Abhijeet Dipke demands Dharmendra Pradhan resignation Sarkarnama
देश

Abhijeet Dipke: धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी 'कॉक्रोच' पार्टीचं निर्णायक आंदोलन होणार सुरु, तारीखही ठरली! दिपकेंचं थेट PM मोदींना पत्र

Cockroach Party protest against Dharmendra Pradhan: अभिजीत दिपकेंनी PM मोदींना लिहिलेल्या पत्रातून NEET परीक्षा रद्द झाल्यानं जीवन संपवलेल्या विद्यार्थ्यांसाठी केली मोठी मागणी

Amit Ujagare

Abhijeet Dipke writes letter to PM Modi: पेपरफुटी आणि परीक्षांमधील गोंधळाची जबाबदारी घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीवर अद्यापही ठाम राहून देशभरात ठिकठिकाणी आंदोलन करणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी आता थेट मोंदीशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला आहे. एका पत्रद्वारे त्यांनी मोदींशी संपर्क साधला असून या पत्रातून त्यांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी आता निर्णायक लढाई सुरु करणार असल्याची माहिती दिली आहे.

यापत्राद्वारे उद्यापासूनच म्हणजे २० जूनपासून आता दिल्लीतल्या जंतरमंतर मैदानावर देशभरातून कॉक्रोच जनता पार्टीचे समर्थक आंदोलनाला सुरुवात करणार आहेत, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. पण जोपर्यंत शिक्षणं मंत्र्यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत बेमुद्त हे आंदोलन सुरु राहणार आहे हे मात्र यातून स्पष्ट करण्यात आलेलं नाही.

त्याचबरोबर दुसरा एक महत्वाचा मुद्दा या पत्रातून अभिजीत दिपके यांनी पंतप्रधानांसमोर मांडला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी NEET परीक्षा रद्द झाल्यानं आपलं जीवन संपवलं त्यांच्या कुटुंबांची भविष्यात मोठी होरपळ होणार आहे.

कारण या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्यांच्या कुटुंबायांनी मोठी शैक्षणिक कर्जे घेतली आहेत. मुलगा शिकून मोठा झाल्यानंतर आपली आर्थिक स्थिती सुधारेल अशीही त्यांना आशा होती. पण आता सर्वकाही उद्ध्वस्त झाल्यानं ज्या विद्यार्थ्यांनी आपलं जीवन संपवलं आहे त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १ कोटी रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणीही त्यांनी पत्रातून केली आहे.

अभिजीत दिपकेच्या पत्रात काय?

आदरणीय पंतप्रधान मोदीजी,

आज मी अत्यंत जड अंतःकरणानं तुम्हाला पत्र लिहीत आहे. आपल्या देशाच्या भविष्याला म्हणजेच आपल्या तरुण विद्यार्थ्यांचे प्राण आणि त्यांचे मानसिक आरोग्य धोक्यात आणणाऱ्या एका गंभीर आणि वाढत्या संकटाकडं तुमचं तातडीनं लक्ष वेधणं हा या पत्राचा उद्देश आहे. गेल्या काही आठवड्यांत, आपण ११ तरुण विद्यार्थ्यांना गमावलं आहे. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे, यातील पाच हृदयद्रावक घटना केवळ गेल्या ४८ तासांत घडल्या आहेत.

येणाऱ्या परीक्षांच्या (पुनर्परीक्षांच्या) तणावाखाली वावरणाऱ्या आपल्या तरुणांमध्ये हा विनाशकारी कल कमी होण्याऐवजी अधिकच तीव्र होत चालला आहे. गेल्या दोन महिन्यांत, मी स्वतः अशा अनेक शोकाकुल कुटुंबांची भेट घेतली आहे, ज्यांनी आपल्या मुलांना गमावलं आहे. मूल गमावल्याच्या असह्य मानसिक आघातासोबतच, ही कुटुंबं आता गंभीर आर्थिक संकटाचाही सामना करत आहेत. चांगल्या भविष्याच्या आशेनं आणि मुलांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी अनेकांनी मोठी शैक्षणिक कर्जे घेतली होती, परंतू व्यवस्थेतील अपयशामुळे ती स्वप्ने निर्दयीपणे धुळीस मिळाली.

