Congress  Sarkarnama
देश

Congress Appointments: दिल्लीत मध्यरात्री काँग्रेसचे मोठे संघटनात्मक फेरबदल; देशभरात 81 सचिवांची नियुक्ती, महाराष्ट्रातील 4 नेत्यांना संधी!

Congress organisational reshuffle 2026 : काँग्रेसने संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल करत देशभरात 81 सचिवांची नियुक्ती केली आहे. महाराष्ट्रातील 4 नेत्यांनाही संधी मिळाली असून जाणून घ्या नव्या नियुक्त्यांचा सविस्तर तपशील.

Rashmi Mane

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाने संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल करत देशभरातील 81 सचिवांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या आदेशानुसार अखिल भारतीय काँग्रेस समितीने (AICC) विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी नव्या पदाधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली आहे. या नियुक्त्यांमध्ये महाराष्ट्रातील 4 नेत्यांचाही समावेश असल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात या निर्णयाची चर्चा सुरू झाली आहे.

काँग्रेसने जाहीर केलेल्या नव्या यादीत महाराष्ट्रासाठी यू. बी. वेंकटेश, रेहाना रियाज चिश्ती, एफ. एच. जक्कपनवर आणि योगेंद्र योगी यांची सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय महाराष्ट्रातील काही नेत्यांना इतर राज्यांमध्येही संघटनात्मक जबाबदारी देण्यात आली आहे.

काँग्रेस नेते सचिन सावंत यांच्याकडे तेलंगणाचे प्रभारीपद सोपवण्यात आले आहे. तर मोहन जोशी यांची कर्नाटकच्या सचिवपदी नियुक्ती झाली आहे. रवींद्र दळवी यांच्याकडे पंजाबची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील नेत्यांना राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी मिळाली आहे.

दरम्यान, पक्षाच्या केंद्रीय कार्यालयातील महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांमध्येही बदल करण्यात आले आहेत. काँग्रेस अध्यक्ष कार्यालयासाठी प्रणव झा आणि गौरव पांधी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर माध्यम, प्रसिद्धी आणि सोशल-डिजिटल मीडिया विभागाची जबाबदारी डॉ. विनीत पुनिया आणि रुचिरा चतुर्वेदी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. नितीन कुंभलकर यांची कोष विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यनिहाय नियुक्त्यांमध्ये उत्तर प्रदेशसाठी 6 सचिवांची घोषणा करण्यात आली आहे. गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांसाठी प्रत्येकी 4 सचिवांची नियुक्ती करण्यात आली आहे. रामकिशन ओझा यांच्याकडे गुजरातची जबाबदारी देण्यात आली आहे. तर सूरज सिंह ठाकूर आणि रवींद्र दळवी यांची पंजाबसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.

आगामी काळातील राजकीय आव्हाने लक्षात घेऊन काँग्रेसने संघटनात्मक बांधणीला वेग दिला आहे. आता नव्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पक्षाची राज्यनिहाय संघटना किती मजबूत होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT