Anil Ambani EPFO CBI FIR : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO)च्या तब्बल 1816.22 कोटी रुपयांच्या कथित गुंतवणूक गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) मोठी कारवाई केली आहे.
या प्रकरणात रिलायन्स कॅपिटल लिमिटेड, कंपनीचे माजी अध्यक्ष अनिल धीरूभाई अंबानी तसेच अज्ञात अधिकारी आणि अन्य व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रम व रोजगार मंत्रालयाच्या अखत्यारीतील EPFOच्या लेखी तक्रारीनंतर शुक्रवारी हा गुन्हा (Crime) नोंदविण्यात आला.
सीबीआयच्या (CBI) प्राथमिक तपासानुसार, आरोपींनी कथितपणे गुन्हेगारी कट रचून फसवणूक, विश्वासघात आणि भ्रष्टाचाराशी संबंधित कृत्यांद्वारे EPFOला 1007.55 कोटी रुपयांचे थेट नुकसान पोहोचवले. याशिवाय 808.67 कोटी रुपयांच्या व्याजाच्या दायित्वामुळे एकूण कथित आर्थिक फटका 1816.22 कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तपासानुसार, 2013 आणि 2014 दरम्यान रिलायन्स कॅपिटल लिमिटेडने सुरक्षित नॉन-कन्व्हर्टिबल डिबेंचर्स (NCDs) जारी केले होते. या रोख्यांमध्ये EPFOने 2500 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. ही गुंतवणूक रिलायन्स कॅपिटल ॲसेट मॅनेजमेंट लिमिटेडसह चार पोर्टफोलिओ व्यवस्थापकांच्या माध्यमातून करण्यात आली होती.
या एनसीडींची मुदत अनुक्रमे 2023 आणि 2024 मध्ये पूर्ण होणार होती. मात्र, आरोपींनी कथितपणे आर्थिक व्यवहारांद्वारे निधी इतरत्र वळविल्याने रिलायन्स कॅपिटलला या गुंतवणुकीची परतफेड करता आली नाही, असा सीबीआयचा आरोप आहे. त्यामुळे EPFOच्या निधीला मोठा आर्थिक फटका बसल्याचे तपास यंत्रणेचे म्हणणे आहे.
या प्रकरणापूर्वीही रिलायन्स एडीए समूहाशी संबंधित कंपन्यांविरोधात सीबीआयने विविध गुन्हे नोंदवले आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि एलआयसीच्या तक्रारींवरून रिलायन्स कम्युनिकेशन्स, रिलायन्स होम फायनान्स, रिलायन्स कमर्शिअल फायनान्स आणि रिलायन्स टेलिकॉम यांच्याविरोधात सात एफआयआर दाखल करण्यात आले आहेत.
या प्रकरणांमध्ये सीबीआयने आतापर्यंत चार आरोपपत्रे न्यायालयात सादर केली असून सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. EPFO गुंतवणूक गैरव्यवहार प्रकरणातील नव्या गुन्ह्यानंतर रिलायन्स समूहावरील तपासाचा आवाका आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.