Mi-17V-5
Mi-17V-5 Sarkarnama
देश

सर्जिकल स्ट्राईक आणि २६/११ चे मैदान : अपघातग्रस्त MI-17V5 ची वैशिष्ट्ये

सरकारनामा ब्युरो

कुन्नूर (तमिळनाडू) : चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपीन रावत (Bipin Rawat) प्रवास करत असलेल्या लष्करी हेलिकॉप्टरला तमिळनाडूतील कुन्नूर येथे अपघात झाला आहे. या अपघातात रावत यांच्यासह अन्य काही जण जखमी झाले आहेत. या सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून भारतीय वायूसेनेने पुढील चौकशीचे आदेश दिले आहेत. वायूसेनेने ट्विट करुन याबाबतची माहिती दिली आहे. या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाल्याचेही वृत्त आहे.

या गंभीर घटनेनंतर बिपीन रावत आणि अन्य उच्चाधिकारी ज्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते त्या MI-17V5 या हेलिकॉप्टरची चर्चा सुरु झाली आहे. वायूदलातील हे हेलिकॉप्टर रशियन निर्मित असून अत्यंत सुरक्षित आणि सर्वश्रेष्ठ समजले जाते. हे Mi-8/17 या हेलिकॉप्टरच्या फॅमिलीचा भाग आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने आणि शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असे हे हेलिकॉप्टर समजले जाते. त्यामुळे सैन्यातील बड्या अधिकाऱ्यांच्या वाहतुकीसाठी याचा वापर केला जातो. तसेच शोध मोहिमे, गस्त घालणे, मदत आणि बचाव कार्य या कामांसाठीही या हेलिकॉप्टरचा वापर केला जातो.

या हेलिकॉप्टरची कमाल वेगमर्यादा २५० किमी प्रतितास आहे. ते कमाल ६ हजार मीटर उंचीपर्यंत जावून उड्डाण करु शकते. तसेच एकदा इंधन भरल्यानंतर ते ५८० किमी तर दोन सहायक इंधन टाक्या भरल्यानंतर १ हजार ६५ किमीपर्यंत अंतर कापण्यास सक्षम आहे. या हेलिकॉप्टरमध्ये सुमारे ३६ सशस्त्र सैनिक एका वेळी प्रवास करु शकतात. हे हेलिकॉप्टर या पुर्वी भारतीय हवाई दलाच्या अनेक महत्त्वाच्या ऑपरेशन्सचा एक भाग राहिला आहे. यात पाकिस्तानमधील एअर स्ट्राईक, 26/11 चे कमांडो ऑपरेशन या ऑपरेशन्सचा समावेश होता.

रावत यांच्यासोबत हेलिकॉप्टरमध्ये एकूण १४ जण

बिपीन रावत यांच्यासोबत या हेलिकॉप्टरमध्ये ब्रिगेडियर एल. एस. लिड्डर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग, नायक गुरूसेवक सिंग, नायक जितेंद्र सिंग, लान्सनायक विवेक कुमार, लान्सनायक बी. साई. तेजा, हवालदार सतपाल हेही असल्याची माहिती समोर आली आहे. हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर लगेच पेट घेतला. तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. त्यावेळी स्थानिकांनी जखमींना रुग्णालयात नेल्याचे समजते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT