BJP  Sarkarnama
देश

भाजपच्या दक्षिण विस्ताराच्या स्वप्नाला मित्रपक्षानंच लावला सुरुंग!

तमिळनाडूत भाजप कधीच वाढणार नसल्याचा अण्णाद्रमुकचा दावा

सरकारनामा ब्युरो

चेन्नई : तमिळनाडूत भाजप (BJP) कधीच वाढू शकणार नाही, असा दावा मित्रपक्ष असलेल्या अण्णाद्रमुकचे (AIADMK) नेते सी.पोन्नईयन यांनी केला आहे. भाजप तमिळविरोधी असल्याची टीकाही त्यांनी केली. अण्णाद्रमुकने निवडणुकीच्या सोईसाठी भाजपबरोबर युती केली असून, भाजप आणि आमची विचारधारा अगदी विरुद्ध आहे, असेही त्यांनी स्पष्ट केलं आहे. एकप्रकारे भाजपच्या दक्षिण विस्ताराच्या स्वप्नालाच मित्रपक्षाने सुरूंग लावल्याचे मानले जात आहे.

पोन्नईयन अण्णाद्रमुकचे संस्थापक सदस्य आहेत. पक्षाचे संस्थापक एम.जी.रामचंद्रन आणि जयललिता यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात ते मंत्री होते. अण्णा द्रमुकच्या तीव्र विरोधानंतरही भाजप सातत्याने हिंदी लादत असल्याचा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले की, केंद्रातील आधीच्या काँग्रेस नेतृत्वाखालील सरकारच्या तुलनेत कितीतरी पटीने सध्याच्या भाजप सरकारकडून दक्षिणेवर हिंदी लादली जात आहे. भाजपची तमिळ वंश व तमिळ भाषाविरोधी भूमिका आम्हाला मान्य नाही.

भाजप तमिळनाडूत कधीही वाढणार नाही. तमिळविरोधी भूमिका बदलली तरच भाजपचा राज्यात विस्तार होऊ शकतो. तमिळ आणि इंग्रजीच्या द्विभाषा धोरणाच्या पाठीशी अण्णाद्रमुक ठामपणे उभा आहे. राज्याची स्वायत्तता हे आमच्या पक्षाचे मूलभूत तत्त्व आहे. परंतु, भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने राज्यांचे कराशी निगडित अधिकार हिरावून घेऊन राज्यांना ग्रामपंचायतींच्या पातळीवर आणलं आहे, असेही त्यांनी सांगितलं.

कावेरी नदीच्या पाण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा उल्लेख करत पोन्नईयन म्हणाले की, भाजपकडून तमिळनाडूला सापत्न वागणूक मिळत आहे. अण्णाद्रमुक श्रीलंकेतील तमिळींच्या अधिकारासाठी ठामपणे उभा आहे. तमिळनाडूतील वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशासाठी नीट परीक्षेला आमचा विरोध आहे. भाजप ही परीक्षा तमिळनाडूवर लादत आहे. उत्तरेतील राज्यांमधील विद्यार्थ्यांना तमिळनाडूतील वैद्यकीय महाविद्यालयांतील जागांवर प्रवेश मिळावा यासाठी हे सुर आहे, असा दावाही त्यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT