Hathras Stampede News Update : हाथरसमधील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेने अवघा देश हळहळला आहे. या भीषण दुर्घटनेत तब्बल 121 जणांचा मृत्यू झाला असून शंभारहून अधिकजण जखमी आहेत. या दुर्घटनेशी ज्यांचा संबंध जोडला जात आहे, असे नारायण साकार हरि उर्फ भोले बाबा यांची आता प्रतिक्रिया समोर आली आहे.
हाथरसमध्ये ज्या ठिकाणी ही भयानक दुर्घटना घडली तिथे याच भोले बाबांच्या सत्संगाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आणि मोठ्यासंख्येने भाविक जमले होते. ही दुर्घटना घडल्यापासून भोले बाबा फरार झाले होते आणि त्यांचा फोनही बंद होता. अखेर आता त्यांचे म्हणणे समोर आले आहे.
या दुर्घटनेवर बोलताना भोले बाबा म्हणाले की, हाथरसमध्ये चेंगराचेंगरीमुळे(Hathras Stampede) घडलेल्या दुर्घटनेच्या आधीच ते तिथून निघून गेले होते. त्यांनी म्हटले की काही समाजकंटाकांनी सत्संगाच्या ठिकाणी गोंधळ माजवला. याशिवाय त्यांनी या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांबद्दल शोक भावना व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी हेही सांगितले की याप्रकरणी त्यांनी वकील एपी सिंह यांची नियुक्ती केली आहे.
भोले बाबांकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात सांगण्यात आले आहे की, आमच्यावतीने याप्रकरणी ए.पी. सिंह वरिष्ठ अधिवक्ता, सर्वोच्च न्यायालय यांना अधिकृत केले जात आहे. जेणेकरून समागम/सत्संगानंतर काही असामाजिक तत्वांनी चेंगराचेंगरी निर्माण केल्याच्या संदर्भात योग्य ती कारवाई करता येईल.
दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ(CM Yogi) यांनी हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणाची न्यायालयीन चौकशीची घोषणा केली आहे. यासाठी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश यांच्या नेतृत्वात एक समिती गठीत केली जात आहे, जी या प्रकरणाची सखोल चौकशी करेल.
याआधी मुख्यमंत्री योगी यांनी या दुर्घटनेच्या तपासाची जबाबदारी अतिरिक्त पोलीस महासंचालक, आग्रा यांना सोपवली होती आणि ही दुर्घटना आहे की षडयंत्र हे जाणून घेण्यासाठी सरकार याच्या मूळापर्यंत जाईल, असेही म्हटले होते.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.