत आहे, त्यामुळे या निर्णयाविरोधात मी उच्च न्यायालयात परत जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अरुण चांभारे हे कात्रज दूध संघाच्या (Katraj Dairy) २०२२ मधील निवडणुकीत खेड सर्वसाधारण मतदारसंघातून निवडून आले होते. माजी संचालक चंद्रशेखर शेटे यांचा मोठ्या मताधिक्क्याने त्या निवडणुकीत पराभव केला होता. खेडमध्ये (Khed) चांभारे आणि शेटे यांच्यात २०१० पासून जिल्हा दूध संघाच्या संचालकपदावरून मोठी चुरस होती. ती स्पर्धा वाढत जाऊन २०१५ पासून दोघांमध्ये न्यायालयीन लढाईला सुरुवात झाली होती. त्याच अनुषंगाने चांभारे यांच्याविरोधात शेटे यांनी सहकार न्यायालयात, तर विभागीय उपनिबंधकांकडे शेटे यांचे कार्यकर्ते राजेंद्र म्हसे यांनी तक्रार केली हेाती.
पुणे जिल्हा दूध संघावर अरुण चांभारे हे २०१० मध्येही निवडून आले होते. त्यानंतर मात्र २०१५ च्या निवडणुकीत पुतण्याच्या थकबाकीवरून अरुण चांभारे यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला होता. अर्ज बाद झाल्याने चांभारे निवडणूक प्रक्रियेच्या बाहेर फेकले गेले होते. मात्र, चांभारे यांनी तत्कालीन निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निर्णयाला सहकार न्यायालय आणि उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
त्यावेळी झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालय आणि सहकार न्यायालयानेही पुतण्या हा कुटुंबाचा घटक होत नाही, असे निर्वाळा देत चांभारे यांच्या बाजूने निकाल दिला होता. त्यानंतर मार्च २०२२ च्या निवडणुकीत चांभारे यांनी पुन्हा उमेदवारी अर्ज भरला. त्यावेळी चांभारे यांच्या अर्जावर शेटे यांच्याकडून हरकत घेण्यात आली. चांभारे यांचा अवैध ठरविण्याची मागणी केली होती. परंतु निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ही मागणी फेटाळून लावली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.