ज्या मुलांच्या शिक्षणासाठी आपली आयुष्यभराची पुंजी खर्च केली, तीच मुलं गमावल्यामुळं ही कुटुंबे पूर्णपणे उघड्यावर पडली आहेत. सरकारनं यात हस्तक्षेप करून तातडीने दिलासा देणं आवश्यक आहे. पेपरफुटीच्या (प्रश्नपत्रिका फुटण्याच्या) वाढत्या संकटामुळं ज्या कुटुंबांवर आत्महत्येचे दुर्दैवी संकट ओढवले आहे, त्या सर्वांना एक कोटी रुपयांची नुकसानभरपाई दिली जावी, अशी आम्ही मागणी करत आहोत.

'कॉक्रोच जनता पार्टी' गेल्या एका महिन्यापासून शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे आणि आमच्या मागण्यांसाठी देशभरात आंदोलन करत आहे. विद्यार्थ्यांच्या जीवाचं जे नुकसान झालं आहे, त्याबद्दल कोणाची तरी जबाबदारी निश्चित व्हावी, एवढीच आमची इच्छा आहे.

आपल्या शिक्षण व्यवस्थेवरील लाखो विद्यार्थी आणि पालकांचा विश्वास पुन्हा निर्माण करण्यासाठी नेतृत्वाला जबाबदार धरणं हे अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे. जर या प्रणालीगत अपयशांचे निवारण करण्यासाठी आणि त्यासाठी जबाबदार असलेल्या नेतृत्वात बदल करण्यासाठी त्वरित व निर्णायक पावले उचलली गेली नाहीत, तर प्रशासनाला सद्यस्थिती मान्य आहे, असा संदेश नकळतपणे जाईल.

परीक्षाप्रणालीचं वारंवार होणारं अपयश, गैरव्यवस्थापन आणि परीक्षांबाबतची प्रचंड चिंता या गोष्टी आपल्या शिक्षण व्यवस्थेच्या कोसळण्याकडं निर्देश करतात. म्हणूनच, आम्ही तुम्हाला नम्र विनंती करतो की शिक्षणमंत्र्यांना पदावरून दूर करावं, ते तुमच्या मर्जीनं पदभार सांभाळत आहेत आणि अंतिम जबाबदारी ही पंतप्रधानांचीच असते.

धर्मेंद्र प्रधान यांनी भारताची शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त केली आहे हे मान्य करून आणि त्यांना बदलण्यासाठी निर्णायक पाऊल उचलून, तुम्ही कमकुवतपणा दाखवणार नाही. त्याऐवजी, देशात खरी जबाबदारी निश्चित करण्याची ताकद आणि इच्छाशक्ती तुमच्याकडं आहे, हेच तुम्ही देशाला दाखवून द्याल. अन्यथा, सरकारनं आपल्या नागरिकांबद्दल कोणतीही आस्था किंवा काळजी न दर्शवल्यास, लाखो नागरिक पूर्णपणे हताश, वाऱ्यावर सोडलेले आणि दिशाहीन झाल्याची भावना त्यांच्यामध्ये निर्माण होईल.

त्यामुळं आम्ही आपल्याला विनंती करतो की, या प्रकरणात आपण त्वरित हस्तक्षेप करावा, आमच्या विद्यार्थ्यांचं मानसिक आरोग्य आणि सुरक्षितता यांना प्राधान्य द्यावं आणि शैक्षणिक नैराश्यामुळं आणखी कोणत्याही तरुणाचा जीव अकाली जाणार नाही याची खात्री करण्यासाठी आवश्यक ती संरचनात्मक बदल घडवून आणावेत. आमची मागणी मांडण्यासाठी २० जूनपासून देशभरातील विद्यार्थी जंतरमंतर इथं एकत्र येत आहेत. आम्हाला आशा आहे की, आपलं सरकार भारताच्या भविष्याचा आवाज नक्कीच ऐकेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT