Raghav Chadha, Arvind Kejriwal
Raghav Chadha, Arvind Kejriwal Sarkarnama
देश

केजरीवालांच्या विश्वासू सहकाऱ्याचा आमदारकीचा राजीनामा

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे (AAP) दिल्लीतील आमदार राघव चढ्ढा (Raghav Chadha) यांनी गुरूवारी आमदारकीचा राजीनामा दिला. ते मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात. पंजाबमध्ये ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर चढ्ढा यांचे आपमधील वजन वाढले आहे. त्यामुळे केजरीवाल यांनी त्यांना राज्यसभेत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

पंजाबमध्ये आता राज्यसभेच्या (Rajya Sabha) निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. पंजाबमध्ये ११७ पैकी तब्बल ९२ जागा जिंकत काँग्रेसचा (Congress) अक्षरशः सुपडासाफ केला आहे. त्यामुळे राज्यसभेत संसदेत 'आप'ला पाच खासदारांचा बोनस मिळणार आहे. आपकडून मागील आठवड्यात राज्यसभेच्या पाच जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली. त्यामध्ये चढ्ढा यांच्या नावाचाही समावेश आहे.

चढ्ढा यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांची निवड निश्चित मानली जात असल्याने त्यांनी गुरूवारी आमदारकीचा राजीनामा दिला. दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष राम निवास गोयल यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपुर्द केला. राज्यसभेत मी पंजाबमधील लोकांसाठी काम करणार आहे. दिल्ली विधानसभेतही मी अनेक मुद्दे उपस्थित केले. येथील सर्वच सदस्यांनी खूप सहकार्य केलं, असं चढ्ढा म्हणाले.

चढ्ढा हे पंजाबमधील आपचे सह प्रभारी होते. निवडणुकीदरम्यान त्यांनी मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांच्यावर हल्लाबोल केला होता. त्यांच्या मतदारसंघातच सुरू असलेला बेकायदेशीर वाळू उपसा तसेच भ्रष्टाचाराच्या मुद्यावर त्यांनी रान उठवलं होतं. त्याचा फटका चन्नी यांना बसल्याचे निवडणुकीत दिसून आले. पंजाबमध्ये केलेल्या कामगिरीचे बक्षिस चढ्ढा यांना मिळाल्याचे बोलले जात आहे. ते ३३ वर्षांचे आहेत. पंजाबमधील सर्वात तरूण राज्यसभा सदस्य असतील.

दरम्यान, आपकडून चढ्ढा यांच्यासह क्रिकेटपटू हरभजनसिंग (Harbhajan Singh), आयआयटीचे प्राध्यापक संदीप पाठक यांचाही समावेश आहे. ते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचे निकटवर्ती मानले जातात. पाठक हे पंजाबमध्ये तीन वर्षांपासून काम करत होते. पक्ष संघटना बळकट करण्यासाठी त्यांचेही मोठे योगदान असल्याची चर्चा आहे. लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे संस्थापक अशोक कुमार मित्तल यांनाही राज्यसभेची लॉटरी लागली आहे. त्याचप्रमाणे कृष्णा प्रण ब्रेस्ट कॅन्सर केअर चॅरिटेबल टॅस्टचे संस्थापक संजीव अरोरा यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT