Congress, BJP and JDS
Congress, BJP and JDS  Sarkarnama
देश

सातही जागा बिनविरोध! आता केवळ विजयाची औपचारिक घोषणा बाकी

सरकारनामा ब्युरो

बंगळूर : विधान परिषदेच्या (Legislative Council) सात जागांसाठी 3 जूनला होणारी द्वैवार्षिक निवडणूक बिनविरोध होणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. कारण सात जागांसाठी आलेले सातही अर्ज वैध ठरले आहेत. आता केवळ निकालाची औपचारिक घोषणा बाकी आहे. भाजपचे (BJP) चार, काँग्रेसचे (Congress) दोन तर धर्मनिरपेक्ष जनता दलाचा (JDS) एक उमेदवार रिंगणात उतरले आहेत.

सत्ताधारी भाजपने माजी उपमुख्यमंत्री व पक्षाचे उपाध्यक्ष लक्ष्मण सवदी, पक्षाच्या राज्य चिटणीस हेमलता नायक आणि एस. केशवप्रसाद आणि एससी मोर्चाचे अध्यक्ष चलवादी नारायणस्वामी यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने बंगळूर महानगर परिवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष एम. नागराजू यादव आणि अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष माजी आमदार के. अब्दुल जब्बार यांना उमेदवारी दिली आहे. जेडीएसकडून माजी आमदार टी. ए. सरवना हे उमेदवार आहेत.

विधान परिषदेच्या सात सदस्यांचा कार्यकाळ १४ जूनला संपत आहे. यामुळे ही निवडणूक होत आहे. विधानसभेतील प्रत्येक पक्षाच्या संख्याबळाच्या आधारे भाजपला चार जागा तर काँग्रेसला दोन आणि जेडीएसला एक जागा मिळेल, अशी स्थिती आहे. सात जागांसाठी सातच अर्ज आले असून, ते सगळे अर्ज वैध ठरले आहेत. यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. आता 3 जूनला होणाऱ्या निवडणुकीवेळी केवळ विजयाची औपचारिक घोषणा होणे बाकी आहे.

उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये मतभेद

उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद उफाळून आले होते. प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे आमनेसामने आले आहेत. अखेर काँग्रेसनं सुवर्णमध्य साधत दोन्ही नेत्यांच्या गोटातील प्रत्येकी एकाला उमेदवारी दिली आहे. काँग्रेसनं एन. नागराजू यादव आणि अब्दुल जब्बार या दोघांना उमेदवारी जाहीर केली. यादव हे सिद्धरामय्या यांच्या जवळचे मानले जातात. ते आता काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. जब्बार हे ज्येष्ठ काँग्रेस नेते आहेत. ते सिद्धरामय्या यांचे निकटवर्ती आहेत. सिद्धरामय्या यांनीच जब्बार यांची पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या प्रमुखपदी नियुक्ती केली होती.

येडियुरप्पांच्या मुलाचा पत्ता कट

भाजपने माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पांचे पुत्र बी.वाय विजयेंद्र यांना तिकीट नाकारले आहे. मागील काही दिवसांपासून विजयेंद्र यांच्या नावाची चर्चा सुरू होती. पण ऐनवेळी पक्ष नेतृत्वाने त्यांना तिकीट नाकारून येडियुरप्पांनाच धक्का दिला. विशेष म्हणजे, भाजपच्या कोअर समितीने विजयेंद्र यांच्या नावाची एकमताने शिफारस करुनही त्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली. विजयेंद्र यांना तिकीट नाकारण्यात आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विजयेंद्र यांची उमेदवारी कापण्यात आल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यांनी भाजप नेतृत्वावर हल्लाबोल केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT