
Pune News : पुण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाला मनीलाँड्रिंग व्यवहारात डिजिटल अटक करण्याची भीती दाखवून 6 कोटी 29 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी पुणे सायबर पोलिसांच्या पथकाने सायबर चोरट्याला पनवेल परिसरातून अटक केली आहे. तपासामध्ये या चोरट्याने डिजिटल अटकेची भीती दाखवून आणखी पाच जणांची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलिसांच्या जाळ्यात अडकलेला हा सायबर चोरटा राज्याच्या सत्तेतील एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असल्याचे समोर आला आहे. तसंच त्याची पत्नी एका गावची सरपंच असून तीही त्याच राजकीय पक्षाशी निगडित असल्याचं समोर आला आहे. तर त्याचे वडील या पक्षाचे तालुका उपाध्यक्ष असल्याने खळबळ उडाली आहे.
तुषार हरिश्चंद्र वाजंत्री (वय - 28, रा. कोकबन, ता. रोहा, जि. रायगड) असे या सायबर चोरट्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वाजंत्रीने पुण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाच्या फोनवर मागील वर्षी संपर्क साधून पोलीस असल्याची बतावणी केली होती. मनी लाँड्रिंग प्रकरणामध्ये त्या ज्येष्ठ नागरिकाला कारवाईचा धाक दाखवून पैसे पाठविण्यास सांगितले. त्यानंतर 9 ते 19 नोव्हेंबरदरम्यान या जेष्ठ नागरिकांनी वाजंत्री याच्या बँक खात्यात 6 कोटी 29 लाख रुपये जमा केले.
या प्रकरणामध्ये आपली फसवणूक होत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर या ज्येष्ठ नागरिकाने शिवाजीनगर येथील सायबर क्राईम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सायबर पोलिसांच्या तपासात ही रक्कम वाजंत्री यांच्या खात्यात जमा झाल्याचे उघडकीस आले. या पैशांमधून आरोपीने 90 लाख आणि 20 लाख रुपयांची मुदत ठेव देखील केली आहे.
संबंधित बँक खाते कोकबन येथील घावीर कन्स्ट्रक्शनच्या नावे असल्याचे उघड झाले. त्यानंतर सायबर पोलिसांचे पथक आरोपी आणि साथीदाराला ताब्यात घेण्यासाठी कोकबन येथे गेले असता आरोपी पसार झाला होता. वाजंत्री पनवेलमध्ये असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्याने दिल्यावर सापळा लावून त्याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्या साथीदारांचा शोध सुरू आहे. वाजंत्री याला न्यायालयाने पाच दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.
तुषार वाजंत्री हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या सुनिल तटकरे यांचा कार्यकर्ता असल्याचं बोललं जात आहे. सुनील तटकरे यांच्या सोबतचे काही फोटो देखील समोर आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी विविध पदांवर काम केलं असल्यास देखील समोर आले आहे. तुषार वाजंत्री याची पत्नी एका गावची सरपंच असून ती देखील अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी संबंधित असल्याचं बोललं जात आहे. तर वडील रोहा तालुक्याचे पक्षाचे उपाध्यक्ष आहेत.
केरळ पोलिस या तुषार वाजंत्रीच्या मागावर असल्याचं समोर आला आहे. सायबर पोलिसांनी केरळ पोलिसांशी संपर्क साधला असून आरोपीविरुद्ध वेगवेगळ्या राज्यांत नॅशनल सायबर पोर्टलवर एकूण पाच तक्रारी दाखल आल्याच्या समोर आले आहे. या 5 गुन्ह्यांत वाजंत्री याचा सहभाग असल्याचे उघडकीस आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.