BJP Politics Sarkarnama
देश

Assembly Elections : मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये भाजपचं नवीन नेतृत्व दिसणार!

BJP leadership : प्रस्थापित चेहऱ्यांना पर्याय शोधून निवडणुकीनंतर नेतृत्व बदल होणार

Sachin Waghmare

BJP Politics :आगामी काळात होत असलेल्या पाच राज्यांतील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून रणनीती आखली जात आहे. या पाच राज्यांत विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. त्यातच भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये नव्या नेतृत्वाचा शोध घेतला जात असल्याचे समजते.

त्यामुळेच या राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात भाजपकडून सर्वच दिग्ग्ज उमेदवारांना उतरवण्यात आले आहे. यातूनच नव्या नेतृत्वाचा शोध घेतला जाणार असल्याचे दिसते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपच्या रणनीतिकाराच्या म्हणण्यानुसार गेल्या 20 वर्षांच्या काळात मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजपचे नवीन नेतृत्व उदयास येऊ शकले नाही. त्यासोबतच त्या ठिकाणी हे नेतृत्व तयार झाले नसल्याने भाजपमधील चिंता वाढली आहे.

परिणामी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषणा करण्याची इच्छा असूनही करता आली नाही. त्यामुळेच आता येत्या काळात नेतृत्व बदल करीत असताना सर्वच दिग्गज मंडळींना संधी देण्यात आली आहे. त्यामध्ये यशस्वी ठरणाऱ्याच्या गळ्यात येत्या काळात मुख्यमंत्रिपदाची माळ पडू शकते.

मध्य प्रदेशात शिवराजसिंह चौहान, कैलास विजयवर्गीय, नरेंद्रसिंह तोमर, प्रल्हादसिंह पटेल हे गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून कार्यरत आहेत. त्यांच्यानंतर दुसरी पिढीच तयार करण्यात आली नाही. त्यामुळे या ठिकाणी नेतृत्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या ठिकाणी नवीन नेतृत्व येऊ शकते. त्याचा शोध केंद्रीय निवडणूक समितीकडून घेतला जात आहे. ज्यांच्याकडे नेतृत्व करण्याची क्षमता दिसेल, त्याला भाजप सत्तेत आल्यानंतर नेतृत्वाची संधी देऊ शकते.

छत्तीसगडमध्येही रमण सिंह, गृजमोहन अग्रवाल, अमर अग्रवाल यांच्या नेतृत्वास वीस ते पंचवीस वर्षे झाले. या कालावधीत नवीन नेतृत्व निर्माण करण्याचा मार्ग बंद झाला होता. मात्र, आता भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने ठरवले असून, नेतृत्व बदल करण्यात येणार आहे. त्यानुसार चाचपणी केली जात आहे.

राजस्थानमधील विधानसभा निवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे, खासदार दियाकुमारी यांच्यसह दिग्गज मंडळींना संधी देण्यात आली आहे. त्यातूनही नव्या नेत्याचा शोध घेतला जात असल्याचे समजते. राज्यात जर सत्ता परिवर्तन हवे असेल, तर नेतृत्व बदल करणे गरजेचे आहे. या निष्कर्षापर्यंत केंद्रीय नेतृत्व आले आहे.

कर्नाटकमध्ये बी. एस. येडीयुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढल्या गेल्या, पण भाजपने वीस वर्षांच्या काळात त्यांना सोडून भाजपने म्हणावा तसा पर्याय तयार केला नाही. त्यामुळे कर्नाटकाच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला, असंही बोललं जात आहे. त्यामुळे भाजपला पिढीनुसार परिवर्तनासाठी नवीन नेतृत्व समोर आणावे लागणार आहे. त्यामुळे याच मुद्द्यावर भाजप नेतृत्वाने आता लक्ष केंद्रित केले आहे.

(Edited by -Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT