PM Narendra Modi Birthday Sarkarnama
देश

Assembly Elections Vote Results 2023 : तीन राज्यं जिंकल्याने आता देशाच्या निम्म्याहून अधिक लोकसंख्येवर राज्य करणार भाजप

Assembly Election Results Bjp Power In Rajasthan MP And Chhattisgarh : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाने भाजपला मोठे बळ मिळाले आहे...

Sachin Fulpagare

Assembly Elections Results 2023 in Marathi : विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्याने भाजपचे देशातील वर्चस्व वाढले आहे. भाजपच्या वर्चस्वात आणखी दोन राज्ये आली आहेत. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये सत्ता आल्याने भाजप ताकद वाढली आहे. भाजपने फक्त या दोन नव्या राज्यात सत्ता आणली नाही, तर आता देशातील 41 टक्क्यांहून अधिक लोकसंख्येवर आपले राज्य प्रस्थापित करणार आहे.

भाजपची ज्या राज्यांमध्ये इतर पक्षांसोबत युती आहे, त्यांचा समावेश करून विचार केल्यास देशातील निम्म्याहून अधिक लोकसंख्येवर भाजपचे राज्य आले आहे, तर देशातील सर्वात जुना पक्ष आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाची स्वबळावर देशातील 8.51 टक्के लोकसंख्येवर वर्चस्व उरले आहे; पण आघाडीतील घटकपक्षांच्या बळावर काँग्रेसचे अजून 19.84 टक्के भारतीयांवर राज्य करत आहे.

देशातील लोकसंख्येचे आकडे हे जनगणनेद्वारे उपलब्ध होतात. लोकसंख्येचे आकडे हे 12 वर्षांपूर्वीचे आहेत. प्रत्येक राज्यातील लोकसंख्येची टक्केवारी ही 12 वर्षांपूर्वी देशात झालेल्या जनगणनेच्या आधारावर सांगण्यात येते, हे लक्षात घेतले पाहिजे.

कुठे-कुठे आहे भाजपची सत्ता ?

भाजपचे देशातील निम्म्याहून अधिक लोकसंख्येवर राज्य असेल, असे म्हटल्यावर भाजपची सत्ता कुठे-कुठे आहे, हा प्रश्न उपस्थित होतो. सर्वप्रथम भाजपची स्वबळावर सत्ता कुठे आहे, ते पाहूया. रविवारी विधानसभा निवडणुकांचे निकाल आल्यावर देशातील 12 राज्यांमध्ये भाजपची स्वबळावर सत्ता असेल.

उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, आसाम, छत्तीसगड, हरियाणा, उत्तराखंड, त्रिपुरा, मणिपूर, गोवा आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांवर भाजपची सत्ता असेल. 2011 च्या जनगणनेनुसार उत्तर प्रदेशची लोकसंख्या त्यावेळी 16.51 टक्के होती. देशातील आजची वाढलेली लोकसंख्या पाहता उत्तर प्रदेशात तेवढीच लोकसंख्या किंवा त्याहून अधिक असेल.

41.51 टक्के लोकसंख्येवर भाजपचे राज्य

उत्तर प्रदेशात देशातील सर्वाधिक 16.51 टक्के लोकसंख्या आहे. राजस्थानमध्ये 5.66 टक्के, गुजरातमध्ये 4.99 टक्के, आसाममध्ये 2.58 टक्के, छत्तीसगडमध्ये 2.11 टक्के, हरयाणात 2.09 टक्के, उत्तराखंडमध्ये 0.83 टक्के, त्रिपुरात 0.3 टक्के, मणिपूरमध्ये 0.21 टक्के, गोव्यात 0.12 टक्के आणि अरुणाचल प्रदेशात 0.11 टक्के लोकसंख्या आहे. लोकसंख्येची ही सर्व टक्केवारी मिळवल्यास भाजप स्वबळावर देशातील 41.51 टक्के लोकसंख्येवर राज्य करत आहे.

या 12 राज्यांशिवाय भाजपची सत्ता महाराष्ट्र (9.28 टक्के), मेघालय (0.25 टक्के), नागालँड (0.16 टक्के) आणि सिक्कीममध्ये (0.05 टक्के ) राहणाऱ्या एकूण 9.74 टक्के लोकसंख्येवर युतीच्या माध्यमातून राज्य करत आहे. सर्वांची बेरीज केल्यास देशातील निम्म्याहून अधिक म्हणजे 51.25 टक्के लोकसंख्येवर भाजप राज्य करत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेसच्या वर्चस्वला आळा

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष असलेल्या काँग्रेसची फक्त तीन राज्यांमध्ये स्वबळावर सत्ता राहिली आहे. या तीन राज्यांमध्ये देशातील 8.51 टक्के इतकी लोकसंख्या आहे. कर्नाटक (5.05 टक्के ), तेलंगणा (2.89 टक्के) आणि हिमाचल प्रदेश (0.57 टक्के) लोकसंख्या आहे, तर काँग्रेस आघाडी करून सरकारमध्ये असलेली दोन राज्यं म्हणजे बिहार आणि झारखंड. या दोन राज्यांमध्ये बिहार (8.6 टक्के) आणि झारखंडमध्ये (2.73 टक्के) लोकसंख्या आहे. एकूण 19.84 टक्के लोकसंख्येवर काँग्रेसचे शासन आहे.

28.91 टक्के लोकसंख्येवर इतर पक्षांचे राज्य

देशातील इतर राज्यांमध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशात राष्ट्रपती किंवा इतर पक्षांचे शासन आहे. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवलेल्यांमध्ये राजकीय पक्षांमध्ये आम आदमी पार्टी, बहुजन समाज पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि नेशनल पीपल्स पार्टी (NPP) यांचा समावेश आहे. आम आदमी पार्टीची सत्ता दिल्लीत (1.39 टक्के लोकसंख्या) आणि पंजाबमध्ये (2.29 टक्के लोकसंख्या) आहे. एकूण 3.68 टक्के लोकसंख्येवर 'आप'चे शासन आहे. माकपचे केरळमध्ये ((2.76 टक्के लोकसंख्या ) सरकार आहे. एनएनपीची सत्ता मेघालय ( 0.25 टक्के) आहे, तर बसपाची सध्या देशात कुठल्याही राज्यात सत्ता नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT