Prateek Yadav death news : उत्तर प्रदेशचे दिवंगत नेते माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे पुत्र, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांचे बंधू प्रतीक यादव (वय 38) यांचे निधन झाले.
राजकारणापासून अलिप्त असलेले, व्यावसायिक, फिटनेससाठी ओळख असलेल्या प्रतीक यादव यांचे वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी निधन झाल्याने यादव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
प्रतीक यादव हे मुलायम सिंह यादव आणि त्यांच्या दुसऱ्या पत्नी साधना गुप्ता यांचे पुत्र होते. उत्तर प्रदेशाच्या (Uttar Pradesh) राजकारणात राजकीय वारसा लाभलेला असतानाही प्रतीक यांनी सक्रिय राजकारणापासून स्वतःला नेहमीच अलिप्त ठेवले. आज सकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने, त्यांना तातडीने लखनौ इथल्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रुग्णालयात उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासल्यानंतर मृत घोषित केले. प्रतीक यादव यांचा मृत्यू नेमका कशाने झाला, हे उत्तरीय तपासणीनंतरच समजेल. त्यांच्या पार्थिवाची उत्तरीय तपासणी इन कॅमेरा होणार आहे.
उत्तर प्रदेशाच्या राजकारणात दबदबा असलेल्या यादव कुटुंबाला मोठा राजकीय वारसा आहे. परंतु प्रतीक यादव सक्रिय राजकारणापासून नेहमीच दूर राहिले. तसं त्यांनी स्पष्ट देखील केलं होतं. व्यावसायिक प्रगती साधत असताना, त्यांना पक्षातून निवडणूक लढवण्यासाठी अनेकदा प्रस्ताव देखील देण्यात आले होते.
लंडनच्या युनिव्हर्सिटी ऑफ लीड्समधून त्यांनी एमबीए पूर्ण केले होते. राजकारणात येण्याऐवजी त्यांनी रिअल इस्टेट आणि फिटनेस उद्योगाला पसंती दिली. प्रतीक यादव हे उत्तर प्रदेशात फिटनेस फ्रीक म्हणून ओळखले जायचे. लखनौमध्ये त्यांचा स्वतःचा जिमचा मोठा व्यवसाय आहे.
प्रतीक यादव हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना काही दिवसांपूर्वी मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या दरम्यान अपर्णा यादव आणि अखिलेश यादव यांनीही त्यांची भेट घेतली होती. प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना पुन्हा घरी आणण्यात आले होते.
जिम करणे, विविध प्रकारची औषधे घेणे यासारख्या चर्चाही त्यांच्याबाबत होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते पूर्णपणे निरोगी दिसत नव्हते. मात्र त्यांचा आजार जीवघेणा ठरू शकतो, याची कुणालाही कल्पना नव्हती. प्रतीक यादव यांचा मृतदेह सध्या रुग्णालयात ठेवण्यात आला असून, घटनास्थळी कुटुंबीय आणि जवळचे लोक पोहोचले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.