Jammu and Kashmir : जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राजकीय हालचाली वाढल्या आहेत. ही घोषणा झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती त्यांनी घेतलेल्या शपथेविषयी उत्सुकता वाढली आहे. या शपथेला ते जागणार का, यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत.
मुफ्ती यांच्या पीडीपी पक्षाने सोमवारी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून त्यामध्ये मुफ्तींचे नाव नाही. मुफ्ती यांच्या पारंपरिक बीजबेहाडा विधानसभा मतदारसंघात त्यांची मुलगी इल्तिजा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघा मेहबूबा या 1996 पासून निवडणूक लढवत होत्या. इल्तिजा यांना तिकीट देत त्यांनी आपला राजकीय वारसदार मैदानात उतरवला आहे.
मुफ्ती यांनी मुलीला निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याने त्या निवडणूक लढणार नसल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 2019 मध्ये कलम 370 हटवल्यानंतर मेहबूबा यांच्यासह उमर अब्दुल्ला यांनीही हे कलम पुन्हा लागू होईपर्यंत निवडणूक लढणार नसल्याची घोषणा केली होती. अब्दुल्ला आपल्या भूमिकेवर कायम असल्याचे त्यांचे वडील फारूख अब्दुल्ला यांनी काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केले होते.
मुफ्ती यांची भूमिका मात्र अद्याप स्पष्ट झाली नव्हती. अखेर पक्षाने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत त्यांचे नाव नसल्याने त्यांनी एकप्रकारे आपली घोषणा प्रत्यक्षात उतरवणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे मागील काही वर्षांत पहिल्यांदाच उमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती विधानसभेच्या निवडणुकीत दिसणार नाहीत.
लोकसभा निवडणुकीत मेहबूबा मुफ्ती आणि उमर अब्दुल्ला या दोघांचाही पराभव झाला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत उतरून ते किमान विधानसभेत जातील, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. पण त्यांनी निवडणुकीच्या राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे सूचक संकेत दिले आहेत. मुफ्ती यांच्या पक्षाच्या उमेदवारांची अखेरची यादी प्रसिध्द होऊपर्यंत आपल्या शब्दावर कायम राहणार का, हे लवकरच समजेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.