New Delhi, 08 February : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आम आदमी पार्टीला चारीमुंड्या चीत करून तब्बल २७ वर्षांनंतर सत्तेत पुनरागमन केले आहे. पण, ज्या काँग्रेसला हरवून आप दिल्लीच्या सत्तेत आला, त्याच काँग्रेसने आम आदमी पार्टीला सत्तेत बाहेर फेकण्यासाठी मोलाची कामगिरी बजावली आहे. दिल्लीत काँग्रेसमुळे आम आदमी पार्टीला तब्बल १४ जागांवर पराभावाचे तोंड पाहावे लागले आहे. काँग्रेस पक्षाला तर एकही जागा मिळालेली नाही. त्यामुळे निवडणुकीत आघाडी न केल्याचा फटका दोन्ही पक्षाला बसल्याचे दिसून येते.
दिल्ली विधानसभेच्या मागील 2020 च्या निवडणुकीत आम आदमी पक्षाला (AAP) 53 टक्क्यांहून अधिक मते मिळाली होती, तर भाजपच्या मतांची टक्केवारी 38.51 टक्के होती. या निवडणुकीत भाजपला 45.57 टक्के, तर आम आदमी पक्षाला 43.57 टक्के मते मिळाली आहेत. भारतीय जनता पक्षाने आम आदमी पक्षापेक्षा दोन टक्के मते जास्त मिळवित दिल्लीचे तख्त काबीज केले आहे.
या मतदारसंघात बसला फटका
काँग्रेसमुळे (Congress) दिल्लीतील नवी दिल्ली, जंगपुरा, त्रिलोकपुरी, ग्रेटर कैलाश, छतरपूर, मादीपूर, मालवीय नगर, नांगलजोई जाट, राजेंद्रनगर, संगम विहीर, तिमारपूर, बादली, महारौली, कस्तूरबा नगर या मतदारसंघात आपला काँग्रेस उमेदवाराने घेतलेल्या मतामुळे पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
या नेत्यांचा झाला पराभव
दिल्लीचे तीन वेळचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा नवी दिल्ली मतदारसंघातून भाजपच्या प्रवेश वर्मा यांच्याकडून ४ हजार मतांनी पराभव झाला आहे. याच मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार, माजी खासदार संदीप दीक्षित यांना 4500 हून अधिक मते मिळाली आहेत, त्यामुळे केजरीवाल यांच्या पराभवात काँग्रेसचा मोठा वाटा आहे.
आपचे दोन नंबरचे नेते, दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा जंगपुरा मतदारसंघातून 675 मतांनी पराभव झाला आहे. तिसऱ्या क्रमांकावर असलेले काँग्रेसचे फरहाद सूरी यांना 7000 हून अधिक मते मिळाली आहेत.
सोमनाथ भारती यांच्या पराभवात काँग्रेसचाही हात होता. आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते सौरभ भारद्वाज हे 3100 मतांनी पराभूत झाले आहेत. त्यांच्याही पराभवामागे काँग्रेस असून तिसऱ्या क्रमांकावर असलेले काँग्रेसचे गरवीत संघवी यांना ६७०० हून अधिक मते मिळाली आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.