Bihar Assembly Election Sarkarnama
देश

Bihar Assembly Election : बिहार विधानसभा निवडणूक अपडेट; कधी आणि किती टप्प्यांत होणार?

Election Schedule and Phases : बिहार विधानसभेची मुदत 22 नोव्हेंबर 2025 ला संपत आहे. त्याआधी निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

Rajanand More

Bihar Politics : देशात सध्या बिहार विधानसभा निवडणुकीची जोरदार चर्चा सुरू आहे. त्याअनुषंगाने राज्यात घडामोडींना वेग आला आहे. सत्ताधारी एनडीएसह इंडिया आघाडीकडून जुळवाजुळव सुरू करण्यात आली आहे. त्याचबरोबर केंद्रीय निवडणूक आयोगाकडूनही तयारी सुरू करण्यात आली आहे. आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त पुढील काही दिवसांत बिहारमध्ये जाणार असल्याचे समजते.

बिहार विधानसभेची मुदत 22 नोव्हेंबर 2025 ला संपत आहे. त्याआधी निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाकडे जवळपास साडे-पाच महिन्यांचा कालावधी आहे. मात्र, पावसाळ्यात आयोगाकडून निवडणूक घेतली जात नाही. तर ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस छठ पूजा आणि दिवाळी आहे. या उत्सवाच्या तारखा पाहून आयोगाला निवडणुकीचे वेळापत्रक निश्चित करावे लागणार आहे.

निवडणुकीसाठी किमान 45 दिवसांचा कालावधी गृहित धरला तर दिवाळीआधीच प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे. याचा अर्थ ऑक्टोबर महिन्यातच बिहारची निवडणूक जाहीर होऊ शकते. दिवाळी आणि छठ पुजेच्या कालावधीत मतदान घेता येणार नाही. बिहारमध्ये एक किंवा दोन टप्प्यांत निवडणूक घेण्याबाबत आयोगाकडून विचार केला जाऊ शकतो. ही निवडणूक दिवाळी आणि छठ पुजेनंतर झाल्यास मतदानाचा टक्का मोठ्या प्रमाणात वाढू शकतो.

बिहारमधील लाखो मतदार कामानिमित्त परराज्यात आहेत. महाराष्ट्रामध्येही त्यांचा टक्का मोठा आहे. मात्र, छठ पूजा आणि दिवाळीसाठी हे सर्वजण बिहारमध्ये परतत असतात. 2020 मध्ये राज्यात निवडणुकीची प्रक्रिया 1 ऑक्टोबरपासून सुरू झाली होती. तीन टप्प्यांत झालेल्या निवडणुकीचा निकाल 10 नोव्हेंबरला जाहीर झाला होता.

दिवाळी आणि छठपुजेमुळे यावेळीही ऑक्टोबरमध्येच निवडणूक प्रक्रिया सुरु करून नोव्हेंबरमध्ये दोन टप्प्यांत मतदान होऊ शकते. दरम्यान, निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार पुढील काही दिवसांत बिहारच्या दौऱ्यावर जाणार असल्याचे समजते. राज्यात मतदार वाढविण्याबरोबरच मतदार यादीतील घोळ टाळण्याचे आव्हान आयोगासमोर असणार आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT