Election irregularities India : महाराष्ट्रासह विविध राज्यांतील विधानसभा निवडणुकीत मतचोरी झाल्याचा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे सातत्याने करतात. आता त्यामध्ये आणखी एका राज्याची भर पडली आहे. आंध्र प्रदेशमध्ये २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मध्यरात्री तब्बल १७ लाख मतदान झाल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, यावेळी हे आरोप राहुल गांधी नव्हे तर प्रसिध्द अर्थतज्ज्ञ परकला प्रभाकर यांनी केले आहेत.
परकला प्रभाकर यांनी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत हे आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. या निवडणुकीत मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखाळी एनडीएला १७५ पैकी तब्बल १६४ जागांवर विजय मिळाला आहे. मतदानादिवशी सुमारे ३५०० मतदान केंद्रांवर मध्यरात्री २ वाजेपर्यंत मतदान सुरू होते, असेही परकला प्रभाकर यांनी सांगितले.
प्रभाकर यांच्या दाव्यानुसार, राज्यात झालेल्या एकुण मतदानापैकी ४.१६ टक्के मतदान रात्री ११.४५ ते मध्यरात्री २ वाजेपर्यंत झाले. रात्री ८ ते मध्यरात्री २ वाजेपर्यंत ५२ लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी तब्बल १७ लाख मतदान मध्यरात्रीनंतर झाले. विशेष म्हणजे हे मतदान १४ सेकंदापेक्षा कमी वेळेत झाले आहे.
ईव्हीएमला रिसेट होण्यासाठी १४ सेंकदांचा वेळ लागत असेल तर एकादा मतदार ६ सेकंद एवढ्या कमी वेळेत मतदान कसा करू शकतो, असा सवाल प्रभाकर यांनी केला. एखादा मतदार ६ सेकंदात मतदान केद्रात येऊन, मतदान करून बाहेर जाऊ शकतो का? रात्री ८ वाजल्यानंतर काहीतरी अनपेक्षित झाले असल्याचा दावा प्रभाकर यांनी केला.
आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू असताना सायंकाळी ५ वाजता मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मतदानाची टक्केवारी ६८.०४ टक्के एवढी होती. त्यानंतर आठ वाजता ही टक्केवारी ६८.१२ एवढी सांगण्यात आली. रात्री ११.४५ वाजता आयोगाने ७६.५० टक्के मतदान झाल्याचे सांगितले. मतदानाच्या चार दिवसांनंतर अंतिम टक्केवारी ८१.७९ टक्के एवढी होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.